(करुणा बुद्ध विहार, मांडा टिटवाळा पूर्व येथे दिनांक १३ ऑक्टोबर,२०२४ रोजी सदर केलेल्या प्रवचनाचा भाग येथे मांडत आहे)
जे लोक श्रद्धाळू असतात ते आपसूकच धर्मावर श्रद्धा ठेवतात. परंतु जे लोक चिकित्सावादी असतात अशा व्यक्तींना डोळस व विज्ञानवादी, आचरण धम्म देण्याचे काम बुद्धांने केले आहे. म्हणून बुद्धांचा धम्म हा बुद्धीचा धम्म आहे. हा बुद्धीवादयांचा धम्म आहे असे म्हणतात. येथे येण्याची कुठली अट नाही. तुम्ही जर किमान समजू शकत असाल,विचार करण्याच्या प्रक्रियेला तयार असाल... तर बुद्ध म्हणतात *"एहि पस्सिको"* या.. पहा.. मानण्याची पूर्वअट नाही. अनुभवा.. आणि पटलं.. तर स्वीकारा.
जगभरातील धर्म हे व्यक्तीला धार्मिक घोषीत करण्यापूर्वी अथवा धर्मात प्रवेश देण्यापूर्वी त्या धर्मावर त्याची श्रद्धा असणे हे प्राथमिक मानतात. जुनी पुराणे, गाथा, अपौरुषी शास्त्र हे त्यासाठी प्रमाणभूत मानतात.
बुद्धांचा धम्म हा कुठल्याही शास्त्रातून जन्मलेला नाही. तर तो बुद्धांच्या तत्वज्ञानातून, शिकवणुकीतून व अनुभवातून जन्मलेला आहे.बुद्धांचा धम्म हा प्रश्नोत्तरातून, विश्लेषणातून व मानवी नैतीक मूल्यांतून जन्मलेला विचार आहे. त्यामुळे बुद्धांचा आग्रह नाही की, मी सांगतो तेच बरोबर माना अथवा असा कुठलाही दावा ते करत नाहीत. त्याउप्पर ते काळानुरूप योग्य ते बदल स्वीकारण्यास तयार आहेत व तशी मुभा धम्मात देतात.
विचार करा तुम्ही जी श्रद्धा ठेवता. त्या श्रद्धाजर डोळस नसतील? स्व:अनुभवातून, विचारातून, चिंतनातून मंथनातून आलेल्या नसतील? तर अशा श्रद्धा व उपासना खऱ्या असतील काय? तुम्ही ज्या उपासना,पद्धती करता ते केवळ एक दिखावा ठरून पोकळ आचरण ठरणार नाही काय? आशा पोकळ विधीतुन मग अंधश्रद्धा निर्माण होणार नाही काय? म्हणून तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की धर्माची/धम्माची /धार्मिक होण्याची पहिली पायरी ही श्रद्ध नसून स्वानुभव, स्वविचार स्वसंमती असली पाहिजे.
या जगात अनेक धर्म संस्थापकांनी मी देव आहे. मी देवाचा अवतार आहे. मी देवाचा पुत्र आहे. मी देवाचा संदेशवाहक आहे. अशा थापा मारलेल्या आहेत असे आपल्या निदर्शनास येते. परंतु बुद्धाने अशी कोणतीही वालग्ना केली नाही. त्यांनी मी मानव पुत्र आहे. मी कुणीही मोक्षदाता नसून मी केवळ मार्गदाता आहे असे सांगितले आहे. आणि हीच गोष्ट त्यांच्या धम्माल मानवीय बनवते.
ज्ञानप्राप्ती नंतरची त्याची साक्ष देणारी भूमीस्पर्शमुद्रा हे त्याचे उत्तम उदाहरण होय.
माणसाने माणसाशी कसे वागावे ही शिकवण बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू होय.या जगात कुणी मोक्षवाद सांगितला,कुणी आत्मावाद, दैववाद, स्वर्गवाद, मनुवाद,जातीवाद असे निरनिराळे इसम व वाद सांगितले परंतु बुद्धाने आपल्या धम्मातून केवळ मानवतावाद सांगितला.
बुद्धांनी पाप,पुण्य,पुनर्जन्म, स्वर्ग,नरक, आत्मा परमात्मा यांना तिलांजली दिली. तुम्ही मागीलजन्मी काय होते, पुढील जन्मी काय होईल हे न सांगता. वर्तमान जन्मात तुम्ही दुःखमुक्त जीवन कसे जगू शकता हे मानवाला सांगितले. मृत्यू नंतर काय होईल त्यापेक्षा तुम्ही जिवंतपणी निर्वाण,निर्दोष जीवन कसे जगू शकता हे संगितले.
बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी प्रथम अरीहंत झालेल्या ६० भिक्षूंना निरनिराळ्या दिशांना पाठवले. त्यांना पाठवितांना
*बहुजन हिताय*
*बहुजन सुखाय*
असा मानवजातीच्या कल्याणाचा संदेश दिला.
त्यामुळे बुद्धाच तत्वज्ञान हे केवळ एक व्यक्तीच्या विकासाचे तत्वज्ञान नसुन संपूर्ण समाजाच्या सामूहिक क्रांतीचे ते मानवतावादी तत्वज्ञान आहे.
समानता हे मानवतावादी मूल्य त्यांनी संघात देखील जोपासले. संघात सुनित नावाचे भंगीसमाजाचे भन्ते होते. न्हावी समाजाचे उपाली जे विनय पिटकाचे प्रमुख देखील होते. चर्मकार समाजाचे सोपान,आम्रपाली गणिका, किसा गौतमी अबला आणि दरोडेखोरी करणारा अंगुलीमान देखील होते.
बुद्धांच्या या मानवतावादी धम्माचे दोन भागात विभागणी करून पाहता येईल. एक जो शिकवणुकीचा भाग आहे. आणि दुसरा तत्वज्ञानाचा भाग आहे.
*शिकवणुकीत* आपण
1. त्रिसरण (बुद्ध,धम्म,संघ)
2. चार आर्य सत्य
(दुःख, कारण, समाप्तीचे सत्य, दुःख समाप्ती)
3. पंचशील
(हिंसा,चोरी,व्याभीचार,खोटे,मद्यपान न करणे.)
4. अष्टशील
(विकाल आहार,करमणुकीच साधन,सुगंधीत द्रव्ये व इतर अलंकारांपासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करणे .)
5. दसशील
( उच्च आसन व स्वर्ण आलंकारापासून अलिप्त राहणे)
ह्या चारही प्रकारात शिलांची विभागणी वेगवेगळी केली आहे. गृहस्थ आणि गृहीणींकरीता पाच शील आहेत, उपासक आणि उपासिकेसाठी आठ शील तर श्रामणेर आणि श्रामणेरींकरींना दहा शिलांचे पालन करावे लागते.
6. आर्य अष्टांगिक मार्ग
(सम्यक दृष्टी,सम्यक संकल्प,सम्यक वाणी,सम्यक कर्मांत,सम्यक उपजीविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती,सम्यक समाधी)
7. दस पारमिता
(दान', 'शील', 'नैष्कर्म्य', 'प्रज्ञा', 'वीर्य', 'क्षान्ति', 'सत्य', 'अधिष्ठान', 'मैत्री' व 'उपेक्षा' ya या परमीताचा समावेश होतो.)
तर तत्वज्ञानात आपण
1. प्रतुत्यसमुत्पाद
2. अनात्मवाद
3. अनित्यवाद
4. पुनर्जन्म सिद्धांत
5. कर्म सिद्धांत
इत्यादीचा समावेश होतो.
धम्म म्हणजे नीती,धम्म हा मानवी मनावर मानवतावादी विचार रुजवणारा संस्कार होय. आणि म्हणून धम्म म्हणजे मानवता अथवा मानवता म्हणजे धम्म असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
धन्यवाद!
संदर्भ: १. धम्मपद- ओशो
२. बुध्धम्माचे सार- पी एल नरसू
३. बुद्ध चरित्र- प्रा डी डी कोसंबी
४. बुद्ध आणि त्यांचा धम्म-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
५. सर्वोत्तम भूमिपुत्र- अ ह साळुंखे



