मी जेथे उभा आहे तेथून मला चळवळी बाबत फार आशादायी चित्र दिसत नाही . मुळात सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि वैचारिक भुमिकांच्या शेवटाचा हा काळ असावा असे एकूण चित्र आहे . जगभरात भांडवशाही ही हुकूमशाही सोबत मिरवत आहे. असे असले तरी सामाजिक जाणिवेतून आलेले कार्यकर्ते आणि मोजक्या संघटना खिंड लढवत आहेत. परंतु त्यांच्यापाठी जनसमूह प्रामाणिकपणे उभा राहताना दिसत नाही. समाजाला आता चळवळीची गरज उरली नाही काय? हा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. कारण ज्यांच्यासाठी कार्यकर्ते हि चळवळ चालवतात त्यांनीच पाठ फिरवलेली दिसते आहे.
वर्तमान स्तिथीत व्यवस्थेने घडवून आणलेली एक गोष्ट म्हणजे संघटनांची केलेली मोडतोड. संघटित नसल्यामुळे कार्यकर्ते एकाकी लढत आहेत .व्यवस्थेशी थेट दोन हात करत आहेत. मात्र अशा असंघटित लढ्याला चिरडणे, खच्चीकरण व खिळखिळे करणे. व्यवस्थेला सहज शक्य असते .
सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे . असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . माथी भडकावणारी भाषणबाजी आणि त्यात रील स्टार्सनी उथळपणाचे हिडीस प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे .
भुछत्रा प्रमाणे उगवणाऱ्या संघटना आहेत. निवडक तरुण काही तरी करायचे आहे हा उद्देशाने बाहेर पडत आहेत. परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे नेतृत्व जवळपास दिसत नाही.
अस्तित्वात असणाऱ्या संघटना नामधारी व बहुतांशी भरकटलेल्या आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या संकटाचे आकलन नसल्याने सांस्कृतिक चळवळीकडे सपशेल कानाडोळा आहे. फसव्या पुरोगाम्यांची धर्माबाबत बोटचेपी भुमिका जैसेथे सुरूच आहे.
मीडियाच्या माध्यमातून विकासाची धुळफेक, धर्माची अफू व द्वेषाची पेरणी करून जनतेला बेअक्कल केले आहे.
आता पुन्हा सगळे नव्याने सुरू करणासाठी अवधी उरलेला नाही. आपण साध्या शिक्षण संस्था उभ्या करू शकलेलो नाहीत. होत्या त्या सांभाळू शकलो नाहीत. सगळीकडे लोकशाहीच्या स्तंभांची पोखरणी झालेली आहे.

0 comments: