Thursday, 8 October 2026

आदर्शवाद, वस्तुस्थिती आणि संघटन

 



आदर्शवाद आणि वस्तुस्थिती यांचा विचार करताना आदर्शवादाला साध्य आणि वस्तुस्थितीला प्रमाण मानले पाहिजे. आदर्श काय आहे हे स्पष्ट असावे; मात्र त्या आदर्शाची पूर्तता करण्यासाठी वर्तमानातील वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन करून, योग्य साधने आणि योग्य रणनीतीच्या साहाय्याने वर्तमानातील प्रश्नांची उकल शोधली पाहिजे.


सामाजिक प्रश्नांचा लढा हा समाजातूनच उभा राहिला पाहिजे आणि त्याचे उत्तरही समाजाच्या संघटित शक्तीतूनच मिळाले पाहिजे.


एक व्यक्ती, एक विचार आणि एकटा लढवय्या यांच्यामध्ये संघर्षाची प्रेरणा आणि वैचारिक ताकद असू शकते; परंतु त्यातून निर्माण होणारा सामाजिक परिणाम आणि दीर्घकालीन यश मर्यादित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे समविचारी लोकांचे संघटन आणि त्या संघटित शक्तीच्या माध्यमातून परिवर्तन हे अधिक विश्वासार्ह आणि परिणामकारक सूत्र ठरते.


व्यक्तिगत प्रयत्नांना आर्थिक, शारीरिक, वैचारिक आणि दूरगामी सामाजिक परिणाम घडविण्याच्या मर्यादा असतात. एखाद्या व्यक्तीला अडवणे, तिच्यावर दबाव आणणे, छळ करणे किंवा तिच्या कार्याचा बिमोड करणे विरोधकांना तुलनेने सोपे असते. परंतु संघटित समाजशक्तीसमोर ही प्रक्रिया तितकी सोपी राहत नाही. म्हणूनच संघटन ही केवळ संख्येची नव्हे, तर सामूहिक शक्तीची गरज आहे.


मात्र अनेकदा बिनकामाच्या गर्दीलाच संघटन समजण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे. गर्दी आणि संघटन यात मूलभूत फरक आहे. गर्दीला दिशा नसते; संघटनेला विचार, ध्येय, शिस्त, कार्यक्रम आणि कृतीची दिशा असते. त्यामुळे नावापुरत्या अनेक संघटना अस्तित्वात असूनही त्या प्रत्यक्ष सामाजिक कार्यात मृतावस्थेत खितपत पडलेल्या दिसतात.


खऱ्या संघटनेचा क्रम स्पष्ट असायला हवा. प्रथम विचारधारा → ध्येय → धोरण → कृतिकार्यक्रम → संघटन → अंमलबजावणी → मूल्यांकन.


विचारधारेबाबत स्पष्टता हा या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. संघटनेचे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक धोरण काय आहे, याचे स्पष्ट आकलन पदाधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे.


विचारधारेचे आकलन अस्पष्ट असेल, तर भूमिका अस्पष्ट होतात; अस्पष्ट भूमिकांमधून लवंडे निर्माण होतात आणि शेवटी संघटनेची दिशा भरकटते. त्यामुळे केवळ पद धारण करणे पुरेसे नाही; पदाधिकाऱ्यांकडे वैचारिक पात्रताही असली पाहिजे.


यासाठी संघटनेने नियमित वैचारिक प्रशिक्षण, अभ्यासवर्ग, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि कृतिकार्यक्रमांचे परीक्षण आयोजित केले पाहिजे. मात्र पदाधिकाऱ्यांनी केवळ संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांवर अवलंबून न राहता, स्वतःहूनही संबंधित विचारधारेचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे. कारण मजबूत संघटना केवळ संख्येने तयार होत नाही.


विचारांची स्पष्टता, ध्येयाची निश्चितता, धोरणाची सुसंगती, कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण आणि संघटित कृती यातूनच परिवर्तनक्षम संघटना उभी राहते

बुद्ध धम्म : मूल्यव्यवस्था, मनाचे संस्कार आणि सामाजिक परिवर्तन

 



बुद्ध धम्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून एक मूल्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मूल्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि तिचे संरक्षण करण्यासाठी काही नियम व आचारसंहिता आवश्यक असतात. मात्र, बुद्ध धम्म केवळ बाह्य नियमांवर विसंबून राहत नाही; तो माणसाच्या मनाला संस्कारित करण्याचा प्रयत्न करतो. या मन:संस्कारासाठी बुद्धांनी पंचशील, अष्टशील आणि अष्टांगिक मार्गातील सम्यक जीवनमार्गाची मांडणी केली. कारण केवळ नियम सांगून माणसाच्या वर्तनात स्थायी परिवर्तन घडत नाही. त्यासाठी योग्य दृष्टी, योग्य विचार, योग्य आचार आणि योग्य जीवनपद्धती विकसित होणे आवश्यक आहे. म्हणूनच बुद्ध धम्मात शील हे केवळ बाह्य बंधन नसून अंतर्गत मूल्यांचे प्रकटीकरण आहे.माणसाने एखादी गोष्ट केवळ शिक्षा होईल म्हणून करू नये, तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे, तिच्यामुळे स्वतःचे आणि इतरांचे नुकसान होते, हे अंतर्मनाने समजून ती टाळावी. बाह्य नियमांपासून अंतर्गत नैतिकतेकडे होणारा हा प्रवास बुद्ध धम्माच्या मन:संस्काराच्या भूमिकेला स्पष्ट करतो. त्यामुळे बुद्ध धम्म हा केवळ श्रद्धेचा भाग नाही; तो प्रथमतः आणि अंतिमतः आचरणाचा भाग आहे. त्याचा केंद्रबिंदू केवळ “कशावर विश्वास ठेवायचा?” हा नसून “कसे जगायचे?”, “इतरांशी कसे वागायचे?” आणि “स्वतःच्या मनाचे संस्कार कसे करायचे?” हा आहे. याच अर्थाने बुद्ध धम्म माणसाला केवळ नियमांचे पालन करणारा बनवत नाही, तर शीलवान, प्रज्ञावान, करुणाशील आणि जबाबदार माणूस बनवण्याचा प्रयत्न करतो.


इहवाद आणि आध्यात्मिकता

बुद्धांचा धम्म मूलतः इहवादी आणि अनुभवाधिष्ठित आहे. मानवी जीवनातील दुःख, त्याची कारणे आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग यांचा विचार बुद्धांनी मानवी अनुभवाच्या संदर्भात केला. अनात्म, अनित्यता, कर्म, प्रतीत्यसमुत्पाद आणि निर्वाण यांसारख्या संकल्पनांद्वारे मानवी अस्तित्व, दुःख आणि त्यातून मुक्ती यांचा विचार केला जातो. या विचारपद्धतीसाठी एखाद्या सर्वशक्तिमान निर्मात्या ईश्वराची किंवा विश्वाच्या स्पष्टीकरणासाठी अधिभौतिक शक्तीची आवश्यकता बुद्धांच्या धम्मात केंद्रस्थानी नाही.मात्र, इहवाद म्हणजे आध्यात्मिकतेचा अभाव नव्हे. बुद्ध धम्माची आध्यात्मिकता ही एखाद्या अदृश्य किंवा अधिभौतिक जगाच्या शोधात नसून माणसाच्या अंतर्मनाच्या परिवर्तनात आहे. मनातील लोभ, द्वेष आणि मोह कमी करून प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि समतेची जाणीव विकसित करणे ही धम्माची आध्यात्मिक दिशा आहे. या अर्थाने बुद्ध धम्मातील आध्यात्मिकता ही परलोकाभिमुख नसून मानवकेंद्री आणि जीवनाभिमुख आहे. धम्माचा केंद्रबिंदू माणसाच्या वर्तमान जीवनात आहे. त्याच्या मनात, त्याच्या आचरणात आणि त्याच्या इतर माणसांशी असलेल्या संबंधांत आहे.


धम्म : नैतिक-सामाजिक मूल्यव्यवस्था

बुद्धांच्या संदर्भात “धम्म” ही संकल्पना केवळ पारंपरिक अर्थाने अध्यात्म किंवा ईश्वरावरील श्रद्धा म्हणून समजणे अपुरे ठरेल. धम्म हा नैतिक जीवनपद्धती, मानवी मूल्यव्यवस्था आणि सामाजिक सहजीवनाला दिशा देणारा विचार म्हणून समजता येतो.म्हणूनच बाबासाहेब डॉ. आंबेडकरांनी बुद्धांकडे केवळ चमत्कारिक किंवा पारलौकिक आध्यात्मिक गुरु म्हणून पाहिले नाही. त्यांनी बुद्धांच्या विचारांमध्ये मानवी स्वातंत्र्य, समता, बंधुता, नैतिकता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा पाहिली.बाबासाहेबांच्या विचारात सामाजिक परिवर्तनासाठी केवळ बाह्य सामाजिक किंवा आर्थिक रचना बदलणे पुरेसे नाही. माणसाच्या मनाचा विकास आणि त्याचे सुसंस्करणही तितकेच आवश्यक आहे.कारण भौतिक परिस्थिती बदलली, आर्थिक साधनांचे वाटप बदलले किंवा सामाजिक रचना बदलली, पण माणसाच्या मनातील लोभ, द्वेष, अहंकार, असमानतेची भावना आणि शोषणाची वृत्ती कायम राहिली, तर सामाजिक परिवर्तन अपूर्ण राहू शकते. म्हणूनच मानवी उन्नती ही केवळ आर्थिक किंवा भौतिक उन्नती नसून भौतिक आणि नैतिक अशा दोन्ही पातळ्यांवरील उन्नती असली पाहिजे.बुद्ध धम्माचा इहवाद माणसाला या जगाकडे पाहायला शिकवतो; त्याची नैतिकता त्याला या जगात कसे जगायचे ते शिकवते; आणि त्याची आध्यात्मिकता माणसाच्या मनाचे परिवर्तन घडवते.

आपण बौद्ध म्हणून समाज म्हणून एकत्र येतो का?

 



आज आपण इतरांच्या सणांवर, परंपरांवर आणि धार्मिक संस्कृतीवर टीका करण्यात बराच वेळ घालवतो. पण त्याआधी एक मूलभूत प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे.


आपण बौद्ध म्हणून, एक समाज म्हणून किती एकत्र आलो आहोत?


आजच्या परिस्थितीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिले तर, बुद्ध-धम्माची सामाजिक आणि सांस्कृतिक मांडणी व्यापक समाजजीवनात रुजवण्यासाठी सातत्याने चालणारे उपक्रम अनेक ठिकाणी दिसत नाहीत. मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारखी काही केंद्रे निश्चितच सक्रिय आहेत; पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यापक सामाजिक पटावर पाहिले तर धम्म-संस्कृती अजूनही मर्यादित भौगोलिक आणि संघटनात्मक चौकटीत अडकलेली आहे.


बौद्ध होणे म्हणजे केवळ धर्मांतराची घटना नव्हे.

बौद्ध होणे म्हणजे नवीन सामाजिक संस्कृती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे.


आपल्या मुलांना बुद्धांची मूल्ये कोणत्या माध्यमातून मिळत आहेत?

आपल्या वस्त्या, गावांमध्ये धम्मकेंद्रे किती आहेत?

तरुणांसाठी अभ्यासवर्ग, वाचनालये, सांस्कृतिक उपक्रम, व्याख्यानमाला, धम्मशिबिरे किती सातत्याने चालतात?

बौद्ध सण आणि स्मृतिदिन केवळ कार्यक्रम न राहता त्यातून सामाजिक बंधुभाव, समता, विवेक आणि संघटन किती निर्माण होते?

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे; आपल्या समाजातील लोकांना एकत्र आणणारी दैनंदिन सामाजिक रचना आपण उभी केली आहे का?


हे प्रश्न इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःला विचारणे अधिक महत्त्वाचे आहे.


कारण एखाद्या समाजाची सांस्कृतिक ताकद केवळ तो कोणत्या परंपरेला नाकारतो यावर ठरत नाही;

तो स्वतःची कोणती पर्यायी मूल्यव्यवस्था उभी करतो, यावर ठरते.


म्हणून इतरांच्या सणांवर टीका करण्यापूर्वी आपण आपल्या धम्म-संस्कृतीच्या प्रसाराकडे पाहिले पाहिजे. इतकंच

अनेक शिक्षण संस्थांची स्थापना 🏫

 



जीवनात केलेल्या संघर्षामुळे बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले होते. त्यामुळे ते सर्व त्रास विसरून उच्चतम शिक्षण घेण्यात व्यस्त राहिले. त्यांना जेवण मिळो की न मिळो, पण पुस्तके मिळाली पाहिजेत असे त्यांचे धोरण होते. जेवणाच्या पैशातून ते पुस्तके विकत घेत होते. त्यांच्या ग्रंथालयात सर्व विषयांचे हजारो ग्रंथ होते. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथसुद्धा होते. हे ग्रंथ त्यांनी अनेक देशांतून विकत घेतले होते.


      ज्याप्रमाणे मला शिक्षण मिळाले त्याप्रमाणे इतरांनाही मिळाले पाहिजे हा विचार करून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेने मुंबईमध्ये जून १९४६ साली सिद्धार्थ कॉलेज, ऑगस्ट १९५१ मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले. दलित समाजातील युवकांना उच्च शिक्षण करण्यासाठी डॉ.आंबेडकर सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविले होते. समाजात आज जी प्रगती दिसून येत आहे ती बाबासाहेबांनी शिक्षणावर भर दिल्यामुळेच झाली यात काही शंका नाही.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिंचित केलेल्या ज्ञानवृक्षाचा विस्तार!


​'सेव्ह पीईएस' मोहिमेच्या अंतर्गत, संस्थेच्या देशभरातील शाळा-महाविद्यालयांची त्यांच्या स्थापना वर्षासह संपूर्ण यादी आपल्या महितीस्तव देत आहोत :


​🏢 मुंबई 

​सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई : १९४६

​सिद्धार्थ नाईट हायस्कुल, मुंबई : १९४६

​सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई : १९५३

​सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई : १९५६

​डॉ. आंबेडकर वाणिज्य, अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा : १९५६

​डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा : १९७१

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट : १९७८

​लीगल रिसर्च सेंटर, वडाळा, मुंबई : १९९०


​🏢 नवी मुंबई 

​पी.ई.एस. सेकंडरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज : १९७८

​पी.ई.एस. प्रायमरी मराठी शाळा : १९७८

​पी.ई.एस. सेंट्रल स्कूल : १९७८

​पी.ई.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन  : १९७८


​🏢 छत्रपती संभाजीनगर 

​मिलिंद कला महाविद्यालय : १९५०

​मिलिंद विज्ञान महाविद्यालय : १९५०

​मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल : १९५५

​मिलिंद प्री-प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश स्कूल : १९५५

​डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय : १९६३

​मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, सिडको : १९६५

​डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय : १९६८

​पी.ई.एस. कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन : १९८४

​पी.ई.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग : १९९४

​पी.ई.एस. पॉलिटेक्निक : २०१०


​🏢 पुणे 

​पी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, येरवडा : १९७८

​डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, येरवडा : १९८५


​🏢 महाड 

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाड (रायगड) : १९६३


​🏢 नांदेड 

​नागसेन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज : १९८१

​नागसेन विद्यालय प्राथमिक शाळा : १९८१


​🏢 पंढरपूर 

​गौतम विद्यालय, पंढरपूर (सोलापूर) : १९७८


​🏢 बँगलोर, कर्नाटक 

​पी.ई.एस. नागसेना विद्यालय, बँगलोर : १९८४

​पी.ई.एस. बुद्धिस्ट सेमिनरी, बँगलोर : २००४


​🏢 बोधगया, बिहार 

​डॉ. बी. आर. आंबेडकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, बोधगया : २००८


नालंदा शाखेने ०४ ऑक्टोबर, २०२६ रोजी या महाविद्यायाला भेट दिली तो क्षण.

माल्कम एक्सचा ‘हाऊस नीग्रो’ आणि भारतीय जातिव्यवस्थेतील मानसिक गुलामगिरी.

माल्कम एक्सचा ‘हाऊस नीग्रो’ आणि भारतीय जातिव्यवस्थेतील मानसिक गुलामगिरी.

 

Uploading: 2756290 of 2756290 bytes uploaded.


अमेरिकेतील कृष्णवर्णीय मुक्तीच्या संघर्षात माल्कम एक्स आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या भूमिका अनेक बाबतीत वेगळ्या होत्या.


मार्टिन ल्यूथर किंग यांचा भर अहिंसक प्रतिकार, नैतिक दबाव, समान नागरिकत्व आणि व्यापक सामाजिक परिवर्तनावर होता. त्यांना गोऱ्या समाजातील विवेकबुद्धीला आवाहन करून अन्यायाविरुद्ध उभे करायचे होते. त्यांनी स्पष्टपणे गोऱ्या समाजातील सहृदय लोकांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. 


माल्कम एक्सचा दृष्टिकोन अधिक मूलगामी होता. त्याने “हाऊस नीग्रो” आणि “फील्ड नीग्रो” ही रूपकं वापरून गुलामगिरीतील दोन मानसिक अवस्थांचे चित्र उभे केले.


हाऊस नीग्रो हा मालकाच्या जवळ राहत असे. त्याला तुलनेने चांगले अन्न, कपडे आणि सुविधा मिळत. त्यामुळे त्याची ओळख हळूहळू मालकाच्या ओळखीशी जोडली जात असे. मालक “आपले घर” म्हणाला की तोही “आपले घर” म्हणत असे.


त्याच्या उलट फील्ड नीग्रो हा गुलामगिरीच्या कठोर वास्तवात जगत होता. त्याला मालकाच्या व्यवस्थेत आपले भविष्य दिसत नव्हते; त्यामुळे त्याची आकांक्षा त्या व्यवस्थेत अधिक चांगली जागा मिळवण्याची नव्हे, तर तिच्यापासून मुक्त होण्याची होती.


माल्कम एक्सने हे केवळ गुलामगिरीच्या इतिहासाचे वर्णन म्हणून केले नव्हते. त्याने आधुनिक कृष्णवर्णीय समाजातील ओळख, सत्ता आणि मानसिक गुलामगिरीचे राजकारण समजावण्यासाठी हे रूपक वापरले.


याच ठिकाणी भारतीय जातिव्यवस्थेकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.

भारतातील काही दलित व्यक्ती किंवा समूह जेव्हा स्वतःच्या सामाजिक मुक्तीपेक्षा ब्राह्मणी व्यवस्थेची मान्यता, तिचे सांस्कृतिक निकष, तिची प्रतिष्ठा आणि तिच्या सत्ताकेंद्रांशी जवळीक यांना प्राधान्य देतात, तेव्हा त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण माल्कम एक्सच्या “हाऊस नीग्रो” या रूपकातून करता येऊ शकते.


इथे मुद्दा एखाद्या व्यक्तीच्या ब्राह्मण व्यक्तीशी असलेल्या संबंधांचा नाही.

मुद्दा आहे; व्यवस्थेशी असलेली वैचारिक नाळ. जर एखाद्याला स्वतःचा इतिहास कमीपणाचा आणि ब्राह्मणी इतिहास श्रेष्ठ वाटू लागला;

स्वतःची संस्कृती मागास आणि ब्राह्मणी संस्कृती प्रमाण वाटू लागली;

स्वतःच्या सौंदर्याच्या, ज्ञानाच्या आणि नैतिकतेच्या निकषांपेक्षा ब्राह्मणी निकष श्रेष्ठ वाटू लागले;

ब्राह्मणी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्या व्यवस्थेकडून मिळणारी मान्यता, पद, प्रतिष्ठा किंवा संरक्षण महत्त्वाचे वाटू लागले;

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यवस्थेविरुद्ध सामाजिक मुक्तीचा संघर्ष उभा राहिला, त्याच व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी शोषित समाजातील व्यक्ती पुढे येऊ लागली.

तर प्रश्न व्यक्तीचा नसून त्या मानसिकतेचा आहे.


हीच मानसिकता माल्कम एक्सच्या “हाऊस नीग्रो” या रूपकाच्या जवळ जाते.कारण गुलामगिरी किंवा जातिव्यवस्था केवळ बाह्य बंधनांनी टिकत नाही. ती शोषितांच्या मनात शोषकांचे मूल्य श्रेष्ठ असल्याची भावना निर्माण करूनही टिकते.

म्हणून मुक्ती म्हणजे केवळ सत्ता-संरचनेत प्रवेश मिळवणे नाही.

मुक्ती म्हणजे स्वतःची ओळख, इतिहास, ज्ञान, सौंदर्य, नैतिकता आणि भविष्य यांचे निकष स्वतः ठरवण्याची क्षमता निर्माण करणे.


बाबासाहेबांच्या संपूर्ण संघर्षाकडे पाहिले तर त्यांच्या भूमिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा बदल दिसून येतो.


सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदू समाजाच्या चौकटीत राहून अस्पृश्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अस्पृश्यांवर होणारा अन्याय, अत्याचार, भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार यांना त्यांनी वाचा फोडली. मंदिरप्रवेश, सार्वजनिक पाण्याचे स्रोत, शिक्षण, रोजगार, सार्वजनिक सुविधा आणि समान नागरी हक्क यांसाठी त्यांनी संघर्ष उभा केला.

त्या टप्प्यावर प्रश्न असा होता की, 

“हिंदू समाजात जन्माला आलेल्या अस्पृश्यांना हिंदू म्हणून समान अधिकार का मिळू नयेत?”

म्हणूनच महाडचा चवदार तळे सत्याग्रह, मंदिरप्रवेशाचा संघर्ष आणि इतर चळवळी या केवळ प्रतीकात्मक नव्हत्या. त्या हिंदू समाजाला त्याच्या स्वतःच्या नैतिक दाव्यांसमोर उभे करणाऱ्या चळवळी होत्या. 


परंतु अनुभव वाढत गेला तसे बाबासाहेबांच्या प्रश्नाची दिशाच बदलत गेली. प्रश्न केवळ असा राहिला नाही की “अस्पृश्यांना हिंदू धर्मात समान स्थान का नाही?”

प्रश्न पुढे झाला की,  “ज्या सामाजिक-धार्मिक रचनेत अस्पृश्यता आणि जातिभेद पुनःपुन्हा निर्माण होतात, त्या रचनेत राहून खरोखर मुक्ती शक्य आहे का?”आणि इथून बाबासाहेबांच्या विचारांचा निर्णायक टप्पा सुरू होतो.


१९३५ मध्ये येवला येथे त्यांनी जाहीर केले. “मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.”


बाबासाहेबांनी हिंदू धर्म, आपली पूर्वीची धार्मिक ओळख सार्वजनिकपणे नाकारून नवी सामाजिक आणि नैतिक ओळख स्वीकारली. २२ प्रतिज्ञांमध्ये याचे अत्यंत स्पष्ट प्रतिबिंब दिसते.


पहिल्या काही प्रतिज्ञांमध्ये हिंदू देवदेवतांवरील श्रद्धा नाकारणे, हिंदू धार्मिक विधी नाकारणे आणि ब्राह्मणांकडून धार्मिक विधी न करवून घेण्याची प्रतिज्ञा आहे.


त्याचा अर्थ असा देखील आहे. 

“ज्या व्यवस्थेने आम्हाला कनिष्ठ ठरवले, त्या व्यवस्थेकडून मान्यता मिळवण्यासाठी आम्ही आता संघर्ष करणार नाही; आम्हीच आमची नवी ओळख, नवी नैतिकता आणि नवे सामाजिक, सांस्कृतिक जग निर्माण करू.”


म्हणूनच बाबासाहेब रमाईस म्हणतात; “आपली पंढरी निर्माण करू” १९५६ ला ते म्हणतात माझा नवा जन्म झाला आहे असे मी मानतो. 

इथेच बाबासाहेबांचा संघर्ष आणि माल्कम एक्सच्या “हाऊस नीग्रो” या रूपकात एक विचारसाम्य दिसू शकते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदूही केवळ “सत्तेत वाटा” मिळवणे नव्हता; सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या रचनेचे मूलभूत परिवर्तन हा त्यांचा प्रश्न होता. म्हणूनच आज दलित चळवळीसमोर एक कठीण आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे: आपण ब्राह्मणी व्यवस्थेत जागा मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहोत, की ब्राह्मणी वर्चस्व संपवून समता निर्माण करण्यासाठी?


कारण व्यवस्थेच्या घरात प्रवेश मिळणे आणि घराची रचना बदलणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सत्तेच्या जवळ जाणे म्हणजे मुक्ती नव्हे. सत्तेच्या मूल्यांना प्रश्न न विचारता त्यांच्यात स्वतःला सामावून घेणे म्हणजे प्रतिनिधित्व नव्हे. आणि शोषक व्यवस्थेकडून मिळालेली मान्यता ही स्वाभिमानाची हमी नसते.


मुक्तीचा खरा प्रश्न हा आहे. आपण स्वतःला कोणाच्या नजरेतून पाहतो? जर स्वतःला पाहण्यासाठीही शोषक व्यवस्थेची मान्यता आवश्यक वाटत असेल, तर बाह्य गुलामगिरी संपली असली तरी मानसिक गुलामगिरीचा प्रश्न अजून संपलेला नाही.


म्हणूनच आजचा प्रश्न “हाऊस नीग्रो कोण?” हा नसून अधिक खोल आहे

Saturday, 12 September 2026

🌿 संगत — माणसाच्या जीवनाची दिशा ठरवणारी शक्ती


 

भगवान बुद्धांनी माणसाच्या जीवनात संगतीचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. धम्मपदाच्या पंडितवग्गातील ७८वी गाथा म्हणते—


न भजे पापकं मित्रं,

न भजे पुरिसाधमं ।

भजेथ मित्रे कल्याणे,

भजेथ पुरिसुत्तमे ॥


अर्थ :

दुराचारी मित्राची संगत करू नये; अधम माणसाची संगत करू नये. कल्याणकारी मित्राची संगत करावी; उत्तम आणि श्रेष्ठ माणसांची संगत करावी. 


ही केवळ नैतिक शिकवण नाही. बुद्धांच्या दृष्टीने संगत ही आपल्या मनावर आणि आचरणावर परिणाम करणारी सामाजिक शक्ती आहे.


संगत म्हणजे केवळ सोबत राहणे नव्हे


आपण ज्यांच्यासोबत वारंवार राहतो, ज्यांचे विचार ऐकतो, ज्यांच्या वर्तनाला मान्यता देतो आणि ज्यांच्याकडून आपण प्रभावित होतो, त्यांच्या विचारांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो.


वाईट संगतीमध्ये राहिल्यास चुकीच्या गोष्टी हळूहळू सामान्य वाटू लागतात.


खोटे बोलणे — चातुर्य वाटू लागते.

स्वार्थ — व्यवहारकुशलता वाटू लागतो.

द्वेष — पराक्रम वाटू लागतो.

व्यसन — मनोरंजन वाटू लागते.

अन्याय — व्यवहाराचा भाग वाटू लागतो.


म्हणूनच बुद्धांचा प्रश्न फक्त “तुमचे मित्र कोण आहेत?” असा नाही; तर त्यामागे अधिक गंभीर प्रश्न आहे.


“तुमच्या मित्रांमुळे तुम्ही कोण बनत आहात?”


कल्याणमित्र म्हणजे कोण?


बौद्ध परंपरेत कल्याणमित्र (Kalyāṇa-mitta) ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.


कल्याणमित्र म्हणजे केवळ आपल्याला आवडणारा किंवा आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा मित्र नव्हे. तो असा मित्र आहे जो आपल्याला अकुशलापासून दूर आणि कुशलाकडे नेतो.


धम्मपदाच्या लगेच आधीच्या ७६व्या गाथेत बुद्ध अशा व्यक्तीचे वर्णन करतात; जो आपल्या चुका दाखवतो, योग्य मार्ग सांगतो आणि जणू लपलेला खजिना दाखवावा तसे आपल्याला मार्गदर्शन करतो.

म्हणजेच,

जो तुमच्या प्रत्येक चुकीला “बरोबर” म्हणतो तो खरा मित्र असेलच असे नाही.

जो तुमची चूक दाखवतो आणि तुम्हाला अधिक चांगला माणूस बनण्यास मदत करतो, तोच खरा कल्याणमित्र.


तर त्याचा अधिक व्यापक अर्थ असा आहे.


“ज्या संगतीमुळे तुमच्यातील माणूस अधिक चांगला, अधिक विवेकी आणि अधिक करुणामय होतो. ती संगत जपा.”

Monday, 27 July 2026

विद्यार्थी आंदोलन : एका राजीनाम्यापलीकडचे काही महत्त्वाचे संकेत


शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा तात्कालिक यश व परिणाम असला, तरी या आंदोलनाचे महत्त्व केवळ एका राजीनाम्यापुरते मर्यादित नाही. कोणतेही आंदोलन केवळ त्याच्या तात्काळ फलश्रुतीवर मोजता येत नाही. अनेकदा त्याचे दूरगामी सामाजिक, राजकीय आणि वैचारिक परिणाम पुढील काही वर्षांत दिसून येतात. या विद्यार्थी आंदोलनानेही असेच काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

१. लोकशाही अजूनही जिवंत आहे.

गेल्या काही वर्षांत अनेकांना असे वाटू लागले होते की आंदोलने करून फारसा परिणाम होत नाही. निर्णय आधीच ठरलेले असतात आणि जनतेचा आवाज फारसा ऐकला जात नाही, अशी भावना समाजात निर्माण झाली होती. या आंदोलनाने किमान एवढे दाखवून दिले की, संघटित, सातत्यपूर्ण आणि लोकशाही मार्गाने उभारलेला संघर्ष सत्तेला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यामुळे लोकशाहीवरील विश्वास काही प्रमाणात दृढ झाला आहे.

२. विरोधी राजकारणाला ऊर्जा मिळू शकते.

या आंदोलनामुळे विरोधी पक्षांना नवसंजीवनी मिळू शकते. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की, जनतेला आजही सक्षम आणि प्रभावी विरोधी पक्षाची गरज वाटते. लोकशाही केवळ सत्ताधारी पक्षावर उभी राहत नाही; तर सत्तेला प्रश्न विचारणारा आणि पर्याय देणारा मजबूत विरोधही तितकाच आवश्यक असतो. या आंदोलनाने ती गरज पुन्हा अधोरेखित केली. विकास केवळ सत्ताधारी नाही विरोधात राहुनही करता येतो.

३. "जय भीम"चा वाढता सामाजिक स्वीकार, प्रश्नाधारित राजकारण आणि बदलता राष्ट्रवाद

या आंदोलनातील सर्वात सकारात्मक बाबांपैकी एक म्हणजे "जय भीम" या अभिवादनाचा वाढता स्वीकार. आजची तरुण पिढी जात-धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन संविधान, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांशी स्वतःला जोडताना दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून भारतीय लोकशाहीचे वैचारिक अधिष्ठान आहेत, याची जाणीव अधिक व्यापक होत असल्याचे हे लक्षण मानता येईल.

याच आंदोलनातून सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू बदलताना दिसला. जात, धर्म, भाषा किंवा प्रांत यापेक्षा परीक्षा, शिक्षण, रोजगार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे प्रश्न केंद्रस्थानी राहिले. मंदिर-मशीद, धार्मिक ध्रुवीकरण किंवा ओळख-आधारित राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य दिले.

यामुळे भारतीय राजकारणात प्रश्नाधारित (Issue Based Politics) राजकारणाला नवी दिशा मिळू शकते, असे संकेत या आंदोलनातून दिसतात. पुढील काळात राजकीय पक्षांनाही शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था आणि सुशासन यांसारख्या प्रश्नांवर अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल असे वाटते.

त्याचबरोबर राष्ट्रवादाच्या संकल्पनेतही काही बदल जाणवतात. धार्मिक किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादापेक्षा संविधान, लोकशाही, समान संधी आणि नागरिकांचे अधिकार यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राष्ट्रवादाचा स्वीकार करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. या सर्व घडामोडी पाहता भविष्यात भारतीय राजकारण धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित प्रश्नांभोवती अधिक फिरू लागेल का, हा प्रश्न उपस्थित होतो.

४. नेतृत्वाच्या स्वीकारातील सामाजिक बदल

या आंदोलनातून आणखी एक महत्त्वाचा सामाजिक संकेत मिळाला. अभिजीत दीपके हे महाराष्ट्रातील दलित समाजातून आलेले विद्यार्थी नेतृत्व म्हणून पुढे आले आणि त्यांच्या नेतृत्वाला विविध जाती, धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनी स्वीकारले.

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या लोकप्रियतेची नाही. नेतृत्वाचे मूल्यमापन जातीपेक्षा संघर्ष, प्रामाणिकपणा आणि भूमिकेच्या आधारे करण्याची मानसिकता नव्या पिढीत विकसित होत असल्याचा हा सकारात्मक संकेत आहे.

५. Gen Z : या आंदोलनाचा खरा नायक

माझ्या मते, या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे आजची Gen Z पिढी.

या पिढीवर अनेकदा "ही फक्त सोशल मीडियाची पिढी आहे", "तिला सामाजिक प्रश्नांची जाणीव नाही", अशा टीका केल्या जातात. पण या आंदोलनाने तो समज चुकीचा ठरवला.

ज्या वातावरणात सत्ताधारी पक्ष प्रभावी आहे, विरोधी पक्ष कमकुवत असल्याची भावना आहे, मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात आणि राज्ययंत्रणा आंदोलनांविषयी कठोर भूमिका घेऊ शकते, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी एवढे व्यापक आणि परिणामकारक आंदोलन उभे करणे ही साधी गोष्ट नाही.

भारतीय इतिहासात विद्यार्थ्यांनी अनेक वेळा परिवर्तनाची सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यलढा, जेपी आंदोलन, आसाम आंदोलन, मंडल आंदोलन किंवा भ्रष्टाचारविरोधी चळवळी अनेक टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. या आंदोलनाने त्या परंपरेची पुन्हा आठवण करून दिली.

या आंदोलनाने डिजिटल युगातील आंदोलनांचे बदलते स्वरूपही स्पष्ट केले. हे आंदोलन कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाच्या स्पष्ट आदेशावर उभे राहिल्याचे निश्चितपणे म्हणता येत नाही. उलट सोशल मीडिया, डिजिटल नेटवर्किंग आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेतून ते देशभर विस्तारले. त्यामुळे भविष्यातील आंदोलने अधिक विकेंद्रित (Decentralised), डिजिटल आणि स्वयं-संघटित (Self Organised) असू शकतात, असा संकेत यातून मिळतो.

आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा मंच राहिलेला नाही. तो जनमत निर्माण करणारे प्रभावी लोकशाही माध्यम बनला आहे. पारंपरिक माध्यमांनी एखाद्या विषयाकडे कमी लक्ष दिले, तरी डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने लाखो तरुण काही तासांत एका समान प्रश्नाभोवती संघटित होऊ शकतात.

६. हे आंदोलन कोणाच्या प्रेरणेने होते?

या आंदोलनाबाबत विविध राजकीय दावे-प्रतिदावे होत आहेत. हे आंदोलन कोणत्या विचारसरणीने किंवा संघटनेने प्रेरित होते, यावर आज निश्चित निष्कर्ष / आरोप करणे योग्य ठरणार नाही.

आंदोलन प्रायोजित होते की स्वयंप्रेरणेने उभे राहिले, याचे उत्तर त्याच्या पुढील वाटचालीतून, नेतृत्वाच्या भूमिकेतून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांतून अधिक स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.

७. आंदोलने समाजपरिवर्तन घडवतात का?

याबाबत माझी भूमिका थोडी वेगळी आहे.

मुळात मी रस्त्यावरच्या आंदोलनांचा फारसा समर्थक नाही. माझ्या मते मनपरिवर्तन, विचारपरिवर्तन आणि मतपरिवर्तन हीच टिकाऊ परिवर्तनाची खरी साधने आहेत. सरकार बदलले म्हणून समाज बदलत नाही; समाज बदलतो तो विचार बदलल्याने.

आज या आंदोलनाची फलश्रुती एका मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या रूपाने दिसत आहे. हा लोकशाहीतील उत्तरदायित्वाचा भाग म्हणून महत्त्वाचा आहे. पण केवळ मंत्री बदलल्याने शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. NEET, शिक्षणाचे व्यापारीकरण, प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी आणि व्यवस्थेतील संरचनात्मक दोष तशाच राहतील.

याचा अर्थ आंदोलने निरर्थक आहेत, असा मात्र होत नाही. आंदोलने समाजाला प्रश्न विचारायला शिकवतात. ती जनमत तयार करतात. सत्तेला उत्तरदायी ठेवतात आणि लोकशाही जागी ठेवतात. मात्र कोणत्याही आंदोलनाचे अंतिम मूल्य त्यातून संस्था, धोरणे आणि व्यवस्थेत किती बदल घडतात यावर ठरते.

८. तिसऱ्या राजकीय आघाडीची चाहूल?

या आंदोलनातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. भारतीय राजकारणात तिसऱ्या पर्यायासाठी जागा निर्माण होत आहे का?

गेली अनेक दशके देशातील राजकारण प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आले आहे. अनेक मतदारांनी एका पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करून दुसऱ्या पक्षाला संधी दिली. परंतु काही मतदार, विशेषतः तरुण वर्ग, आता या पारंपरिक द्विध्रुवीय राजकारणापलीकडे पर्याय शोधताना दिसत आहेत.

माझ्या निरीक्षणानुसार, आजच्या तरुण पिढीला केवळ सत्ताबदल नको आहे; तिला राजकारणाची शैली, प्राधान्यक्रम आणि मूल्ये बदललेली पाहायची आहेत. रोजगार, शिक्षण, सामाजिक न्याय, पारदर्शकता, उत्तरदायित्व, संविधान आणि लोकशाही या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा या पिढीकडून व्यक्त होताना दिसते.

यामुळे एक प्रश्न निर्माण होतो. भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेवणारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर उभी राहणारी नवी राजकीय आघाडी किंवा प्रवाह आकार घेत आहे का?

या प्रश्नाचे उत्तर आज निश्चित देता येणार नाही. परंतु या आंदोलनाने किमान एवढे दाखवून दिले आहे की, नव्या पिढीतील काही तरुण पारंपरिक राजकीय चौकटींपलीकडे विचार करण्यास तयार आहेत. ते व्यक्तिपूजेपेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण, संविधाननिष्ठ भूमिका आणि उत्तरदायी शासन यांची अपेक्षा करतात.

जर ही ऊर्जा पुढे संघटित वैचारिक चळवळीत, सामाजिक कार्यात आणि पर्यायी राजकीय नेतृत्वात रूपांतरित झाली, तर भारतीय राजकारणात तिसऱ्या वैचारिक पर्यायाची जागा अधिक मजबूत होऊ शकते.

९. पुढचा मार्ग

या आंदोलनाने एक संधी निर्माण केली आहे. आता ही ऊर्जा केवळ एका राजीनाम्यापुरती मर्यादित न राहता शिक्षणव्यवस्थेतील धोरणात्मक सुधारणा, संविधाननिष्ठ विचार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तरदायी शासन आणि सामाजिक जागृती याकडे वळली, तरच या आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होईल.

इतिहास सांगतो की समाज केवळ सत्ताबदलाने बदलत नाही; तो विचारबदलाने बदलतो.

म्हणूनच माझ्या दृष्टीने या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय एका मंत्र्यांचा राजीनामा नसून, संविधान, लोकशाही, समता आणि उत्तरदायित्व यांवर विश्वास ठेवणारी, जात-धर्माच्या चौकटींपलीकडे विचार करणारी आणि शांततापूर्ण पद्धतीने संघटित होऊन प्रश्न विचारणारी नवी तरुण पिढी देशासमोर उभी राहत आहे, हा आहे

Saturday, 18 July 2026

एनजीओ वृत्तीचे अराजकीय नेतृत्व आणि परिवर्तनवादी राजकारण

 

एनजीओ वृत्तीचे अराजकीय नेतृत्व आणि चळवळी यांच्याकडे नेहमी चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे. अशा हस्तक्षेपांमुळे अनेकदा मूळ राजकीय प्रश्न दुय्यम ठरतात. तात्कालिक समस्यांवर उपाय शोधले जातात; परंतु अन्याय निर्माण करणाऱ्या सत्तासंबंधांवर आणि व्यवस्थेवर आवश्यक तेवढा प्रहार होत नाही. परिणामी, सक्षम, स्वायत्त आणि परिवर्तनवादी राजकीय नेतृत्व उभे राहण्याची प्रक्रिया कमकुवत होऊ शकते.

मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांनी नर्मदा खोऱ्यातील विस्थापित व आदिवासींच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मात्र, या संदर्भात असा युक्तिवादही मांडला जातो की, बाहेरून होणारा हस्तक्षेप काही वेळा स्थानिक समाजातून नेतृत्वाची नैसर्गिक उभारणी मर्यादित करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “आई” आणि “दाई” यांतील फरक सांगताना याच मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. त्यांचा आशय असा होता की, समाजाची मुक्ती आणि शाश्वत उन्नती त्या समाजाच्या स्वतःच्या नेतृत्वातूनच अधिक प्रभावीपणे घडते.

आंदोलनांमुळे जनजागृती, संघटन आणि सत्तेवर दबाव निर्माण होऊ शकतो; परंतु केवळ आंदोलनांमधून नवी व्यवस्था निर्माण होत नाही. काही वेळा अशी आंदोलने हिंसक वळणही घेऊ शकतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपोषण, कायदेभंग आणि संसदीय लोकशाहीला बगल देणाऱ्या आंदोलनात्मक मार्गांना “अराजकतेचे व्याकरण” असे संबोधत त्यांच्याविषयी गंभीर इशारा दिला होता.

म्हणूनच, जर राजकीय स्थित्यंतर घडवायचे असेल, तर केवळ सत्ताबदल पुरेसा ठरत नाही. त्या स्थित्यंतराची राजकीय वृत्ती, मूल्याधिष्ठान आणि दिशा आधी निश्चित केली पाहिजे. अन्यथा बदलाच्या नावाखाली जुन्याच सत्ताकेंद्रांना किंवा अवलंबित्वाच्या नव्या रूपांना बळ मिळण्याचा धोका कायम राहतो. अण्णा आंदोलनानंतरच्या राजकीय घडामोडींकडे अनेक जण या संदर्भात उदाहरण म्हणून पाहतात.

मुळात, जीवननिष्ठेची सांस्कृतिक ब्राह्मणी चौकट कायम ठेवूनही परिवर्तनवादी चळवळी किंवा आंदोलने उभी राहू शकतात. ती काही काळासाठी प्रचंड जनउत्साह, भावनिक लाट आणि सनसनाटी वातावरण निर्माण करू शकतात. मात्र, अशा चळवळी समाजबदलासाठी आवश्यक असलेले मूलगामी परिवर्तन घडवून आणतील, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

कारण सामाजिक परिवर्तनासाठी केवळ सत्ताबदल किंवा एखाद्या प्रश्नावरील आंदोलन पुरेसे नसते. त्यासाठी मूल्यव्यवस्था, जीवनदृष्टी, सत्तासंबंध आणि सांस्कृतिक वर्चस्व यांच्यावर मूलभूत चिकित्सा आवश्यक असते. जर सांस्कृतिक आणि वैचारिक चौकट पूर्ववतच राहिली, तर परिवर्तनाच्या नावाखाली व्यवस्थेचे केवळ बाह्य रूप बदलते; अन्यायाची मुळे मात्र तशीच कायम राहतात.

म्हणूनच परिवर्तनवादी राजकारणाचे मूल्यांकन करताना केवळ आंदोलनाचा आकार, जनसमर्थन किंवा तात्कालिक यश यांवर न थांबता, त्या चळवळीची वैचारिक दिशा, सांस्कृतिक भूमिका आणि समाजात उभे राहणारे स्वायत्त नेतृत्व यांचाही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

Monday, 6 July 2026

विपश्यना

 


मी विपश्यना प्रकारावर लिहिण्याचे अनेकदा टाळले आहे. परिवर्तनवादी मित्र दुखावले जावु नयेत म्हणुन; परंतु गेल्या पंधरा दिवसांत पाली भाषा व साहित्य संबंधी प्रवचन ऐकताना मला काही मुलभूत प्रश्न पडले. ते प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेले विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेखप्रपंच.


त्या शिबिरात अरहंत होण्यासाठी चमत्कार (जादू) दाखवणे ही कसोटी होती, असे उदाहरणासह सांगण्यात आले. बुद्धपूर्वी २८ (सम्यक) बुद्ध होऊन गेले आणि प्रत्येक जन्माचा दुसऱ्या जन्माशी संबंध होता, असेही सांगितले गेले. तसेच बुद्धत्वाच्या सोतापन्न → सकृदागामी → अनागामी अशा पायऱ्या असतात, असेही मांडण्यात आले. विपश्यना केल्याने "पॉझिटिव्ह एनर्जी" जाणवते, हाही एक मुद्दा सांगितला गेला.


या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात.


१. अरहंत होण्यासाठी चमत्कार दाखवणे ही कसोटी होती, असे बाबासाहेबांनी कुठे म्हटल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही. उलट बाबासाहेबांच्या मांडणीत बुद्धांचा धम्म विवेक, नैतिकता, समता आणि चिकित्सक दृष्टिकोनावर आधारित दिसतो.


२. २८ बुद्धांची संकल्पना ही पारंपरिक बौद्ध साहित्यात आढळते. (डी डी कोसंबी) परंतु बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या संकल्पनेला स्थान दिलेले दिसत नाही. पुनर्जन्माच्या बाबतीतही त्यांची मांडणी पारंपरिक बौद्ध व्याख्यांपेक्षा वेगळी आणि अधिक चिकित्सक स्वरूपाची वाटते.


३. सोतापन्न, सकृदागामी, अनागामी हे टप्पे पारंपरिक बौद्ध साहित्यात आहेत. मात्र बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात त्यांना स्थान दिलेले मला आढळले नाही.


४. पॉझिटिव्ह एनर्जी या संकल्पनेबद्दल मला स्वतःला कोणताही अनुभव नसल्यामुळे त्याबाबत मी आता भाष्य न करता तटस्थ राहतो.


आता बाबासाहेबांच्या काही विचारांचा संदर्भ घेऊया. त्यातील अर्थ लावताना माझ्याकडून चुका होऊ शकतात, याची नम्र जाणीव ठेवून हे लिहित आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारण्यापूर्वी मानवास धर्माची गरज काय? (मुक्ती कोण पथे?) व इतर ठिकाणी स्पष्ट केले आहे. बाबासाहेबांच्या लेखनात “धम्म” हा शब्द पारंपरिक अध्यात्माच्या अर्थाने नाही, तर नैतिक-सामाजिक नियमव्यवस्था म्हणून आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार म्हणून पुढे येतो.. बाबासाहेब बुद्धाला चमत्कारिक आध्यात्मिक गुरु म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा सामाजिक क्रांतिकारक म्हणून पाहतात. त्यांना उघड्या डोळ्यांचा व चालता बोलता बुद्ध अभिप्रेत होता.


त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्धधम्माचा पाया प्रज्ञा, करुणा आणि समता यांवर उभारलेला दिसतो. त्यांच्यासाठी धम्म म्हणजे केवळ कर्मकांड किंवा वैयक्तिक मोक्षाचा मार्ग नव्हता. धम्माने समाजातील दुःख, अन्याय, विषमता आणि शोषण कमी केले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. धम्म म्हणजे नीती व धम्माचा उद्देश या जगाची पुनर्रचना करणे हा होय.


विपश्यनेच्या संदर्भात असे म्हणता येईल की पारंपरिक बौद्ध परंपरेत विपश्यना ही मनाचे निरीक्षण, दुःखाचे स्वरूप समजून घेणे आणि एकाग्रता विकसित करण्याची साधना मानली जाते. बाबासाहेबांनी ध्यान-साधनेला थेट नाकारले असे म्हणता येणार नाही; मात्र त्यांच्या धम्माच्या मांडणीत नैतिकता, प्रज्ञा आणि सामाजिक परिवर्तनाला केंद्रस्थान आहे. 


४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे ते म्हणाले की,ध्यान,मनाचे निरीक्षण व अभीधम्म यावर फार भर दिला जात आहे .या मार्गाने भारता मधे बौद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या धेय्यात अडथळा निर्माण होईल.


त्यांचा प्रसिद्ध विचार आहे:

"मला असा धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो."


म्हणून आंबेडकरी दृष्टिकोनातून मला प्रश्न असा उभा राहतो की कोणतीही साधना व्यक्तीला अंतर्मुख करण्याबरोबरच समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते का?


१९५६ नंतरचा धम्म हा पारंपरिक मोक्षकेंद्रित अध्यात्मापेक्षा सामाजिक परिवर्तनाशी अधिक जोडलेला दिसतो.


बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजून घेताना एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच वेळी २२ प्रतिज्ञा दिल्या. हा केवळ वैयक्तिक आध्यात्मिक निर्णय नव्हता; तर जातिव्यवस्था, सामाजिक गुलामी आणि मानवी अपमानाविरुद्धचा सार्वजनिक विद्रोह होता.


म्हणूनच धम्माला केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित करणेही चुकीचे ठरेल. त्यांच्या मते धम्म हा मनुष्याच्या अंतर्मुक्तीहुन अधिक सामूहिक समाजाच्या मुक्तीचाही मार्ग आहे. केवळ व्यक्तिगत विकास हा हेतू नसुन सामाजिक विकास हेतु आहे.

त्यामुळे व्यक्तिगत नैतिक परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले, तरच धम्माचा क्रांतिकारी आशय जिवंत राहील; अन्यथा तो परिवर्तनाच्या मूळ उद्देशापासून दूर नेणारा घटक ठरू शकतो.”


क्रमश:

गोष्टी / जातक कथा/ झेन कथा

गोष्टी / जातक कथा/ झेन कथा

Uploading: 1486848 of 2434378 bytes uploaded.

 
इसापची कोल्हा आणि द्राक्षांची कथा सगळ्यांनाच माहिती आहे.


आपली उडी वरपर्यंत पोहोचत नाही म्हटल्यावर उंचावरची द्राक्षं आंबटच असणार, असा निष्कर्ष सगळेच कोल्हे काढतात.


ओशो त्यापुढची गोष्ट सांगतो.


त्याच्या गोष्टीत हा कोल्हा थेट जिममध्ये गेला, त्याने भरपूर व्यायाम केला. बायसेप, ट्रायसेप कमावले, उंच झेप घेण्याचं कौशल्य आत्मसात केलं आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन त्याने द्राक्षवेलीवर त्याच घोसावर झेप घेतली.


तो घोस त्याच्या हातात आला.


त्याने मोठ्या उत्सुकतेने द्राक्षं खाल्ली.


ती खरोखर आंबटच होती.


पण, आता कोल्हा ती द्राक्षं किती मधुर आहेत, हेच सांगत फिरतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायाचेही प्रणेते

 

अनेकांना वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ सामाजिक न्याय, अस्पृश्यता निर्मूलन आणि आरक्षणापुरते मर्यादित होते. परंतु हे पूर्ण सत्य नाही. बाबासाहेबांचे ध्येय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तिन्हींची स्थापना करणे हे होते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय" या मूल्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी संविधानिक हक्क, मूलभूत अधिकार, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाची व्यवस्था केली. परंतु आर्थिक न्यायासाठीही त्यांनी एक स्पष्ट आणि दूरदृष्टीचा आराखडा मांडला होता.

१९४७ मध्ये त्यांनी States and Minorities या दस्तऐवजात *राज्य समाजवाद (State Socialism)* ही संकल्पना मांडली. त्यांचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीची स्थापना करणे नव्हता, तर लोकशाही मार्गाने आर्थिक विषमता कमी करणे हा होता.

बाबासाहेबांच्या मते भारतातील आर्थिक विषमतेचे एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीचे असमान वाटप. काही मोजक्या जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन होती, तर लाखो शेतकरी आणि शेतमजूर भूमिहीन किंवा अल्पभूधारक होते. त्यामुळे त्यांनी पुढील उपाय सुचवले:

* सर्व शेतीजमीन राज्याच्या मालकीची असावी.

* खाजगी जमिनदारी व्यवस्था संपुष्टात यावी.

* राज्याने जमीन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने (Lease) द्यावी.

* सामूहिक किंवा सहकारी पद्धतीने शेतीला प्रोत्साहन द्यावे.

* सिंचन, बियाणे, खत, यंत्रसामग्री, कर्ज इत्यादी सुविधा राज्याने उपलब्ध करून द्याव्यात.

* शेतीतील उत्पन्नाचे वाटप न्याय्य नियमांनुसार व्हावे.

याचा अर्थ सरकार स्वतः शेती करणार, असा नव्हता. जमिनीची मालकी राज्याकडे, पण शेती प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी करावी, ही त्यांची संकल्पना होती.

बाबासाहेबांचा दृष्टिकोन पारंपरिक साम्यवादापेक्षा वेगळा होता. ते हिंसक क्रांती, एकपक्षीय हुकूमशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दडपशाहीचे समर्थक नव्हते. त्यांनी संसदीय लोकशाही, घटनात्मक शासन, मूलभूत अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना सर्वोच्च स्थान दिले.

म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना *लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism)* असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

भूमिहीनांच्या प्रश्नावर भारतात तीन मार्ग समोर आले होते.

१. तामिळनाडू आणि कम्युनिस्ट चळवळी:

तामिळनाडूत तसेच इतर काही राज्यांत (विशेषतः तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल) कम्युनिस्ट शेतकरी चळवळी झाल्या. काही ठिकाणी त्या हिंसकही झाल्या. कारण त्यांचा विचार असा होता की जमीनदार स्वेच्छेने जमीन देणार नाहीत; म्हणून वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे.

हा दृष्टिकोन मार्क्सवादी होता.


२. विनोबा भावे यांचे भूदान

भूदान चळवळीचा आधार नैतिक परिवर्तन होता.

विनोबा भावे यांचा विश्वास होता की जमीनदारांनी स्वेच्छेने काही जमीन भूमिहीनांना द्यावी. यात संघर्षापेक्षा सद्भावना आणि नैतिक आवाहन यावर भर होता. या चळवळीमुळे लाखो एकर जमीन दान म्हणून जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात सर्व जमीन कायदेशीररीत्या भूमिहीनांना मिळालीच असे नाही. अनेक जमिनी वादग्रस्त, नापीक किंवा हस्तांतरणास अयोग्य होत्या.


३. दादासाहेब गायकवाडांचा भूमिहीनांचा सत्याग्रह

हा बाबासाहेबांच्या विचारांशी जोडलेला होता.

दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांसाठी मोठा सत्याग्रह उभारला. घोषवाक्य होते:

"कसेल त्याची जमीन; नसेल त्याचे काय?"

हा हिंसक नव्हता.त्यात संविधानिक मार्ग,सत्याग्रह,अटक,मोर्चे,लोकशाही आंदोलन यांचा अवलंब करण्यात आला.

या चळवळीमुळे महाराष्ट्रात भूमिहीनांना सरकारी पडीत जमीन वाटपाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला.


बाबासाहेबांचा मार्ग नेमका कोणता?

मला वाटते, येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा.

बाबासाहेब:

भूदानासारख्या केवळ स्वेच्छेच्या मार्गावर अवलंबून नव्हते.

कम्युनिस्टांप्रमाणे हिंसक क्रांतीचे समर्थकही नव्हते.


त्यांनी तिसरा मार्ग सुचवला:

राज्याने कायद्याने जमीनव्यवस्था बदलावी.

जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे.

भूमिहीनांना लागवडीचा हक्क द्यावा.

हे सर्व संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत करावे.


म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism) असे संबोधले जाते.


 क्रमशः

Friday, 29 May 2026

बाबासाहेब


 

Cultivation Of Mind Should Be The 

Ultimate Aim Of The Human Existence.


-Dr. B.R. Ambedkar 

🌸🌸🌸


बाबासाहेब सांगतात की, धर्माच्या अधिष्ठानावर उभी असलेली जातव्यवस्था ही अशी रचना आहे की ती शोषितांविषयी सहानुभूती निर्माण करत नाही; उलट अस्पृश्यांविरुद्ध ‘धार्मिक रोष’ निर्माण करते. परिणामी, माणसाची न्यायबुद्धी बोथट होते आणि तो धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अन्यायातही सहभागी होतो. इतकंच नव्हे, तर त्या अन्यायालाच न्याय्य समजू लागतो. 


म्हणूनच, सामाजिक परिवर्तनाचा प्रश्न केवळ शोषितांच्या सक्षमीकरणापुरता मर्यादित राहत नाही. उलट, ज्या समाजघटकांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातच जाणीव (consciousness) निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण अन्याय ‘न्याय्य’ आहे अशी धारणा सतत पेरली जाते आणि तीच व्यवस्था टिकवून ठेवते. त्यामुळे या चुकीच्या समजुतींना आव्हान देणारे, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि नैतिकतेच्या नव्या चौकटी उभ्या करणारे प्रयत्न अत्यावश्यक ठरतात.


व्यक्तीच्या विचारात बदल करणे महत्त्वाचे असते. न्यायव्यवस्था, वकिली आणि धोरणनिर्मिती हाताळणारे हेच, लोक समाजातील नैतिक दिशा ठरवणार आहेत.परंतु अशा जाणीवा शैक्षणिक संस्था क्वचितच निर्माण करतात

जयंती - 02

 



पोस्ट क्रमांक ०२

🟦🟨🟥⬜️🟧

📖 पुस्तक आणि बाबासाहेब 


बाबासाहेबांना ५०,००० हून अधिक पुस्तके होती. मुंबईतील राजगृह हे बाबासाहेबानी खास ग्रंथालयासाठी बनविले होते. त्यात इंग्रजी,मराठी,उर्दू,संस्कृत,पारसी,फ्रेंच,जर्मन अशा अनेक भाषांतील ग्रंथांचा समावेश होता. साधारणपणे सोशल सायन्स चे पंधरा भाग,हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड चे पंचवीस भाग होते,तसेच इतिहासावर २६००,कायद्यावर आधारित ५०००,राजकारणा संबंधित ३०००,धर्मशास्त्रावर २००० तर १२०० चरित्रे ग्रंथ होती. अर्थशास्त्राची १०००,तत्त्वज्ञानावर ६०००,युद्धशास्त्रावर ३०००,इतर साहित्य ३००० आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर ७९०० ग्रंथ होते.


राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही जाण्याची मुभा नव्हती,त्यांचा पाळीव कुत्रा पीटर हा राजगृहाच्या दाराशी ग्रंथालयाची राखण करीत असे,हे ग्रंथ वर्गीकरण करून लेबलसह रचून ठेवले होते, त्यामुळे इतक्या प्रचंड ग्रंथालयात त्यांना कोणतेही पुस्तक हवे असल्यास ते अचूक मिळत होते,इंग्लंड मधील ठक्कर कंपनीतुन त्यासाठी बाबासाहेबानी ग्रंथालय कार्ड बनवून घेतले होते,व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी देऊन पुस्तकांची यादी पूर्ण करून घेतली होती.


बाबासाहेबांनी अभ्यास केलेले तत्वज्ञ :

बाबासाहेबांनी हिंदु धर्म ग्रंथ व पुराणे, बौद्ध साहित्य, ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता.

त्यांनी हेगल, मार्क्स,एंगेल्स,लेनिन,मुसोलिनी,

वोल्टअर,प्लेटो, सोक्रेटीस,महात्मा फुले,कार्लाईल, जॉन ड्युई, प्रो. सेलिंगमन, बरंट्रँड रसेल, फ़्रेंड्रिंक नितशे, लासकी, मॅक्स म्युलर, एडमंड बर्के, वूल्फ गँग गॉथे, सिगमांड फ्राईड , जॉन स्टुअर्ट मिल,जेरेमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस पेन, अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो इत्यादी विचारवंतांचे लेखन व विचार अभ्यासले होते.


त्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना अभ्यासांती गुरु मानले.


📚 बाबासाहेबांची ग्रंथसंपदा

॰ कास्ट्स इन इंडिया: त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास (1917)

॰ स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज (1918)

॰ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: त्याची उत्पत्ती आणि उपाय (1923)

॰ दि इव्हॉल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (1925)

॰ वेटिंग फॉर अ व्हिसा (1935–36)

॰ अनायलेशन ऑफ कास्ट (1936)

॰ मिस्टर गांधी अँड द एमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (1943)

॰ रानडे, गांधी अँड जिन्ना (1943)

॰ थॉट्स ऑन पाकिस्तान (1941 / 1945)

॰ व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (1945)

॰ महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट

॰ हू वेअर द शूद्राज? (1946)

॰ स्टेट्स अँड मायनॉरिटीज (1947)

॰ द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (1948)

॰ थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (1955)

॰ बुद्ध ऑर कार्ल मार्क्स

॰ कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट (1945)

॰ बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन (1950)

॰ द फ्युचर ऑफ पार्लियामेंटरी डेमॉक्रसी

॰ लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस

॰ बुद्धिझम अँड कम्युनिझम (1956)

॰ द बुद्धा अँड हिज धम्मा (1957)

॰ द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन


बाबासाहेबांच्या जिवन व तत्वद्यानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

अनेकांनी आपापल्या वैचारिक बैठकीनुसार आंबेडकरांवर लेखन केले आहे. व्यक्तीगत समज आणि वैचारिक दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या लोकांनी लिहलेली वेगवेगळी चरित्र, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वसंत मून ( इंग्रजी, मराठी), सहारे, कुबेर, चांगदेव खैरमोडे, शंकरराव खरात, झेलीयट बाई, ख्रिस्तोफर जेपरलॉट, डी. आर. जाटव, कंवल भारती, उमेश बगाडे, रावसाहेब कसबे, बी. सी. कांबळे, डी. आर कांबळे, आनंद तेलतुंबडे, गेल ऑम्वेट, धनंजय कीर, दत्तोपंत ठेंगडी, रमेश पंतगे, विमलसुर्य चिमनकर, य. दी. फडके, भा. ल. भोळे, शेषराव मोरे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, आर. संगीता राव,  सुधाकर गायकवाड, सुरेश माने अशा सगळ्यांची ( अजूनही अनेक जन आहेत)  पुस्तके आहेत आणि सोबतच, बाबासाहेबांचे मूळ साहित्य प्रामुख्याने वाचावेत.


लक्षात घ्या. बाबासाहेब केवळ तत्वज्ञानी नव्हते. त्यांनी कृतियुक्त संघर्षपूर्ण जीवन व्यतीत केल. अर्थशास्त्र, संविधान तज्ञ, लेखक, पत्रकार, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मशास्र इत्यादीमध्ये ते पारंगत होते.

चळवळ : 05


 

“आर्थिक, सामाजिक आणि जातीय विषमता या नैसर्गिक किंवा दैवी नसतात; त्या ऐतिहासिक सत्तासंबंध, संसाधनांवरील अनाधिकृत नियंत्रण आणि संस्थात्मक सिस्टेमॅटिक शोषण यांच्या दीर्घ प्रक्रियेतून निर्माण झालेले आपत्ये असतात. समाजातील काही वर्चस्वशाली गटांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधनांवर नियंत्रण ठेवून ही विषमता टिकवून ठेवली.”


परंतु या व्यवस्थेचं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे ही विषमता “न्याय्य”, “नैसर्गिक” आणि “धार्मिक” आहे असा भास निर्माण करणे. त्यामुळे मुळात विषमता अस्तित्वात आहे हेच अनेकांना मान्य होत नाही.


आज जगभरातील व्यवस्थांनी सामान्य लोकांच्या मनात एक गोष्ट खोलवर रुजवली आहे. तुमच्या दुरवस्थेला व्यवस्था किंवा सरकार जबाबदार नाही. तुमच्या आयुष्यातील अपयशासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात, नाहीतर तुमचं नशीब; आणि कधी दुसऱ्या जातीचा, धर्माचा, परप्रांतीय किंवा परदेशी माणूस. परंतु वेल्फेअर स्टेट म्हणून ही सरकारंअपयशी ठरलीत हे ते मान्य करणार नाहीत.


म्हणजेच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा नाही; तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतरत्र शोधायची. फेक न्यूज, फेक मीडिया व नीतिशून्य, विवेकहीन समाजात हा विषारी, विखारी विचार फोफावला आणि हा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र ठरली; माध्यमं.


सोशल मीडिया, सिनेमा, टीव्ही, वर्तमानपत्रं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून जनमत घडवलं जातं, भीती निर्माण केली जाते, दिशाभूल केली जाते आणि खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष हटवलं जातं.


याच कारणामुळे सत्ताधारी वर्ग शिक्षण आणि संस्कार प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करतो. सत्ताधारी विचारसरणी लोकांच्या मनात संस्कारांच्या रूपाने रुजवली जाते. त्याला पूरक अजेंडे राबवले जातात आणि शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच शेंदूर फासला जातो. परिणामी “होयबा वर्ग” निर्माण होतो.


हा होयबा वर्ग सामाजिक, राजकीय किंवा नैतिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत नाही. अन्याय, विषमता आणि शोषण दिसत असूनही “आपल्याला काय करायचं?” अशी भूमिका घेऊन तो तटस्थ राहतो. परिवर्तनाच्या चळवळींपासून दूर राहणारा, सत्तेच्या भीतीने गप्प बसणारा आणि सुरक्षित तटस्थतेत राहणारा हा वर्ग व्यवस्थेला सर्वाधिक सोयीचा असतो.


म्हणूनच अन्याय ओळखणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि तो दूर करण्यासाठी सक्षम साधन उभे करणे आवश्यक ठरते. या परिवर्तन प्रक्रियेतील सर्वात प्रभावी आणि मूलभूत साधन म्हणजे शिक्षण.


शिक्षण म्हणजे केवळ शाळा किंवा महाविद्यालयातील अध्यापन नव्हे; तर समाज, कुटुंब, धर्म, सण-उत्सव, परंपरा आणि संस्कृती यांच्या माध्यमातून घडणारी विचारप्रक्रियाही शिक्षणाचाच भाग असते. समाजातील सांस्कृतिक व्यवहार लोकांना “काय योग्य आहे” आणि “काय स्वाभाविक आहे” हे शिकवत असतात.


म्हणूनच प्रश्न विचारणं, चिकित्सक विचार करणं आणि शिक्षणाला मुक्तीचं साधन बनवणं आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.

चळवळ : 04

 


“एक ना धड, भाराभर चिंध्या” अशीच आज चळवळीची अवस्था झाली आहे. भूछत्राप्रमाणे जणू नवी संघटना जन्माला येते; पण विचार, संघटनशक्ती, दीर्घकालीन कार्यक्रम आणि जनाधार यांच्या अभावामुळे अशा अनेक संघटना काही काळातच निष्प्रभ होतात किंवा समाजात दखलपात्रही ठरत नाहीत.


आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गल्लीबोळात “राष्ट्रीय अध्यक्ष” निर्माण झाले आहेत; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारे नेतृत्व मात्र दिसत नाही. परिणाम स्वरूप चळवळीमध्ये सुसूत्रता राहत नाही. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या दिशेने धावत असल्यामुळे सामूहिक ताकद विखुरते. 


याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ठोस मागण्यांचा अभाव. कोणत्या मुद्द्यावर संघर्ष करायचा, कोणत्या मागणीसाठी जनदबाव उभा करायचा आणि कोणत्या दिशेने समाजाला न्यायचे याबाबत स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे “प्रेशर पॉलिटिक्स” उभी राहत नाही. सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक असलेली संघटित ताकद तयार होत नाही. उलट पाकीटबाजी व दलालांना सुकाळ येतो.


इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळ एका स्पष्ट अजेंड्यावर उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे विचार होता, दिशा होती, शिस्त होती आणि व्यापक नेतृत्व होते. आज मात्र व्यक्तिकेंद्रीकरण वाढले आहे. संघटना समाजासाठी कमी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जास्त उभ्या राहताना दिसतात.


देशव्यापी नेता अचानक निर्माण होत नाही; त्यासाठी दीर्घकालीन सामाजिक काम, वैचारिक प्रगल्भता, त्याग आणि व्यापक स्वीकार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे देशव्यापी अजेंडाही फेसबुक पोस्ट किंवा घोषणांनी तयार होत नाही; तो जनतेच्या वास्तविक प्रश्नांशी भिडून सातत्यपूर्ण संघर्षातून घडतो.


पण संघटनांच्या अधोगतीमागे केवळ विखुरलेपणा कारणीभूत नाही. वैचारिक अपरिपक्वता, अज्ञान, अहंकार आणि परस्परांतील द्वेष यांतून आंतरिक संघर्ष निर्माण होतात. त्यातच स्वार्थासाठी होणारी दलाली, गटबाजी आणि व्यक्तिपूजा यामुळे चळवळीची दिशा भरकटते. हजारो संघटना असूनही चालले असते केवळ त्यांची मागणी एकसुरात संघटीत हवी होती मात्र तसेही दिसत नाही.


अशा सर्व वातावरणात प्रामाणिक, समर्पित, त्यागी, वैचारिक आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचा उपयोग करून घेतला जातो; पण निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान दिले जात नाही. अनेकदा त्यांची फसवणूक, पिळवणूक आणि मानसिक उपेक्षा केली जाते.


परिणामी संघटना समाजपरिवर्तनाचे माध्यम न राहता काही स्वार्थी लोकांचा अड्डा बनते. विचारांपेक्षा व्यक्ती मोठ्या होतात, तत्त्वांपेक्षा अंधनिष्ठा महत्त्वाची ठरते आणि कार्यकर्त्यांपेक्षा चापलूस लोकांना स्थान मिळते. अशा संघटनांमध्ये अभ्यास, शिस्त, नैतिकता आणि जनतेशी असलेले जिवंत नाते हळूहळू नष्ट होत जाते.


याचा गंभीर परिणाम म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता निराश होतो. समाजासाठी काम करण्याची जिद्द असलेली माणसे अशा वातावरणापासून दूर जातात. सामान्य जनतेचाही विश्वास उडतो. कारण जनता केवळ घोषणा पाहत नाही; ती संघटनांचे वर्तन, अंतर्गत संस्कृती आणि नेतृत्वाची नैतिकता देखील पाहते.


ज्या संघटनांमध्ये संवादाऐवजी कटकारस्थान, विचाराऐवजी अंधनिष्ठा आणि समाजकारणाऐवजी स्वार्थाचे व्यवहार चालतात, त्या संघटना काही काळ गाजल्या तरी टिकाऊ परिवर्तन घडवू शकत नाहीत. चळवळ उभी राहते ती त्याग, प्रामाणिकपणा, वैचारिक स्पष्टता आणि जनतेशी असलेल्या विश्वासाच्या नात्यावर. भीती, द्वेष आणि स्वार्थावर नाही.


म्हणूनच चळवळ मजबूत करायची असेल तर संघटनांची संख्या वाढवण्यापेक्षा विचारांची एकजूट, सामूहिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, आत्मपरीक्षण आणि समान किमान कार्यक्रम यावर भर द्यावा लागेल. शीलवान नेतृत्व स्वीकारावे व घडवावे लागेल. कॉमन मिमिमम प्रोग्रामवर एकजूट करावी लागेल. अन्यथा प्रत्येकजण स्वतःचा झेंडा घेऊन उभा राहील; पण समाजाची सामूहिक ताकद मात्र कमकुवतच राहील.

चळवळ - 03


नामधारी पदाधिकारी आणि निष्क्रिय संघटना : चळवळीच्या क्षयाची लक्षणे


कोणतीही चळवळ तिच्या घोषणांनी मोठी होत नाही; ती मोठी होते कार्यकर्त्यांच्या सामाजिक हस्तक्षेपाने, वैचारिक प्रगल्भतेने आणि जनतेशी असलेल्या जिवंत नात्याने. पण आज अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांमध्ये एक गंभीर वास्तव दिसून येते ती म्हणजे पदांची वाढ आणि कार्याची घट. यातुन अनेकदा निष्क्रिय, नाममात्र, निकामी व मरणासन्न अवस्थेतील संघटना दिसतात.


पूर्वी चळवळींमध्ये पद हे कामातून निर्माण होत असे. लोक एखाद्याला “नेता” म्हणत, कारण तो समाजात सक्रिय असे. आज अनेक ठिकाणी उलट चित्र दिसते.  आधी पद घेतले जाते आणि नंतर काम शोधले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक अशा पदांच्या घोषणा मोठ्या उत्साहात होतात; पण प्रत्यक्ष समाजकार्य, प्रश्नांवर संघर्ष, लोकांशी संवाद, अभ्यास किंवा नवीन कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग दिसत नाही.


ही केवळ संघटनात्मक समस्या नाही; हा वैचारिक ऱ्हास आहे.


ज्या चळवळीमध्ये अभ्यास कमी होतो, तिथे घोषणाबाजी वाढते. जिथे सामूहिक नेतृत्व संपते, तिथे व्यक्तिपूजा सुरू होते. जिथे कार्यकर्ते घडत नाहीत, तिथे “फोटोतील पदाधिकारी” निर्माण होतात. प्रत्येकाला प्रभावशाली दिसायचे असते; पण समाजासाठी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता व्हायचे नसते.


आज सोशल मीडियाने या प्रवृत्तीला अधिक खतपाणी घातले आहे. पोस्टरवर फोटो असणे, नावापुढे मोठे पद लिहिणे आणि कार्यक्रमानंतर अभिनंदनाच्या पोस्ट टाकणे.  यालाच अनेकांनी सामाजिक काम समजले आहे. पण चळवळ ही डिजिटल प्रतिमांनी उभी राहत नाही; ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर, त्यागावर आणि सातत्यपूर्ण कृतीवर.


पद जबाबदारीचे प्रतीक असते, प्रतिष्ठेचे नाही. पण जेव्हा पद हे केवळ ओळख आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे साधन बनते, तेव्हा संघटना बाहेरून जिवंत दिसते पण आतून निष्क्रिय होत जाते. अशा संघटना समाजात विश्वास निर्माण करू शकत नाहीत. लोकांना भाषणे नको असतात; त्यांना कृती दिसावी लागते.अन्यथा संघटनेचे अस्तित्व केवळ नावापुरते उरते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघटन ही केवळ लोकांची गर्दी नसून शिस्तबद्ध, अभ्यासू आणि ध्येयवादी सामूहिक शक्ती मानली होती. संघटना म्हणजे केवळ कार्यालय, बॅनर किंवा पदांची यादी नाही; संघटना म्हणजे विचारांचे कृतीत रूपांतर करणारी सामाजिक ऊर्जा. जर त्या ऊर्जेऐवजी निष्क्रियता आली, तर चळवळींचा र्हास अटळ आहे.

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

चळवळ


दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे.

• अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

• आणि समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे 

१. अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

२. समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


बाबासाहेबांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

जयंती महामानवांची भाषणाचा अंश

 


आजच्या काळात बोलणे हि जणूकाही क्रांतीच झाली आहे. वर्तमानात अनेक मुद्दे सुरु आहेत. EVM ,एप्सटिन फाईल सारखे मुद्धे आहेतच. त्यासोबत डेलिमिटेशन, जंगलतोड व त्यामुळे झालेली प्रचंड तापमानवाढ, महाबोधी विहार मुक्तीआंदोलन, पालीभाषा आंदोलन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीतील आक्षेपार्ह सभासदांची वर्णी आणि अर्थात वर्गीकरण असे अनेक मुद्दे आहेत. वर्गीकरण होऊ नये परंतु जर झालेच तर ते किमान लोकसंख्येचा आधारावर, इम्पिरिकल डेटाच्या आधारावर व्हावे असे साहजिक वाटते.


यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूयात तो म्हणजे महामानवांची जयंती. आज १ मे अर्थात कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा असा हा त्रिवेणी संगम. बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेचे विशेष स्थान आहे. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व ५६३ साली झाला . त्यांच्या वडिलांचे नाव शिद्धोधन व मातेचे नाव महामाया. त्याकाळात गणराज्य पद्धती होती. शक्य गणातील शिद्धोधन हे राजा होते. कपिलवस्तू हे राजधानी होती. या दाम्पत्याला अनेकवर्ष संतानप्राप्ती नव्हती आणि अशातच एका रात्री महामायेला एक सुंदर स्वप्न पडते. सुमेध नावाचे मुनी स्वप्नात येऊन महामायेला तू माझी माता होशील का? अशी विचारणा करतात. एक पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नात येतो. या स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी महाराज दुसऱ्या दिवशी आठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करतात. ते अर्थबोध सांगतात कि राजे तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ होणार आहे तसेच हे बालक सार्वभौम सम्राट होईल किंवा एक संन्याशी बनून जगाचा मार्गदर्शक बनेल, बुद्ध होईल.


बुद्धांच्या जन्माची देखील मोठी रंजक कथा आहे. त्यांचा जन्म लुम्बिनी येथील वनात शाल वृक्षाखाली झाला आहे. त्यांच्या जन्मानंतर असितमुनी नावाचे महान तपस्वीचे आगमन या बालकाला पाहण्यासाठी होते. ते भरल्या डोळ्याने बालकाचे दर्शन घेतात आणि एक दुःखद भविष्यवाणी करतात. ती भविष्यवाणी खरी ठरून अवघ्या ७ दिवसांनी महामायेचे देहावसन होते. बाळाची मावशी महाप्रजापती सर्व लालन पालन करते. सिद्धार्थ बालपणापासून करून आणि गहाण विचार करणारे होते. वयाच्या १२ -१३ व्य वर्षी त्यांचा आत्येभाऊ देवदत्त यासोबत झालेला वाद व बुद्धाची करुणा व दृष्टिकोन आपणास ज्ञात आहे. मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे व न्यायासनाने न्यायदान करतांना शिकार करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान करण्यापेक्षा जीवदान करणाऱ्याच्या बाजूने न्यायदान केले पाहिजे असे पटवून दिले.


बुद्धांचा विवाह हा वयाच्या १६ व्या वर्षी दंडपाणी यांची मुलगी यशोधरा सोबत झाला. वयाच्या २० व्या वर्षी सिद्धार्थ शक्य संघाचे सदस्य झाले. काही वर्षांनी शाक्य आणि कोलीय या गणात रोहिणी नदीच्या पाणीवाटपावरून वाद झाला. शाक्य संघाने व सेनापतीने युद्धाचा निर्णय घेतला या संघाच्या निर्णयाला बुद्धाने विरोध केला व सामोपचाराने चर्चेने वाद मिटवण्याचा पर्याय सुचवला. बुद्धाने संघाच्या विरोधात गेल्याने त्यांना देशत्याग, देहत्याग अथवा सामाजिक बहिष्कार अशा पर्यायांपैकी एक शिक्षा स्वीकारण्याचे सुनावण्यात आले. बुद्धाने परिव्राजक होण्याचा मार्ग स्वीकारला. हि बातमी वायुवेगाने शुद्धोधन, प्रजापती व माता यशोधरे पर्यंत पोहचते. माता यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाला योग्य ठरवून आल्या माता पित्याची व पुत्र राहुलची मी माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत देखभाल करेन. तुम्ही एक असा जीवनमार्ग शोधून काढा कि, तो सकाळ मानवजातीला कल्याणकारी ठरेल. अशी इच्छा व्यक्त करते.


सिद्धार्थ भारतद्वज यांच्याहस्ते माता पिता व पत्नी समक्ष परिव्रजा घेतात. त्यावेळी त्यांचे वय २९ वर्ष असते.

छन्न हा सेवक व कंठक घोडा अनोभा नदीच्या तीरापर्यंत सोबत येतात. सिद्धार्थ आता कपिलवस्तू कडून राजगृहाकडे प्रयाण करतात. राजा बिंबिसार सन्यस्थ होण्यापासून सिद्धार्थाचे मन अनेक प्रलोभने देऊन वळवण्याचा निष्फल प्रयत्न करतात. कपिलवस्तूमध्ये स्त्री-पुरुष घोषणांचे फलक हातात युद्धाचा विरोध करतात व एक लवादमंडळाची स्थापना करून युद्ध कायमचे टाळले जाते.


सिद्धार्थ मात्र परतीचा प्रवास न करता भृगऋषी यांच्याकडे जातात निरनिराळे आत्मक्लेश देणारे तपस्येचे वैराग्य मार्ग तेथे पाहतात. त्यानंतर आलारकालाम यांच्याकडे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतात त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडून ध्यान व समाधी मार्गाची शिकवणूक घेतात. त्यानंतर निरंजना नदीच्या काठी वैराग्यमार्गाचा अभ्यास करतात. अत्यंत उग्र आत्मक्लेश, पीडा, अन्नत्याग अशी सहा वर्ष जातात. शरिर अगदी जर्जर, पिंजरा व क्षीण होऊन जाते. उरुवेला ठिकाणावरील सुजाताने दिलेल्या खीर प्राशन केल्याने वैराग्य कसोटी भंग होते. त्यानंतर पुन्हा निश्चयाने पिंपळवृक्षाखाली बसून चार आठवडे चार पायऱ्याने त्याने ज्ञान प्राप्त केले.


क्रमश:

Saturday, 4 April 2026

जयंती - 2026




पोस्ट क्रमांक ०१

🟦🟨🟥⬜️🟧


🔹 १. बालपण आणि शिक्षण (१८९१–१९१६)

१८९१ (१४ एप्रिल) जन्म – महू (मध्यप्रदेश)

१९०७ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण (दलित समाजातील पहिले)

१९१२ पदवी (कला शाखा) पूर्ण

१९१३ वडिलांचे निधन, बडोदा शिष्यवृत्ती मिळून अमेरिकेला प्रस्थान

१९१५–१९१६ कोलंबिया विद्यापीठ येथे पदव्युत्तर शिक्षण. “भारतातील जातीव्यवस्था” या विषयावर संशोधन.


🔹 २. परदेश शिक्षण व करिअरची सुरुवात (१९१७–१९२४)

१९१७ इंग्लंडला शिक्षणासाठी प्रयाण (नंतर शिष्यवृत्ती बंद → भारतात परत)

१९१८ सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक

१९२० (३१ जानेवारी) ‘मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू.

१९२२–१९२३ कायद्याची पदवी व उच्च शिक्षण पूर्ण (लंडन)


🔹 ३. सामाजिक क्रांतीची सुरुवात (१९२४–१९३५)

१९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना.

१९२७ (२० मार्च) महाड चवदार तळे सत्याग्रह

१९२७ (२५ डिसेंबर) मनुस्मृती दहन 

१९३० कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन (नाशिक)

१९३०–३२ गोलमेज परिषदेत सहभाग

१९३२ (२४ सप्टेंबर) पुणे करार

१९३५ येवले येथे धर्मांतराची घोषणा.


🔹 ४. राजकारण आणि विचारक्रांती (१९३६–१९४६)

१९३६ “जातिभेदाचा नाश” ग्रंथ प्रकाशित.

स्वतंत्र कामगार पक्ष स्थापना

१९३७ निवडणूक विजय

१९४२ व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर कामगार सदस्य.

१९४५–४६ पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना. संविधान सभेत प्रवेश.


🔹 ५. संविधान निर्मिती (१९४७–१९५०)

१९४७ भारताचे पहिले कायदामंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष

१९४९ (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान स्वीकारले गेले.

१९५० (२६ जानेवारी) संविधान लागू.


🔹 ६. शेवटची वर्षे (१९५१–१९५६)

१९५२ (५ जून) कोलंबिया विद्यापीठाकडून सन्माननीय कायद्याची पदवी.

१९५२ राज्यसभा सदस्य.

१९५६ (१४ ऑक्टोबर) नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकार.

१९५६ (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण (दिल्ली) 

Thursday, 19 March 2026

वैचारिक मतभेद

मला टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. कारण विचारभिन्नता ही कोणत्याही व्यक्तीला, समूहाला, संघटनेला व समाजाला अधिक समृद्धच करत असते. ती समाजाची, संघटनेची ताकद असते. वेगवेगळे दृष्टिकोन हे आपल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती व ज्ञान यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपसुकच भिन्न अनुभव आणि भिन्न विचारधारा असु शकतात. खरतर यामुळेच समाजात निरंतन चिंतनाची प्रक्रिया चालू राहते. मतभेद असणे हे धोकादायक नसते; उलट ते बौद्धिक प्रामाणिकतेचे आणि स्वातंत्र्याचे लक्षण असते.

प्रामाणिक बुद्धिवंत म्हणजे आपण जे मानतो ते प्रामाणिकपणे मांडणे व आचरण करणे. तर्काने चर्चा करणे आणि गरज पडली तर स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवणे. मी म्हणतो केवळ तेच बरोबर हा अट्टाहास न करता. आणखीन, नवीन बाजु अधिक योग्य असु शकते यावर विश्वास ठेवणे होय. 

परंतु; जेव्हा चर्चा सत्य शोधण्यासाठी नसते, तर दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी असते. जेव्हा विचार मांडणे हा उद्देश नसतो, तर बौद्धिक चातुर्य व आकडेवारीचा खेळ करून. दिशाभूल करणे हा हेतू असतो. तेव्हा ती चर्चा राहत नाहीत, ती लबाडी, खोडसाळपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी ठरते. अशा हुशार असणाऱ्या व्यक्तींना प्रामाणिक बुद्धिवंत म्हणता येणार नाही.

तेव्हा अशी चर्चा केवळ मतभेदांची राहत नाही; ती नैतिक अध:पतनाची सुरुवात असते. कदाचित होऊ घातलेल्या संकटाची पेरणी असते.

म्हणूनच शतदा टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. तुम्ही माझ्याशी असहमत असू शकता, माझ्या विचारांवर कठोर टीका करू शकता. त्यात काहीच गैर नाही. पण चर्चा प्रामाणिक असावी, तर्कावर आधारित असावी आणि नैतिकतेची किमान सीमा तरी पाळणारी असावी. कारण एकता म्हणजे आपण सगळे एकसारखे होणे,किंवा एकच ध्येयाप्रती एकसमान वेगाने व दिशेने विचार करणे नव्हे. खरी एकता म्हणजे वैचारिक मतभिन्नता असून व त्या मत स्वातंत्र्याचा आदर करत विविधतेत देखील एकता साधणे होय. 

कारण शेवटी विचारांचा संघर्ष समाजाला पुढे नेतो; पण लबाडी आणि खोडसाळपणा समाजाला अंधाराकडे ढकलतात. म्हणूनच मला अज्ञान व अशिक्षितपणा मान्य आहेत. अशांना सज्ञानी व सुशिक्षित केले जाऊ शकते. परंतु बौद्धिक आणि नैतिक भ्रष्टता अधिक घातक आहे व ती मला कधीच मान्य नाही.

Wednesday, 18 March 2026

शोषितांचे अंधानुकरण


🟦🟨🟥⬜️🟧

शोषित वर्ग (वर्ण) म्हणजे: ज्यांचे शोषण होत आहे. शोषण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लैंगिक अशा अनेक अर्थाने व अंगाने असू शकते . भारतात शोषित वर्ग आणि शोषित वर्ण अनेकदा एकाच आहे. हा शोषित वर्ग अनेकदा शोषक वर्गाच्या जीवनशैलीचे (संस्कृती), वर्तनाचे, भाषेचे किंवा (निकृष्ठ )मूल्यांचे आंधळेपणाने अनुकरण करत असतो. ब्राम्हो-भांडवली व्यवस्था तसे करवून घेत असते.

हे अंधअनुकरण प्रामुख्याने मानसशास्त्रीय दडपणातून आणि सामाजिक स्वीकाराच्या इच्छेतून जन्माला येते. शोषित वर्गास वाटते की, असे केल्याने त्यांना समाजात मान-पान , प्रतिष्ठा (सगे-सोयरे ) आणि उच्च स्थान मिळेल.परंतु अशी प्रतिष्ठा अनेकदा आभासी असते. ती बाह्य स्वरूपावर आधारलेली असते, आत्मसन्मानावर नव्हे. शोषित वर्गाने शोषक वर्गाचे आंधळे अनुकरण करणे हा केवळ वर्तनाचा प्रश्न नसून तो मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याचा प्रकार देखील आहे. मूलत: सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या परस्परसंबंधांचा तो परीपाक असतो.

प्रथम, या विचारामागील सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात जेव्हा आर्थिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विषमता वाढते, तेव्हा श्रेष्ठत्वाची प्रतिमा शोषक वर्गाशी जोडली जाते. परिणामी, शोषित वर्गाला त्या प्रतिमेचे अनुकरण करणे म्हणजे सामाजिक उन्नतीचा मार्ग आहे असे वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, ही कृती स्वीकृतीची गरज आणि निम्नगंड यांमधून उद्भवते. त्यामुळे हे अनुकरण त्यांना तात्पुरती आत्मतृप्ती आणि आभासी सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करते.

मात्र, या प्रक्रियेत एक मूलभूत विरोधाभास दडलेला आहे. ते स्वीकारतांना शोषक उलट, स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि ओळखीचा त्याग करत असतो.व त्यास दुय्यम स्थान देत असतो. अशा प्रकारचे अनुकरण हे सामाजिक संरचनेतील असमानतेला आव्हान देत नाही; ते त्या असमानतेला अधिक दृढ करते. म्हणूनच शोषित वर्गाने व त्यांच्या वर्तमानातील म्होरक्यांनी याचे ‘भान ठेवावे’.

तथापि, या चिकित्सा करताना एक दुसरा पैलूही लक्षात घ्यावा. सर्वच अनुकरण हे नकारात्मक असते असे नाही. प्रगतीसाठी, शिक्षणासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी काही मूल्यांचे स्वीकारणे आवश्यक असू शकते. प्रश्न आंधळेपणाचा आहे.जिथे विवेक हरवतो आणि स्वतःची अस्मिता दुय्यम ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नाही. तेथे अनुकरण आणि आत्मविकास यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे. हा भेद उलगडून सांगणे हे जुन्या जाणत्या व प्रज्ञाशीलांचे काम आहे.

शोषितांना आत्मभान जागृत करण्याचा संदेश देऊन. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्याचे रूप धारण करण्यात नसून, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून समानतेसाठी उभे राहण्यात आहे. हे अधोरेखीत व्हावे व होत राहावे इतकंच.

Sunday, 8 February 2026

निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

 निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

मी जेथे उभा आहे तेथून मला चळवळी बाबत फार आशादायी चित्र दिसत नाही . मुळात सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि वैचारिक भुमिकांच्या शेवटाचा हा काळ असावा असे एकूण चित्र आहे . जगभरात भांडवशाही  ही हुकूमशाही सोबत मिरवत आहे. असे असले तरी सामाजिक जाणिवेतून आलेले कार्यकर्ते आणि मोजक्या संघटना खिंड लढवत आहेत. परंतु त्यांच्यापाठी जनसमूह प्रामाणिकपणे उभा राहताना दिसत नाही.  समाजाला आता चळवळीची गरज उरली नाही काय? हा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. कारण ज्यांच्यासाठी कार्यकर्ते हि चळवळ चालवतात त्यांनीच पाठ फिरवलेली दिसते आहे. 


वर्तमान स्तिथीत व्यवस्थेने घडवून आणलेली एक गोष्ट म्हणजे संघटनांची केलेली मोडतोड. संघटित नसल्यामुळे कार्यकर्ते एकाकी लढत आहेत .व्यवस्थेशी थेट दोन हात करत आहेत. मात्र अशा असंघटित लढ्याला चिरडणे, खच्चीकरण व  खिळखिळे करणे. व्यवस्थेला सहज शक्य असते .


सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे . असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . माथी भडकावणारी भाषणबाजी आणि त्यात रील स्टार्सनी उथळपणाचे हिडीस प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे .


भुछत्रा प्रमाणे उगवणाऱ्या संघटना आहेत. निवडक तरुण काही तरी करायचे आहे हा उद्देशाने बाहेर पडत आहेत. परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे नेतृत्व जवळपास दिसत नाही.


अस्तित्वात असणाऱ्या संघटना नामधारी व बहुतांशी भरकटलेल्या आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या संकटाचे आकलन नसल्याने सांस्कृतिक चळवळीकडे सपशेल कानाडोळा आहे. फसव्या पुरोगाम्यांची धर्माबाबत बोटचेपी भुमिका जैसेथे सुरूच आहे.

मीडियाच्या माध्यमातून विकासाची धुळफेक, धर्माची अफू व द्वेषाची पेरणी करून जनतेला बेअक्कल केले आहे. 


आता पुन्हा सगळे नव्याने सुरू करणासाठी अवधी उरलेला नाही. आपण साध्या शिक्षण संस्था उभ्या करू शकलेलो नाहीत. होत्या त्या सांभाळू शकलो नाहीत. सगळीकडे लोकशाहीच्या स्तंभांची पोखरणी झालेली आहे.

Saturday, 7 February 2026

चळवळीची गरज काय?

 मुळात या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता हजारो वर्षापासून आहे; आणि ही विषमता फक्त व्यवहारात नसून व्यक्तींच्या विचारात, मना-मनात ठासून भरलेली आहे. ही विषमता कायम त्यांच्या मनात धगधगती राहो यासाठी काही समाज विघटनकारी शक्ती कायम कार्यरत असतात. अगदी या विषमतावादी व्यवहाराला वैचारीक समर्थन व पाठबळ देणारी पुस्तके, धर्मग्रंथ देखील लिखीत आहेत. या विषमतावादी विचारांच्या संघटना मग त्या राजकीय , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्तरावरील असतील. जाती वा या जातींचा  मिळून तयार झालेला शोषक वर्ग असेल. संस्कृतीच्या नावाने आर्थिक शोषण करणारे, वैचारिक दारिद्र्य देणारे असतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात कायम स्वतःचे अजिंडे पिढ्यान पिढ्या राबवणारे भामटे असतील.हे सर्व या विषमतावादी व्यवस्थेला बळ देत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी  विषमतावादी व्यवस्था पुढे नेत असतात. बहुसंख्य समाजाचे शोषण करत असतात.








जोपर्यंत ही विषमतावादी शोषण करणारी व्यवस्था आहे. त्या विषमतावादी व्यवस्थेचे लाभार्थी व पुरस्कर्ते आहेत. अन्याय करणारे अन्यायकर्ते आहेत. शोषण करणारे शोषक आहेत. जातीवाद करणारे जात्यांध आहेत. 


अगदी उलट त्याच्या दुसऱ्या बाजूला शोषित आहेत. जे पीडित आहेत. दीन दलित व वंचित आहेत. जेव्हा-जेव्हा शोषितांना गुलामीची, अन्याय अत्याचाराची जाण होईल. स्वाभिमानाची जाग येईल. 

तेव्हा त्या व्यक्तीला, समाजाला, देशाला चळवळीची गरज असेल. 


प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना- ज्यांना म्हणून स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हवा आहे. त्यांना चळवळीची गरज आहे. प्रत्येक काळात स्वतःच्या न्याय हक्कासाठी बंडाचे निशाण घेऊन लढाईच्या मैदानात उतरणाऱ्या सैनिकांना चळवळीची गरज आहे. सामाजिक अस्थिरता, अगतिकता व अल्पसंख्यांकांच्या दडपशाहीच्या काळात तर चळवळी शिवाय त्यांना गत्यंतर नाही. चळवळ करणे हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यांना जगण्यासाठी देखील चळवळ करावी लागेल. ज्यांना गुलामीच्या बेडीतुन मुक्त व्हायचं असेल ;तर त्यांना चळवळ करावी लागेल. जरी ते थेट चळवळीत नसतील तरी चळवळ नाकारण्याचे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नाही. त्यांचे जिवंत असणेच हे चळवळ आहे. तुमचे उच्च शिक्षण घेणे, तुमचे उंची कपडे परिधान करणे, मोठ-मोठ्या हुद्यावर काम करणे, तुम्ही नेतृत्व करणे हे सगळे चळवळ आहे. कारण या सगळयालाच त्यांचा विरोध आहे.


त्यामुळे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था आहे. तोपर्यंत आपसुकच चळवळ असेल. ही संविधानवादी व्यवस्था टिकवून ठेवणे हे या चळवळीचे काम आहे. 

Saturday, 27 December 2025

माणसं











माणसं पोरकी असतात..

अनेक अर्थाने.. 

कधी उन्मळून पडतात.


खूप बोलणारी माणसे रीती होतात अनेकदा..हातच काहीही न ठेवता. भर-भर बोलतात आणि विसरून जातात. 


काही बोलत राहतात. तेच-तेच, तेच-तेच.. कुरवाळत राहतात. सुखाला, दुःखाला..मोठं करतात प्रतिमेला. स्वतःहून, स्वतःपेक्षा अनेकदा…


न बोलणारी माणसे. आसुसलेली असतात.ऐकायला…. तुम्ही त्यांना ओरडा-बोला. ती ऐकत राहतात फक्त.. तंद्री लागल्यासारखी.. ती कुणाच्याही प्रेमात पडतात. त्यांना सगळेच चांगले भासतात. प्रेमात असतात प्रेमाच्या, चांगुलपणाच्या..


अगदी शेवट पर्यंत…

शेवटा पर्यंत. आनंदाने.

ते खूप बोलतात- खूप बोलतात स्वतःशी.. एकांताशी.. गप्पा करतात स्वप्नांशी,चित्र रंगवतात..कधी घाबरतात. पळतात,रडतात. कधी पडतात,धडपडतात,घडतात..कधी रेंगाळतात जिवन प्रवासात… चित्रावर, मित्रावर,रंगावर, गंधावर..ढेपाळतात. सावरतात स्वतःला. मग लपतात,लपवतात स्वतःला, स्वप्नाला

अनेकदा..

मग ती घाबरतात. त्यामुळे चिडचिड करतात..रागे भरतात सगळ्यांना…भीती पोटी.

ती प्रेमानेच बोलतात पण मोठ्याने..आतला आवाज दाबण्यासाठी.


माणसं ती…. चुकतात. शिकतात. काही फूलतात, काही गळतात.. मागे पडतात. त्याचं गाळात. 


काही संपतात..

उरतात..कायमची.  

Saturday, 20 September 2025

परिवर्तन


 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर बाबासाहेबांनी दिल आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा आणि पंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बुद्धीला पटला. तो धम्म, ते विचार त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे विचारांच आपलं एक महत्त्व आहे. यात काही शंका नाही. 


परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी जो धम्म या देशाचा प्रमुख जीवन मार्ग होता. तो धम्म या भूमीवरती संपुष्टात आला होता. अर्थात बाबासाहेबांनी जर त्याला  पुनर्जीवित केले नसते; तर भारतात बौद्ध धम्म पुन्हा गतिमान झाला असता का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. 


त्यामुळे सदर दोन मुद्द्यातून हे स्पष्ट होते विचार चांगले असले की ते कालातीत असतात. परंतु असे असले तरी त्या विचारांचे लोक,विचार प्रचार प्रसार व संरक्षण करणारे लोक जर नसतील; तर विचार कितीही चांगला असला तरी तो कायमचा संपुष्टात येऊ शकतो. हे बाबासाहेबांनी देखील म्हटले आहे.


त्यामुळे वरील मुद्द्यातून हे स्पष्ट होते की विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळाले तरच तो टिकतो. आजच्या भाषेत राजकीय पाठबळ असेल तरच अधिक विस्तृत होतो.


उदाहरण दाखल आपण बुद्धांकडे वळूया. बुद्ध हे राजपुत्र होते. बुद्ध हे अडीच हजार वर्षांपूर्वी राजपुत्र होते आणि साधेसुधे राजपुत्र नसून सुखाच्या पायघड्या त्यांच्या पायाशी लोळण घालत होत्या असे अत्यंत विलासित जीवन ते व्यतीत करत होते. आता विचार करा अडीच हजार वर्षांपूर्वी असा सुंदर आणि श्रीमंत राजपुत्र जर गृहत्याग करत असेल तर त्याचा परिणाम  इतर जनमानसात व राज संबंधात सर्व दूर पोहोचल्यानंतर त्याचे ऐतिहासिक परिणाम होणार नाहीत का? मला येथे सांगायचं आहे की बुद्ध हे राजपुत्र होते.  सत्तेशी- शक्तीशी जवळचे असल्यामुळे जनमानसावरती ऐतिहासिक प्रभाव टाकणे व पडणे साहजिक होते. त्या काळात अहिंसा,शांतता प्रिय इतरही धर्म, पंथ ,विचार व प्रचारक होते. अडीच हजार वर्षांपूर्वी गृहत्याग करून अंतिम सत्य शोधण्यासाठी न जाणो कित्येक जीव डोंगरदर्या खोऱ्यात फिरत होते. बुद्धांच वेगळ पण त्यांच्या सामान्यजनापासून वेगळ असण्यात आहे. त्यांच्या राजपुत्र असण्यात आहे. हे मला येथे नमूद करावयाच आहे. विचार करा जर बौद्ध धम्माला राजश्रय प्राप्त झाला नसता. तर त्याला लोकश्रय प्राप्त झाला असता का? देशा परदेशात धम्म पोहोचु शकला असता काय?


अजून उदाहरण पाहू. लक्षात घ्या बुद्ध राजपुत्र होते. महात्मा फुले हे एक श्रीमंत आजच्या भाषेत बिल्डर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्या काळात मिलिटरी मध्ये शिक्षक होते. जेव्हा दलितांना शिक्षणाचा गंध देखील नव्हता. तेव्हा बाबासाहेब या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्या घेत होते. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा दस्तूरखुद्द केळुस्कर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजश्रय त्यांना लाभला आहे. सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. लक्षात घ्या बाबासाहेब ब्रिटिश राजवटीत देखील प्रबळ नेता व मंत्री होते. गांधींच्या व काँग्रेसच्या काळात देखील ते संविधानाचे निर्माते व मंत्री होते. सत्ता आणि शक्ती बाबासाहेबांचा हातात असल्यामुळे अनेक धाडसी निर्णय व कार्य ते करू शकले. ही सत्तेची किमया बाबासाहेब भलीभाती जाणत होते.


मला येथे हे सांगायचं आहे की ही चळवळ चालवण्यासाठी राजश्रय व लोकश्रय खूप महत्त्वाचा असतो. शक्तीचे स्त्रोत तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही विधायक काम करू शकत नाहीत. सम्राट अशोक जर राजा नसते तर ते इतके शिलालेख व धम्मकार्य निर्माण करू शकले असते काय? ते शिलालेख लिहिणाऱ्या किती सामान्य कारागिरांची नावे आपल्याला ज्ञात आहेत? त्यामुळे सत्ता नेहमी महत्त्व ठेवून असते.


मार्क्सवादाचे उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स हयात असताना मार्क्सवाद किती फोफावला? आणि त्यानंतर लेनिन जेव्हा सत्तेत आला त्यानंतर मार्क्सवादाचे स्वरूप आणि आवाका किती मोठा होता हे आपण नजरेआड करून चालणार नाही.


आता वर्तमानाकडे येऊ या. भारतातील जेवढे काय म्हणून अब्जाधीश श्रीमंत लोक आहेत ते आपसूकच जातीने सवर्ण वर्गातून कसे येतात? संख्येने केवळ तीन ते पाच टक्के असणारे हे लोक भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 90 ते 95 टक्के जागा व्यापून आहेत. हा केवळ योगायोग नाही. जगभरात देखील स्थिती काही फार वेगळी नाही. जगभरातील 90% साधन संपत्ती ही केवळ तीन ते पाच टक्के लोकांकडे आहे. आणि तरीही सर्व काही अलबेल सब चंगा सुरू आहे.


या देशातील जेलमध्ये जाणारे लोक बेल न मिळाल्याने जेलमध्ये कोंबलेले लोक कोणत्या वर्णाचे व कोणत्या वर्गाचे आहेत? हे गुपित सत्य आहे.


या देशातील सर्वोच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील जज कोण आहेत. या देशातील निरनिराळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री, व्यापार, सोने-चांदीचे, हिरे व्यापार, शेकडो एकर जमिनीचे मालक कोण आहेत हे उघड सत्य आहे.


ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्या, जतिन मेहता या सर्वांची जातकुळी कोणती? 

एका ठराविक वर्गाच्या हातात येथील व्यवस्था राहिली आहे. नीरा रडिया टेप केस यांची साठ गाठ उघडी पाडते. 


देशातील गरीब जनतेला मग डुकरांना कोंबावे व खाणे द्यावे तशी स्थिती आहे. ८० कोटी लोकांना अल्पदरात (निकृष्ट) धान्य दिले जाते. लाडकी बहीण, भाऊ योजना दिली जाते. मूळ समस्यांवर बगल देऊन. धर्मांधतेची फोडणी दिली जाते.


हे सगळे बदलण्यासाठी व विधायक रित्या परिवर्तन करण्यासाठी बहुसंख्य बहुजनांने आर्थिक सत्तेचे, राजकीय सत्तेचे महत्व समजून घेतले पाहिजे व त्या अनुषंघाने नियोजन केले पाहिजे इतकंच.