Monday, 27 July 2026

विद्यार्थी आंदोलन : एका राजीनाम्यापलीकडचे काही महत्त्वाचे संकेत


शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा तात्कालिक यश व परिणाम असला, तरी या आंदोलनाचे महत्त्व केवळ एका राजीनाम्यापुरते मर्यादित नाही. कोणतेही आंदोलन केवळ त्याच्या तात्काळ फलश्रुतीवर मोजता येत नाही. अनेकदा त्याचे दूरगामी सामाजिक, राजकीय आणि वैचारिक परिणाम पुढील काही वर्षांत दिसून येतात. या विद्यार्थी आंदोलनानेही असेच काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

१. लोकशाही अजूनही जिवंत आहे.

गेल्या काही वर्षांत अनेकांना असे वाटू लागले होते की आंदोलने करून फारसा परिणाम होत नाही. निर्णय आधीच ठरलेले असतात आणि जनतेचा आवाज फारसा ऐकला जात नाही, अशी भावना समाजात निर्माण झाली होती. या आंदोलनाने किमान एवढे दाखवून दिले की, संघटित, सातत्यपूर्ण आणि लोकशाही मार्गाने उभारलेला संघर्ष सत्तेला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यामुळे लोकशाहीवरील विश्वास काही प्रमाणात दृढ झाला आहे.

२. विरोधी राजकारणाला ऊर्जा मिळू शकते.

या आंदोलनामुळे विरोधी पक्षांना नवसंजीवनी मिळू शकते. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की, जनतेला आजही सक्षम आणि प्रभावी विरोधी पक्षाची गरज वाटते. लोकशाही केवळ सत्ताधारी पक्षावर उभी राहत नाही; तर सत्तेला प्रश्न विचारणारा आणि पर्याय देणारा मजबूत विरोधही तितकाच आवश्यक असतो. या आंदोलनाने ती गरज पुन्हा अधोरेखित केली. विकास केवळ सत्ताधारी नाही विरोधात राहुनही करता येतो.

३. "जय भीम"चा वाढता सामाजिक स्वीकार, प्रश्नाधारित राजकारण आणि बदलता राष्ट्रवाद

या आंदोलनातील सर्वात सकारात्मक बाबांपैकी एक म्हणजे "जय भीम" या अभिवादनाचा वाढता स्वीकार. आजची तरुण पिढी जात-धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन संविधान, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांशी स्वतःला जोडताना दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून भारतीय लोकशाहीचे वैचारिक अधिष्ठान आहेत, याची जाणीव अधिक व्यापक होत असल्याचे हे लक्षण मानता येईल.

याच आंदोलनातून सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू बदलताना दिसला. जात, धर्म, भाषा किंवा प्रांत यापेक्षा परीक्षा, शिक्षण, रोजगार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे प्रश्न केंद्रस्थानी राहिले. मंदिर-मशीद, धार्मिक ध्रुवीकरण किंवा ओळख-आधारित राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य दिले.

यामुळे भारतीय राजकारणात प्रश्नाधारित (Issue Based Politics) राजकारणाला नवी दिशा मिळू शकते, असे संकेत या आंदोलनातून दिसतात. पुढील काळात राजकीय पक्षांनाही शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था आणि सुशासन यांसारख्या प्रश्नांवर अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल असे वाटते.

त्याचबरोबर राष्ट्रवादाच्या संकल्पनेतही काही बदल जाणवतात. धार्मिक किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादापेक्षा संविधान, लोकशाही, समान संधी आणि नागरिकांचे अधिकार यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राष्ट्रवादाचा स्वीकार करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. या सर्व घडामोडी पाहता भविष्यात भारतीय राजकारण धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित प्रश्नांभोवती अधिक फिरू लागेल का, हा प्रश्न उपस्थित होतो.

४. नेतृत्वाच्या स्वीकारातील सामाजिक बदल

या आंदोलनातून आणखी एक महत्त्वाचा सामाजिक संकेत मिळाला. अभिजीत दीपके हे महाराष्ट्रातील दलित समाजातून आलेले विद्यार्थी नेतृत्व म्हणून पुढे आले आणि त्यांच्या नेतृत्वाला विविध जाती, धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनी स्वीकारले.

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या लोकप्रियतेची नाही. नेतृत्वाचे मूल्यमापन जातीपेक्षा संघर्ष, प्रामाणिकपणा आणि भूमिकेच्या आधारे करण्याची मानसिकता नव्या पिढीत विकसित होत असल्याचा हा सकारात्मक संकेत आहे.

५. Gen Z : या आंदोलनाचा खरा नायक

माझ्या मते, या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे आजची Gen Z पिढी.

या पिढीवर अनेकदा "ही फक्त सोशल मीडियाची पिढी आहे", "तिला सामाजिक प्रश्नांची जाणीव नाही", अशा टीका केल्या जातात. पण या आंदोलनाने तो समज चुकीचा ठरवला.

ज्या वातावरणात सत्ताधारी पक्ष प्रभावी आहे, विरोधी पक्ष कमकुवत असल्याची भावना आहे, मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात आणि राज्ययंत्रणा आंदोलनांविषयी कठोर भूमिका घेऊ शकते, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी एवढे व्यापक आणि परिणामकारक आंदोलन उभे करणे ही साधी गोष्ट नाही.

भारतीय इतिहासात विद्यार्थ्यांनी अनेक वेळा परिवर्तनाची सुरुवात केली आहे. स्वातंत्र्यलढा, जेपी आंदोलन, आसाम आंदोलन, मंडल आंदोलन किंवा भ्रष्टाचारविरोधी चळवळी अनेक टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. या आंदोलनाने त्या परंपरेची पुन्हा आठवण करून दिली.

या आंदोलनाने डिजिटल युगातील आंदोलनांचे बदलते स्वरूपही स्पष्ट केले. हे आंदोलन कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाच्या स्पष्ट आदेशावर उभे राहिल्याचे निश्चितपणे म्हणता येत नाही. उलट सोशल मीडिया, डिजिटल नेटवर्किंग आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेतून ते देशभर विस्तारले. त्यामुळे भविष्यातील आंदोलने अधिक विकेंद्रित (Decentralised), डिजिटल आणि स्वयं-संघटित (Self Organised) असू शकतात, असा संकेत यातून मिळतो.

आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा मंच राहिलेला नाही. तो जनमत निर्माण करणारे प्रभावी लोकशाही माध्यम बनला आहे. पारंपरिक माध्यमांनी एखाद्या विषयाकडे कमी लक्ष दिले, तरी डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने लाखो तरुण काही तासांत एका समान प्रश्नाभोवती संघटित होऊ शकतात.

६. हे आंदोलन कोणाच्या प्रेरणेने होते?

या आंदोलनाबाबत विविध राजकीय दावे-प्रतिदावे होत आहेत. हे आंदोलन कोणत्या विचारसरणीने किंवा संघटनेने प्रेरित होते, यावर आज निश्चित निष्कर्ष / आरोप करणे योग्य ठरणार नाही.

आंदोलन प्रायोजित होते की स्वयंप्रेरणेने उभे राहिले, याचे उत्तर त्याच्या पुढील वाटचालीतून, नेतृत्वाच्या भूमिकेतून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांतून अधिक स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.

७. आंदोलने समाजपरिवर्तन घडवतात का?

याबाबत माझी भूमिका थोडी वेगळी आहे.

मुळात मी रस्त्यावरच्या आंदोलनांचा फारसा समर्थक नाही. माझ्या मते मनपरिवर्तन, विचारपरिवर्तन आणि मतपरिवर्तन हीच टिकाऊ परिवर्तनाची खरी साधने आहेत. सरकार बदलले म्हणून समाज बदलत नाही; समाज बदलतो तो विचार बदलल्याने.

आज या आंदोलनाची फलश्रुती एका मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या रूपाने दिसत आहे. हा लोकशाहीतील उत्तरदायित्वाचा भाग म्हणून महत्त्वाचा आहे. पण केवळ मंत्री बदलल्याने शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. NEET, शिक्षणाचे व्यापारीकरण, प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी आणि व्यवस्थेतील संरचनात्मक दोष तशाच राहतील.

याचा अर्थ आंदोलने निरर्थक आहेत, असा मात्र होत नाही. आंदोलने समाजाला प्रश्न विचारायला शिकवतात. ती जनमत तयार करतात. सत्तेला उत्तरदायी ठेवतात आणि लोकशाही जागी ठेवतात. मात्र कोणत्याही आंदोलनाचे अंतिम मूल्य त्यातून संस्था, धोरणे आणि व्यवस्थेत किती बदल घडतात यावर ठरते.

८. तिसऱ्या राजकीय आघाडीची चाहूल?

या आंदोलनातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. भारतीय राजकारणात तिसऱ्या पर्यायासाठी जागा निर्माण होत आहे का?

गेली अनेक दशके देशातील राजकारण प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आले आहे. अनेक मतदारांनी एका पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करून दुसऱ्या पक्षाला संधी दिली. परंतु काही मतदार, विशेषतः तरुण वर्ग, आता या पारंपरिक द्विध्रुवीय राजकारणापलीकडे पर्याय शोधताना दिसत आहेत.

माझ्या निरीक्षणानुसार, आजच्या तरुण पिढीला केवळ सत्ताबदल नको आहे; तिला राजकारणाची शैली, प्राधान्यक्रम आणि मूल्ये बदललेली पाहायची आहेत. रोजगार, शिक्षण, सामाजिक न्याय, पारदर्शकता, उत्तरदायित्व, संविधान आणि लोकशाही या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा या पिढीकडून व्यक्त होताना दिसते.

यामुळे एक प्रश्न निर्माण होतो. भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेवणारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर उभी राहणारी नवी राजकीय आघाडी किंवा प्रवाह आकार घेत आहे का?

या प्रश्नाचे उत्तर आज निश्चित देता येणार नाही. परंतु या आंदोलनाने किमान एवढे दाखवून दिले आहे की, नव्या पिढीतील काही तरुण पारंपरिक राजकीय चौकटींपलीकडे विचार करण्यास तयार आहेत. ते व्यक्तिपूजेपेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण, संविधाननिष्ठ भूमिका आणि उत्तरदायी शासन यांची अपेक्षा करतात.

जर ही ऊर्जा पुढे संघटित वैचारिक चळवळीत, सामाजिक कार्यात आणि पर्यायी राजकीय नेतृत्वात रूपांतरित झाली, तर भारतीय राजकारणात तिसऱ्या वैचारिक पर्यायाची जागा अधिक मजबूत होऊ शकते.

९. पुढचा मार्ग

या आंदोलनाने एक संधी निर्माण केली आहे. आता ही ऊर्जा केवळ एका राजीनाम्यापुरती मर्यादित न राहता शिक्षणव्यवस्थेतील धोरणात्मक सुधारणा, संविधाननिष्ठ विचार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तरदायी शासन आणि सामाजिक जागृती याकडे वळली, तरच या आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होईल.

इतिहास सांगतो की समाज केवळ सत्ताबदलाने बदलत नाही; तो विचारबदलाने बदलतो.

म्हणूनच माझ्या दृष्टीने या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय एका मंत्र्यांचा राजीनामा नसून, संविधान, लोकशाही, समता आणि उत्तरदायित्व यांवर विश्वास ठेवणारी, जात-धर्माच्या चौकटींपलीकडे विचार करणारी आणि शांततापूर्ण पद्धतीने संघटित होऊन प्रश्न विचारणारी नवी तरुण पिढी देशासमोर उभी राहत आहे, हा आहे

Saturday, 18 July 2026

एनजीओ वृत्तीचे अराजकीय नेतृत्व आणि परिवर्तनवादी राजकारण

 

एनजीओ वृत्तीचे अराजकीय नेतृत्व आणि चळवळी यांच्याकडे नेहमी चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे. अशा हस्तक्षेपांमुळे अनेकदा मूळ राजकीय प्रश्न दुय्यम ठरतात. तात्कालिक समस्यांवर उपाय शोधले जातात; परंतु अन्याय निर्माण करणाऱ्या सत्तासंबंधांवर आणि व्यवस्थेवर आवश्यक तेवढा प्रहार होत नाही. परिणामी, सक्षम, स्वायत्त आणि परिवर्तनवादी राजकीय नेतृत्व उभे राहण्याची प्रक्रिया कमकुवत होऊ शकते.

मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांनी नर्मदा खोऱ्यातील विस्थापित व आदिवासींच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. मात्र, या संदर्भात असा युक्तिवादही मांडला जातो की, बाहेरून होणारा हस्तक्षेप काही वेळा स्थानिक समाजातून नेतृत्वाची नैसर्गिक उभारणी मर्यादित करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “आई” आणि “दाई” यांतील फरक सांगताना याच मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. त्यांचा आशय असा होता की, समाजाची मुक्ती आणि शाश्वत उन्नती त्या समाजाच्या स्वतःच्या नेतृत्वातूनच अधिक प्रभावीपणे घडते.

आंदोलनांमुळे जनजागृती, संघटन आणि सत्तेवर दबाव निर्माण होऊ शकतो; परंतु केवळ आंदोलनांमधून नवी व्यवस्था निर्माण होत नाही. काही वेळा अशी आंदोलने हिंसक वळणही घेऊ शकतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपोषण, कायदेभंग आणि संसदीय लोकशाहीला बगल देणाऱ्या आंदोलनात्मक मार्गांना “अराजकतेचे व्याकरण” असे संबोधत त्यांच्याविषयी गंभीर इशारा दिला होता.

म्हणूनच, जर राजकीय स्थित्यंतर घडवायचे असेल, तर केवळ सत्ताबदल पुरेसा ठरत नाही. त्या स्थित्यंतराची राजकीय वृत्ती, मूल्याधिष्ठान आणि दिशा आधी निश्चित केली पाहिजे. अन्यथा बदलाच्या नावाखाली जुन्याच सत्ताकेंद्रांना किंवा अवलंबित्वाच्या नव्या रूपांना बळ मिळण्याचा धोका कायम राहतो. अण्णा आंदोलनानंतरच्या राजकीय घडामोडींकडे अनेक जण या संदर्भात उदाहरण म्हणून पाहतात.

मुळात, जीवननिष्ठेची सांस्कृतिक ब्राह्मणी चौकट कायम ठेवूनही परिवर्तनवादी चळवळी किंवा आंदोलने उभी राहू शकतात. ती काही काळासाठी प्रचंड जनउत्साह, भावनिक लाट आणि सनसनाटी वातावरण निर्माण करू शकतात. मात्र, अशा चळवळी समाजबदलासाठी आवश्यक असलेले मूलगामी परिवर्तन घडवून आणतील, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

कारण सामाजिक परिवर्तनासाठी केवळ सत्ताबदल किंवा एखाद्या प्रश्नावरील आंदोलन पुरेसे नसते. त्यासाठी मूल्यव्यवस्था, जीवनदृष्टी, सत्तासंबंध आणि सांस्कृतिक वर्चस्व यांच्यावर मूलभूत चिकित्सा आवश्यक असते. जर सांस्कृतिक आणि वैचारिक चौकट पूर्ववतच राहिली, तर परिवर्तनाच्या नावाखाली व्यवस्थेचे केवळ बाह्य रूप बदलते; अन्यायाची मुळे मात्र तशीच कायम राहतात.

म्हणूनच परिवर्तनवादी राजकारणाचे मूल्यांकन करताना केवळ आंदोलनाचा आकार, जनसमर्थन किंवा तात्कालिक यश यांवर न थांबता, त्या चळवळीची वैचारिक दिशा, सांस्कृतिक भूमिका आणि समाजात उभे राहणारे स्वायत्त नेतृत्व यांचाही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

Friday, 29 May 2026

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

चळवळ


दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे.

अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

आणि समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

दलित-बहुजन समाजातील शिक्षण, नोकरी आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेला मध्यमवर्ग हा एक महत्त्वाचा सामाजिक बदल आहे. पण त्या वर्गातील काही घटकांनी सामाजिक बांधिलकी विसरून केवळ वैयक्तिक प्रगतीवर भर दिला, तर त्यातून चळवळीची सामूहिक ताकद कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.


सत्तेच्या जवळ राहून लाभ मिळवणारा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सामाजिक विषमता दुर्लक्षित करणारा आणि स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्या समाजातील लोकांचाच वापर करणारा मध्यमवर्ग ही अनेक सामाजिक चळवळींसमोरची वास्तविक समस्या आहे. हा प्रश्न फक्त आर्थिक नाही; तो नैतिक आणि राजकीयही आहे.


मात्र याचवेळी संपूर्ण मध्यमवर्गाला एकसारखे ठरवणेही योग्य ठरणार नाही. कारण याच वर्गातून शिक्षक, लेखक, वकील, कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक नेतृत्वही उभे राहिले आहे. प्रश्न “मध्यमवर्ग” असण्याचा नाही, तर आपल्या उन्नतीची दिशा समाजाशी जोडलेली आहे का याचा आहे.


म्हणूनच संघर्ष दोन पातळ्यांवर आहे 

१. अन्यायकारक सत्ताव्यवस्थेविरुद्ध,

२. समाजातील स्वार्थी, चळवळविरोधी प्रवृत्तीविरुद्ध.


बाबासाहेबांनी “Educate, Agitate, Organize” दिलेला संदेश केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हता; तो सामूहिक मुक्तीसाठी होता. समाजातून वर आलेल्या प्रत्येकाने “मी समाजासाठी काय परत देतो?” हा प्रश्न विचारणे तितकेच आवश्यक आहे.


बाबासाहेबांनी बुद्धाला डोळे मिटलेला बुद्ध म्हणून समोर न आणता बुद्ध हा सामाजिक क्रांतिकारक म्हणून मांडला आहे हे आपण समजलो पाहिजे. धम्माचा उद्देश त्यांना या जगाची पुर्रचना करणे व ती धम्माचा तत्त्वांवर करणे अपेक्षीत होते.

Thursday, 19 March 2026

वैचारिक मतभेद

मला टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. कारण विचारभिन्नता ही कोणत्याही व्यक्तीला, समूहाला, संघटनेला व समाजाला अधिक समृद्धच करत असते. ती समाजाची, संघटनेची ताकद असते. वेगवेगळे दृष्टिकोन हे आपल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती व ज्ञान यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपसुकच भिन्न अनुभव आणि भिन्न विचारधारा असु शकतात. खरतर यामुळेच समाजात निरंतन चिंतनाची प्रक्रिया चालू राहते. मतभेद असणे हे धोकादायक नसते; उलट ते बौद्धिक प्रामाणिकतेचे आणि स्वातंत्र्याचे लक्षण असते.

प्रामाणिक बुद्धिवंत म्हणजे आपण जे मानतो ते प्रामाणिकपणे मांडणे व आचरण करणे. तर्काने चर्चा करणे आणि गरज पडली तर स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवणे. मी म्हणतो केवळ तेच बरोबर हा अट्टाहास न करता. आणखीन, नवीन बाजु अधिक योग्य असु शकते यावर विश्वास ठेवणे होय. 

परंतु; जेव्हा चर्चा सत्य शोधण्यासाठी नसते, तर दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी असते. जेव्हा विचार मांडणे हा उद्देश नसतो, तर बौद्धिक चातुर्य व आकडेवारीचा खेळ करून. दिशाभूल करणे हा हेतू असतो. तेव्हा ती चर्चा राहत नाहीत, ती लबाडी, खोडसाळपणा आणि बौद्धिक दिवाळखोरी ठरते. अशा हुशार असणाऱ्या व्यक्तींना प्रामाणिक बुद्धिवंत म्हणता येणार नाही.

तेव्हा अशी चर्चा केवळ मतभेदांची राहत नाही; ती नैतिक अध:पतनाची सुरुवात असते. कदाचित होऊ घातलेल्या संकटाची पेरणी असते.

म्हणूनच शतदा टोकाचे वैचारिक मतभेद मान्य आहेत. तुम्ही माझ्याशी असहमत असू शकता, माझ्या विचारांवर कठोर टीका करू शकता. त्यात काहीच गैर नाही. पण चर्चा प्रामाणिक असावी, तर्कावर आधारित असावी आणि नैतिकतेची किमान सीमा तरी पाळणारी असावी. कारण एकता म्हणजे आपण सगळे एकसारखे होणे,किंवा एकच ध्येयाप्रती एकसमान वेगाने व दिशेने विचार करणे नव्हे. खरी एकता म्हणजे वैचारिक मतभिन्नता असून व त्या मत स्वातंत्र्याचा आदर करत विविधतेत देखील एकता साधणे होय. 

कारण शेवटी विचारांचा संघर्ष समाजाला पुढे नेतो; पण लबाडी आणि खोडसाळपणा समाजाला अंधाराकडे ढकलतात. म्हणूनच मला अज्ञान व अशिक्षितपणा मान्य आहेत. अशांना सज्ञानी व सुशिक्षित केले जाऊ शकते. परंतु बौद्धिक आणि नैतिक भ्रष्टता अधिक घातक आहे व ती मला कधीच मान्य नाही.

Wednesday, 18 March 2026

शोषितांचे अंधानुकरण


🟦🟨🟥🟧

शोषित वर्ग (वर्ण) म्हणजे: ज्यांचे शोषण होत आहे. शोषण हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, लैंगिक अशा अनेक अर्थाने व अंगाने असू शकते . भारतात शोषित वर्ग आणि शोषित वर्ण अनेकदा एकाच आहे. हा शोषित वर्ग अनेकदा शोषक वर्गाच्या जीवनशैलीचे (संस्कृती), वर्तनाचे, भाषेचे किंवा (निकृष्ठ )मूल्यांचे आंधळेपणाने अनुकरण करत असतो. ब्राम्हो-भांडवली व्यवस्था तसे करवून घेत असते.

हे अंधअनुकरण प्रामुख्याने मानसशास्त्रीय दडपणातून आणि सामाजिक स्वीकाराच्या इच्छेतून जन्माला येते. शोषित वर्गास वाटते की, असे केल्याने त्यांना समाजात मान-पान , प्रतिष्ठा (सगे-सोयरे ) आणि उच्च स्थान मिळेल.परंतु अशी प्रतिष्ठा अनेकदा आभासी असते. ती बाह्य स्वरूपावर आधारलेली असते, आत्मसन्मानावर नव्हे. शोषित वर्गाने शोषक वर्गाचे आंधळे अनुकरण करणे हा केवळ वर्तनाचा प्रश्न नसून तो मानसिक गुलामगिरी स्वीकारण्याचा प्रकार देखील आहे. मूलत: सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या परस्परसंबंधांचा तो परीपाक असतो.

प्रथम, या विचारामागील सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजात जेव्हा आर्थिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विषमता वाढते, तेव्हा श्रेष्ठत्वाची प्रतिमा शोषक वर्गाशी जोडली जाते. परिणामी, शोषित वर्गाला त्या प्रतिमेचे अनुकरण करणे म्हणजे सामाजिक उन्नतीचा मार्ग आहे असे वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहता, ही कृती स्वीकृतीची गरज आणि निम्नगंड यांमधून उद्भवते. त्यामुळे हे अनुकरण त्यांना तात्पुरती आत्मतृप्ती आणि आभासी सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करते.

मात्र, या प्रक्रियेत एक मूलभूत विरोधाभास दडलेला आहे. ते स्वीकारतांना शोषक उलट, स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि ओळखीचा त्याग करत असतो.व त्यास दुय्यम स्थान देत असतो. अशा प्रकारचे अनुकरण हे सामाजिक संरचनेतील असमानतेला आव्हान देत नाही; ते त्या असमानतेला अधिक दृढ करते. म्हणूनच शोषित वर्गाने व त्यांच्या वर्तमानातील म्होरक्यांनी याचे ‘भान ठेवावे’.

तथापि, या चिकित्सा करताना एक दुसरा पैलूही लक्षात घ्यावा. सर्वच अनुकरण हे नकारात्मक असते असे नाही. प्रगतीसाठी, शिक्षणासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी काही मूल्यांचे स्वीकारणे आवश्यक असू शकते. प्रश्न आंधळेपणाचा आहे.जिथे विवेक हरवतो आणि स्वतःची अस्मिता दुय्यम ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नाही. तेथे अनुकरण आणि आत्मविकास यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे. हा भेद उलगडून सांगणे हे जुन्या जाणत्या व प्रज्ञाशीलांचे काम आहे.

शोषितांना आत्मभान जागृत करण्याचा संदेश देऊन. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्याचे रूप धारण करण्यात नसून, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून समानतेसाठी उभे राहण्यात आहे. हे अधोरेखीत व्हावे व होत राहावे इतकंच.

Sunday, 8 February 2026

निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

 निद्रिस्त जन आणि भरकटलेल्या संघटना

मी जेथे उभा आहे तेथून मला चळवळी बाबत फार आशादायी चित्र दिसत नाही . मुळात सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि वैचारिक भुमिकांच्या शेवटाचा हा काळ असावा असे एकूण चित्र आहे . जगभरात भांडवशाही  ही हुकूमशाही सोबत मिरवत आहे. असे असले तरी सामाजिक जाणिवेतून आलेले कार्यकर्ते आणि मोजक्या संघटना खिंड लढवत आहेत. परंतु त्यांच्यापाठी जनसमूह प्रामाणिकपणे उभा राहताना दिसत नाही.  समाजाला आता चळवळीची गरज उरली नाही काय? हा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. कारण ज्यांच्यासाठी कार्यकर्ते हि चळवळ चालवतात त्यांनीच पाठ फिरवलेली दिसते आहे. 


वर्तमान स्तिथीत व्यवस्थेने घडवून आणलेली एक गोष्ट म्हणजे संघटनांची केलेली मोडतोड. संघटित नसल्यामुळे कार्यकर्ते एकाकी लढत आहेत .व्यवस्थेशी थेट दोन हात करत आहेत. मात्र अशा असंघटित लढ्याला चिरडणे, खच्चीकरण व  खिळखिळे करणे. व्यवस्थेला सहज शक्य असते .


सुमारांच्या सद्दीचा हा काळ आहे . असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . माथी भडकावणारी भाषणबाजी आणि त्यात रील स्टार्सनी उथळपणाचे हिडीस प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे .


भुछत्रा प्रमाणे उगवणाऱ्या संघटना आहेत. निवडक तरुण काही तरी करायचे आहे हा उद्देशाने बाहेर पडत आहेत. परंतु त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करणारे नेतृत्व जवळपास दिसत नाही.


अस्तित्वात असणाऱ्या संघटना नामधारी व बहुतांशी भरकटलेल्या आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या संकटाचे आकलन नसल्याने सांस्कृतिक चळवळीकडे सपशेल कानाडोळा आहे. फसव्या पुरोगाम्यांची धर्माबाबत बोटचेपी भुमिका जैसेथे सुरूच आहे.

मीडियाच्या माध्यमातून विकासाची धुळफेक, धर्माची अफू व द्वेषाची पेरणी करून जनतेला बेअक्कल केले आहे. 


आता पुन्हा सगळे नव्याने सुरू करणासाठी अवधी उरलेला नाही. आपण साध्या शिक्षण संस्था उभ्या करू शकलेलो नाहीत. होत्या त्या सांभाळू शकलो नाहीत. सगळीकडे लोकशाहीच्या स्तंभांची पोखरणी झालेली आहे.

Saturday, 7 February 2026

चळवळीची गरज काय?

 मुळात या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लैंगिक विषमता हजारो वर्षापासून आहे; आणि ही विषमता फक्त व्यवहारात नसून व्यक्तींच्या विचारात, मना-मनात ठासून भरलेली आहे. ही विषमता कायम त्यांच्या मनात धगधगती राहो यासाठी काही समाज विघटनकारी शक्ती कायम कार्यरत असतात. अगदी या विषमतावादी व्यवहाराला वैचारीक समर्थन व पाठबळ देणारी पुस्तके, धर्मग्रंथ देखील लिखीत आहेत. या विषमतावादी विचारांच्या संघटना मग त्या राजकीय , धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्तरावरील असतील. जाती वा या जातींचा  मिळून तयार झालेला शोषक वर्ग असेल. संस्कृतीच्या नावाने आर्थिक शोषण करणारे, वैचारिक दारिद्र्य देणारे असतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात कायम स्वतःचे अजिंडे पिढ्यान पिढ्या राबवणारे भामटे असतील.हे सर्व या विषमतावादी व्यवस्थेला बळ देत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी  विषमतावादी व्यवस्था पुढे नेत असतात. बहुसंख्य समाजाचे शोषण करत असतात.








जोपर्यंत ही विषमतावादी शोषण करणारी व्यवस्था आहे. त्या विषमतावादी व्यवस्थेचे लाभार्थी व पुरस्कर्ते आहेत. अन्याय करणारे अन्यायकर्ते आहेत. शोषण करणारे शोषक आहेत. जातीवाद करणारे जात्यांध आहेत. 


अगदी उलट त्याच्या दुसऱ्या बाजूला शोषित आहेत. जे पीडित आहेत. दीन दलित व वंचित आहेत. जेव्हा-जेव्हा शोषितांना गुलामीची, अन्याय अत्याचाराची जाण होईल. स्वाभिमानाची जाग येईल. 

तेव्हा त्या व्यक्तीला, समाजाला, देशाला चळवळीची गरज असेल. 


प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना- ज्यांना म्हणून स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हवा आहे. त्यांना चळवळीची गरज आहे. प्रत्येक काळात स्वतःच्या न्याय हक्कासाठी बंडाचे निशाण घेऊन लढाईच्या मैदानात उतरणाऱ्या सैनिकांना चळवळीची गरज आहे. सामाजिक अस्थिरता, अगतिकता व अल्पसंख्यांकांच्या दडपशाहीच्या काळात तर चळवळी शिवाय त्यांना गत्यंतर नाही. चळवळ करणे हा त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे. त्यांना जगण्यासाठी देखील चळवळ करावी लागेल. ज्यांना गुलामीच्या बेडीतुन मुक्त व्हायचं असेल ;तर त्यांना चळवळ करावी लागेल. जरी ते थेट चळवळीत नसतील तरी चळवळ नाकारण्याचे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नाही. त्यांचे जिवंत असणेच हे चळवळ आहे. तुमचे उच्च शिक्षण घेणे, तुमचे उंची कपडे परिधान करणे, मोठ-मोठ्या हुद्यावर काम करणे, तुम्ही नेतृत्व करणे हे सगळे चळवळ आहे. कारण या सगळयालाच त्यांचा विरोध आहे.


त्यामुळे जोपर्यंत विषमतावादी व्यवस्था आहे. तोपर्यंत आपसुकच चळवळ असेल. ही संविधानवादी व्यवस्था टिकवून ठेवणे हे या चळवळीचे काम आहे. 

Saturday, 20 September 2025

परिवर्तन


 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर बाबासाहेबांनी दिल आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा आणि पंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बुद्धीला पटला. तो धम्म, ते विचार त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे विचारांच आपलं एक महत्त्व आहे. यात काही शंका नाही. 


परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी जो धम्म या देशाचा प्रमुख जीवन मार्ग होता. तो धम्म या भूमीवरती संपुष्टात आला होता. अर्थात बाबासाहेबांनी जर त्याला  पुनर्जीवित केले नसते; तर भारतात बौद्ध धम्म पुन्हा गतिमान झाला असता का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. 


त्यामुळे सदर दोन मुद्द्यातून हे स्पष्ट होते विचार चांगले असले की ते कालातीत असतात. परंतु असे असले तरी त्या विचारांचे लोक,विचार प्रचार प्रसार व संरक्षण करणारे लोक जर नसतील; तर विचार कितीही चांगला असला तरी तो कायमचा संपुष्टात येऊ शकतो. हे बाबासाहेबांनी देखील म्हटले आहे.


त्यामुळे वरील मुद्द्यातून हे स्पष्ट होते की विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळाले तरच तो टिकतो. आजच्या भाषेत राजकीय पाठबळ असेल तरच अधिक विस्तृत होतो.


उदाहरण दाखल आपण बुद्धांकडे वळूया. बुद्ध हे राजपुत्र होते. बुद्ध हे अडीच हजार वर्षांपूर्वी राजपुत्र होते आणि साधेसुधे राजपुत्र नसून सुखाच्या पायघड्या त्यांच्या पायाशी लोळण घालत होत्या असे अत्यंत विलासित जीवन ते व्यतीत करत होते. आता विचार करा अडीच हजार वर्षांपूर्वी असा सुंदर आणि श्रीमंत राजपुत्र जर गृहत्याग करत असेल तर त्याचा परिणाम  इतर जनमानसात व राज संबंधात सर्व दूर पोहोचल्यानंतर त्याचे ऐतिहासिक परिणाम होणार नाहीत का? मला येथे सांगायचं आहे की बुद्ध हे राजपुत्र होते.  सत्तेशी- शक्तीशी जवळचे असल्यामुळे जनमानसावरती ऐतिहासिक प्रभाव टाकणे व पडणे साहजिक होते. त्या काळात अहिंसा,शांतता प्रिय इतरही धर्म, पंथ ,विचार व प्रचारक होते. अडीच हजार वर्षांपूर्वी गृहत्याग करून अंतिम सत्य शोधण्यासाठी न जाणो कित्येक जीव डोंगरदर्या खोऱ्यात फिरत होते. बुद्धांच वेगळ पण त्यांच्या सामान्यजनापासून वेगळ असण्यात आहे. त्यांच्या राजपुत्र असण्यात आहे. हे मला येथे नमूद करावयाच आहे. विचार करा जर बौद्ध धम्माला राजश्रय प्राप्त झाला नसता. तर त्याला लोकश्रय प्राप्त झाला असता का? देशा परदेशात धम्म पोहोचु शकला असता काय?


अजून उदाहरण पाहू. लक्षात घ्या बुद्ध राजपुत्र होते. महात्मा फुले हे एक श्रीमंत आजच्या भाषेत बिल्डर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्या काळात मिलिटरी मध्ये शिक्षक होते. जेव्हा दलितांना शिक्षणाचा गंध देखील नव्हता. तेव्हा बाबासाहेब या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्या घेत होते. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा दस्तूरखुद्द केळुस्कर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजश्रय त्यांना लाभला आहे. सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. लक्षात घ्या बाबासाहेब ब्रिटिश राजवटीत देखील प्रबळ नेता व मंत्री होते. गांधींच्या व काँग्रेसच्या काळात देखील ते संविधानाचे निर्माते व मंत्री होते. सत्ता आणि शक्ती बाबासाहेबांचा हातात असल्यामुळे अनेक धाडसी निर्णय व कार्य ते करू शकले. ही सत्तेची किमया बाबासाहेब भलीभाती जाणत होते.


मला येथे हे सांगायचं आहे की ही चळवळ चालवण्यासाठी राजश्रय व लोकश्रय खूप महत्त्वाचा असतो. शक्तीचे स्त्रोत तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही विधायक काम करू शकत नाहीत. सम्राट अशोक जर राजा नसते तर ते इतके शिलालेख व धम्मकार्य निर्माण करू शकले असते काय? ते शिलालेख लिहिणाऱ्या किती सामान्य कारागिरांची नावे आपल्याला ज्ञात आहेत? त्यामुळे सत्ता नेहमी महत्त्व ठेवून असते.


मार्क्सवादाचे उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स हयात असताना मार्क्सवाद किती फोफावला? आणि त्यानंतर लेनिन जेव्हा सत्तेत आला त्यानंतर मार्क्सवादाचे स्वरूप आणि आवाका किती मोठा होता हे आपण नजरेआड करून चालणार नाही.


आता वर्तमानाकडे येऊ या. भारतातील जेवढे काय म्हणून अब्जाधीश श्रीमंत लोक आहेत ते आपसूकच जातीने सवर्ण वर्गातून कसे येतात? संख्येने केवळ तीन ते पाच टक्के असणारे हे लोक भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 90 ते 95 टक्के जागा व्यापून आहेत. हा केवळ योगायोग नाही. जगभरात देखील स्थिती काही फार वेगळी नाही. जगभरातील 90% साधन संपत्ती ही केवळ तीन ते पाच टक्के लोकांकडे आहे. आणि तरीही सर्व काही अलबेल सब चंगा सुरू आहे.


या देशातील जेलमध्ये जाणारे लोक बेल न मिळाल्याने जेलमध्ये कोंबलेले लोक कोणत्या वर्णाचे व कोणत्या वर्गाचे आहेत? हे गुपित सत्य आहे.


या देशातील सर्वोच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील जज कोण आहेत. या देशातील निरनिराळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री, व्यापार, सोने-चांदीचे, हिरे व्यापार, शेकडो एकर जमिनीचे मालक कोण आहेत हे उघड सत्य आहे.


ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्या, जतिन मेहता या सर्वांची जातकुळी कोणती? 

एका ठराविक वर्गाच्या हातात येथील व्यवस्था राहिली आहे. नीरा रडिया टेप केस यांची साठ गाठ उघडी पाडते. 


देशातील गरीब जनतेला मग डुकरांना कोंबावे व खाणे द्यावे तशी स्थिती आहे. ८० कोटी लोकांना अल्पदरात (निकृष्ट) धान्य दिले जाते. लाडकी बहीण, भाऊ योजना दिली जाते. मूळ समस्यांवर बगल देऊन. धर्मांधतेची फोडणी दिली जाते.


हे सगळे बदलण्यासाठी व विधायक रित्या परिवर्तन करण्यासाठी बहुसंख्य बहुजनांने आर्थिक सत्तेचे, राजकीय सत्तेचे महत्व समजून घेतले पाहिजे व त्या अनुषंघाने नियोजन केले पाहिजे इतकंच.

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.

Thursday, 19 June 2025

भांडा सौख्यभरे

 



नातं कोणतही असो मित्र-मैत्रिणीच, पती-पत्नीच, भावा- भावच, बाप-लेकाच अथवा दुसरे कोणत. नात्यात कायम गोडी गुलाबीचे दिवस असत नाहीत. असले तर त्या नात्यात कुणीतरी एक वरचढ अथवा एडजस्टमेंट करत असतो. भांडण अथवा चर्चा ही अनेकदा दोन स्पर्धकांमध्ये होत असते. बॉस आणि कर्मचारी यांत ऑर्डर्स दिल्या व पाळल्या जातात. तेथे भांडण उद्दभवत नाही. झालीच तर धुसफूस होते. कारण भांडण करण्यासाठी बोलण्याचं व मत मांडण्याचे स्वातंत्र्य असणे ही पूर्वअट असते. नात्यात भांडण होत नसेल तर शक्यता आहे की, ते दिखावू असेल. कारण म्हणतात ना शेंदूर खर्वडल्याशिवाय देव की दगड हे कळत नसत.


भांडणाने अनेकदा मुद्याची चिकित्सा,समीक्षा होते. त्या मुद्याचे निरनिराळे कांगोर समोर आणले जातात. माझा मुद्दा किंवा माझे मत कसे बरोबर आहे हे पटवण्यासाठी अनेक अंगाने विचार मांडले जातात. समरूप उदाहरण दिली जातात. तुमच्या ज्ञानाची, अनुभवाची, भाषेची, व्यक्तिमत्वाची, आकलनाची, पटवण्याच्या क्षमतेची तेथे कसोटी लागते.


तुमचा मुद्दा पटवून देताना तुम्ही कसली मदत घेता त्यावरून तुमची स्व:ची ओळख समजत असते. तुम्ही तत्वद्यानाची व वैचारिक भिस्त लढवता? शिव्या श्राप व हिंसक भाषेवर उतरता? हात पाय चालवून बळाचा वापर करता? हे सगळं तुमच्या आतील माणसावर, कळत नकळत घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते.



अनेकदा आपण कशासाठी कुणासाठी व कुणासोबत भांडत आहोत हेच अनेक लोक विसरून जातात व भांडण हा मुद्दा बनतो. मुद्यावर भांडण राहत नाही. त्यातून काय मिळणार याचा विचार बाजूला पडून काय बरोबर या पेक्षा मी बरोबर यावर लोक भांडत बसतात. या अहंकार व मी पणाच्या भांडणाला अंत राहत नाही. त्यामुळे मूर्खांशी भांडण देखील करू नये असे म्हणतात ते उगीच नाही.


तुमच्या जिवनात तुमच जिवन समृद्ध करणारे भांडखोर लोक आहेत की कायम मानसिक उच्छाद मांडणारे लोक आहेत यावर खूप काही निर्भर करते.


कॉन्फिडेंट असणारे अनेक लोक मला मूर्ख, श्रीमंत असणारे सरंजामी व भांडणारे स्पष्टोक्ते वाटतात.

Sunday, 18 May 2025

कुटुंब दिन

 


दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.


या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.


पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.


पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.


त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो. 


स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.

Tuesday, 7 January 2025

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर



०५ जानेवारीस नालंदा शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील मनोगत मांडले ते पुढील प्रमाणे.


बुद्धांनी वज्जींना केलेला संदेश आपणास ज्ञात आहे .


हत्तीस आवरी गवती दोर ।

मुंग्या हि सर्पासी करिती जर्जर। व्याघ्रसिंहसी फाडीती हुशार। 

रानकुत्रे संघटोनी। 

तुकडोजींच्या या कवनांची महती देखील आपण जाणता.


लक्षात घ्या. या देशात विषमता आहे. या विषमतेचे कारण केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत. जन्मासोबत जात नावाच लेबल चिटकवून व्यक्तीची प्रतिष्ठा, ओळख, कला-गुण, सामाजिक ओळख, संसाधनांची उपलब्धता यांना एक मर्यादेचे बंधन जन्मभर बांधले जाते.


ही विषमता व ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक,आर्थिक व राजकीय मुठभरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी. स्वतंत्र्य, समता, बंधूत व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघटनेची गरज भासते.


कारण तुम्ही व्यक्तीशी लढत नसून सिस्टीम सोबत लढत आहात. केवळ लढत नसून एक पर्यायी सिस्टीम उभी करू इच्छिता. त्यामुळे हा लढा सर्व अंगानी विषमतावादी, सरंजामी, जातीयवादी विचारांच्या, व्यक्तींच्या व संघटनेच्या विरोधात आहे.


लक्षात घ्या. तेथे व्यक्तीची मुक्ती किंवा आर्थिक उद्धार शक्य आहे. तुम्ही विषमतावादी टोळक्यात जाऊन त्यांच्या अजिंड्याखाली माना डोलवू शकता. परंतु त्याने समाजाची अथवा सामूहिक मुक्ती शक्य नाही. किंबहुना विषमता वादी शक्ती तुमचा वापर संपला की तुम्हाला देखील कचऱ्याप्रमाणे फेकून देतील.


या क्रांती प्रतिक्रांतीच्या लढ्यात स्वतःला जन्माने उच्चभ्रू समजणारा समाज कायम संघटित,शिक्षित व पर्यायाने सत्तेशी सलगी करत आपले प्रस्थ कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेशी सलगी त्यांनी इंग्रजांच्या  काळात केली. मुस्लिम साम्राज्याच्या काळात केली. स्वातंत्र्यानंतर देखील सत्तेत राहुल मलिदा खाण्याचे व बहुजनांचा मलिदा करण्याचे काम अथक अविरत सुरू आहे.


त्यांच्या या यशाचे गमक हा त्यांचं शिक्षण, संघटन, अजिंडा व लबाडी हे आहे. या सगळ्याचा वापर ते विषमतावादी व्यवस्था टिकवण्यासाठी करतात.


या सिस्टिमला पर्याय आपण शिक्षित संघटित व जागृत होऊन आपल्या अजिंड्यावर काम करून दिला पाहिजे.


तत्पूर्वी हे समजून घ्या की, सिद्धार्थ बुद्ध झाले व त्यानंतर त्यांच्या हातून ४५ वर्ष परिवर्तनाचे कार्य झाले. बोधिसत्व बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी दिले. जे जे प्रबुद्ध झाले बोधी झाले त्यांनी परिवर्तनाची कास पकडली.


कार्यकर्त्याने त्यासाठी पंचशिलाचे व शिलमार्गाचे महत्व जाणले पाहिजे. शील समाधी प्रज्ञा न जाणता. पंचशील न अंगीकारता काम करणारे कार्यकर्ते अनेकदा भरकटण्याचे व चळवळीला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम जाणते अजाणते करू शकतात.  त्यामुळे चळवळीत झांगडगुत्ता, संभ्रम देखील झाले. हेही लक्षात घ्या. जातीसंस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना तितकेसे महत्व नाही. शिक्षण व आर्थीक सबलीकरण करा.


धन्यवाद 🙏

Tuesday, 19 November 2024

चळवळ



जगभरात उपलब्ध धर्म, पक्ष,संघटना विचारसरणी,अथवा नेतृत्व याचे परफेक्ट मॉडेल जिवंत अथवा ऐतिहासिक देखील असू शकत नाही. ते कधीच असत नाही. तसे झाले असते तर निरनिराळ्या संघटना,धर्म,नेते इत्यादी उदयास व लयास कधी गेले/गेल्या नसत्या.

आपल्याला अपेक्षित नेता,धर्म,पक्ष,संघटना कशा असायला हव्यात. याचे आपले काही ठोकताळे असतात. ते ठोकताळे आपल्याला आलेले अनुभव, समस्या आणि आपल्या मर्यादित सामाजिक शैक्षणिक,भौगोलिक,ऐतिहासिक ज्ञान/ अज्ञान या सर्वाचे झालेले आकलन व त्याचा आपण लावलेला अन्वयार्थ या गोष्टीवर अवलंबून असतो . 

परंतु व्यक्तीचे अनुभव अथवा ज्ञान हे काही वैश्विक अथवा कालातीत असत नाही. त्याला अनेक आर्थिक,भौगोलिक,सामाजिक मर्यादा असतात. 

त्यामुळे वर्तमानातील उपलब्ध पर्यायांपैकी अधिक उचित / योग्य/ परफेक्ट पर्याय निवडणे अथवा निर्माण करणे. ही प्रक्रिया असते असे मला वाटते. 

ज्यांना-ज्यांना म्हणून परिवर्तन हवे आहे. त्यांना या प्रवाहात यावेच लागेल. प्रवाहाच्या बाहेर राहुन केवळ निरर्थक उपदेश अथवा टीका-टिप्पणी करता येईल. जे करणे सोपे ही आहे. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तिरावर जाण्यासाठी पाण्यात उतरणे ही एकमेव अनिर्वार्यता असते. त्यामुळे ज्यांना परिवर्तन हवे त्यांना पाण्यात/ संघटनेत उतरावेच लागेल. व तो प्रवाह योग्य दिशेने न्यावा लागेल. 

संघटनेत उतरणाऱ्या व्यक्तीला त्याचा हेतू स्पष्ट असावा. तुम्ही चळवळीला देण्यासाठी आलात की घेण्यासाठी हे स्पष्ट असावे. असे जरी असले तरी चळवळीच्या नावाने भावनिक करून अनेकांना राबवून/ वापरून घेण्याचा प्रकार देखील होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेत आपण विद्यार्जन करावे. आपला स्वाभिमान जपता येईल इतके अर्थार्जन करावे. कारण बौद्धिक व आर्थिक दुर्बल कार्यकर्ता चळवळ दुबळी करतो. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहावे, बोलत येईल त्यांनी बोलावे, आर्थिक दान देता येईल त्यांनी ते करावे. परंतु कार्यकर्त्याने आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून चळवळीत उतरावे.

लक्षात घ्या. चळवळ अथवा त्यातील नेते,पदाधिकारी हे काही परग्रहावरून येत नाहीत. त्यामुळे त्यांना राग,प्रेम,लोभ,मद, मोह,मत्सर असते. या सगळ्यांतून सगळेच यशस्वी होऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही संकटातून सम्राट अशोकाच्या मार्गाने जाता,की बुद्धांच्या मार्गाने जाता, की बाबासाहेबांच्या मार्गाने जाता हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असते.

Friday, 14 July 2023

परिवर्तन

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, तुमच्या मिळकतीतील किमान विसावा हिस्सा तुम्ही समाजासाठी दान केला पाहिजे. हे अवाहन दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.  आता प्रश्न असा आहे की, आपण जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवुन घेतात. ते आपल्या मिळकतीतील विसावा हिस्सा समाजासाठी खर्च करतात का;  आणि जर करत नसतील तर आपण खरंच आंबेडकरवादी आहोत का? हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बरं विसावा हिस्सा म्हणजे किती? तर ज्याला लाखभर रुपये पगार आहे.  त्यांनी किमान पाच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे. ज्याला पन्नास हजार रुपये पगार आहे त्यांनी अडीच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे.  आणि ज्याला 25 हजार रुपये आहे त्यांनी १२५० प्रती माह खर्च केला पाहिजे. 


 आता दुसरा प्रश्न असा उरतो आपण जर समाजासाठी हे दान  करत नसून तर ज्या म्हणून आंबेडकरवादी चळवळी आहेत त्या कशा टिकणार? आंबेडकरवादी चळवळी मृतप्राय होण्याचे हे प्रमुख कारण आहे. ज्या समाजाने आंबेडकरी होण्याचा फायदा घेतला. तो समाज आंबेडकरी होण्याचं देणंही लागतो हे तो  स्व-स्वार्थापायी जाणून बुजून विसरला आहे.


 बरं जे जागृत आहेत त्यांनी तरी किमान हा जागृतीचा विस्तव विझु देता कामा नये. तुम्ही-आम्ही आंबेडकरी चळवळीचे डायरेक्ट बेनिफिशरी अर्थात सरळ लाभार्थी आहोत. तो लाभ आपण सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व राजकीय अशा निरनिराळ्या स्तरावरती  उपभोगले आहेत.


 त्यामुळे किमान आंबेडकरी चळवळी राजकीय असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील किंवा शैक्षणिक असतील या मृतप्राय होता कामा नये. त्या कार्यरत आणि वृद्धिंगत व्हाव्यात म्हणून आपण सामाजिक दान केलंच पाहिजे. कारण जोवर चळवळ आहे तोवर आपण आहोत.


व्हाट्सअप आणि फेसबुक हे खरंतर संभाषणाची उत्तम साधन आहेत परंतु केवळ व्हाट्सअप आणि फेसबुक वर पोस्ट आणि व्हिडिओच्या रतीबच्या-रतीब टाकून आंबेडकरी चळवळीला आपण सहकार्य अथवा  नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहोत अशा अविर्भावात मुळीच राहू नये.  या भ्रमात असणाऱ्यांनी, स्टेजवरून लांबलचक भाषण झोडपणाऱ्यांनी आणि स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांनी.  जमिनी स्तरावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ता व संस्थांना  सहकार्य व सक्रिय सहभाग नोंदवून आपला पाठींबा व योगदान दिले पाहिजे. हाच खरा मार्ग होय.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Sunday, 12 February 2023

इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 माझे मुस्लिम समाजाचे अनेक मित्र प्रत्येक शुक्रवारी नचुकता नमाजीला जातात.  अनेक ख्रिश्चन बांधव रविवारी चर्चमध्ये जातात. अनेक हिंदू मित्र त्यांचे- त्यांचे सणवार, उपास-तापास जपत असतात. तर मग आपण बौद्ध बांधव इतके उदासीन का आहोत. आपण किमान महिन्यातून एकदा तरी विहारात जातो का? आपल्याला लेणी संरक्षण व संवर्धनाबद्दल आस्था आहे का? किमान डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्था जोपासल्या, जगवल्या व वाढवल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला सहानभूती तरी आहे का? 


की आपण झोपेत आहोत? झोपेचे सोंग घेऊन आहोत? की आपली चळवळ फक्त व्हॉट्सअप व फेसबुक पुरताच आहे? रचनात्मक काही निर्माण करायचे आहे की नाही? ज्या समाजाच्या नावावर शाळेत, नोकरीत प्रतिनिधीत्वाच्या नावावर आरक्षण भोगले त्या समाजाचे देणे तरी आपण लागतो की नाही?


की कुणीतरी भीमा कोरेगावला हल्ला करेल तेव्हा आपण जागे होणार? किती दिवस RSS च्या संघटनेचे गुणगान गाणार? कधी सेना, कधी राष्ट्वादी तर कधी भाजप, काँग्रेसच्या वळचणीला जाणार? 


आपला कृती कार्यक्रम आहे की नाही? 


संभाजी भिडे हजारो पोरांना मूर्ख बनवून शकतो. RSS सारखे उपद्रवी संघटन जोमात चालते. तर बाबासाहेबांच्या विचारांचे संघटन का चालत नाही??


ज्या बाबासाहेबांना बाप मानतो.  स्वतःला त्यांचे मानस संतान समजतो. त्यांचे वैचारिक वारसदार म्हणून मिरवतो. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार आहोत की नाही? की फक्त नावापुरते अपघाताने जन्माने आंबेडकरी आहोत आपण.?


आज जी आपल्याकडे गाडी, माडी आणि साडी आहे ती बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेल्या संधीमुळे आहे. अन्यथा आपल्या पूर्वजांहून आपण खूप हुशार किंवा स्मार्ट अथवा शिक्षित आहोत आसा समज असेल तर त्यातून बाहेर पडा. आपल्या पूर्वजांना संधी नव्हती तर आपल्याला ती संधी मिळाली आहे इतकाच तो फरक आहे. ती संधी बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्गाने निर्माण करून दिली आहे.


मिळालेली संधी आणि संसाधने साबूत ठेवण्यात चळवळीचा मोठा वाटा आहे. अगदी आरक्षण असेल, स्कॉलरशिप असेल, सरकारी नोकरीचा बॅकलॉग असेल सामाजिक प्रतिष्ठा असेल हे सगळे मिळवण्यात व टिकवण्यासाठी चळवळ झटत असते. त्यामुळे त्याचे आपसूक आपण लाभार्थी असतो.


तुम्ही २४*७ धम्माचे अथवा चळवळीचे काम करा असे कुणी सांगत नाही. परंतु एक सामाजिक जाणीव व जबादारीतून तुम्ही तुमचा शक्य तो सहयोग व सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्येकाला घरा-घरातुन खेचून जबरदस्तीने चळवळ चालत नसते तो सहभाग जाबदारीतून आला पाहिजे. इतकंच.

Friday, 20 January 2023

तथागत भगवान गौतम बुद्ध हे राजपुत्र होते. संपूर्ण जीवन ते ऐशोआराम सहज व्यतीत करू शकले असते. 


चक्रवर्ती सम्राट अशोक हे काश्मीर पासून ते अफगाणिस्तान पर्यंत असणाऱ्या प्रचंड भव्य अशा राज्याचे राजा होते. ते देखील बुद्धीच्या विचारांना शरण आले. जनकल्याण करणारा

 अद्वितीय जनकल्याण करणारे राजा बनले.


राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे मुंबई महामार्ग बांधकाम केले. मुंबई सी एस टी स्टेशन बांधकाम केले. मुंबई मनपा इमारत बांधकाम केले. खडकवासला धरण, कालवे, कात्रजचा बोगदे, येरवडा पुल, राजवाडे, रस्ते, कापड गिरण्या, घरे इ. बांधकाम केले. १८ व्या शतकात जमशेदजी टाटा यांची संपत्ती २० हजार रुपये होती, तेव्हा महात्मा फुले यांची संपत्ती त्याहून कितीतरी अधिक होती. 


शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानिकाचे राजे होते. सामाजिक न्यायाची वादातीत भूमिका त्यांनी बजावली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक संपत्ती मुंबई (दादर), खार, तळेगाव दाभाडे, कोकण, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, बंगलोर आणि दिल्ली येथे होती. अनेक ठिकाणी आजही आहे.  


आपण ज्या समाज सुधारकांच्या विचारांचा वसा चालवू इच्छीतो 

ते कुणी लुंगे-सुंगे नव्हते. त्यांनी ठरवले असते तर ते वैयक्तिक जीवन ऐशो-आरामात सहज व्यतीत करू शकले असते. परंतु त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन खर्च केले.


 या सगळ्यातुन मला एवढंच सांगायचं आहे की,

आपले आदर्श हे तू लढ मी उपदेश करतो किंवा तू लढ मी पाठीशी आहे असे म्हणणारे अथवा इंग्रजांची माफी मागणारे, पंचगव्य प्राशन करणारे नव्हते. आपल्या चळवळीला समृद्ध, संपन्न आणि आदर्श असा वारसा आहे. त्यामुळे आपण इतर कुठल्याही मार्गाला अथवा प्रलोभनात्म प्रबोधनाला बळी पडू नये.

Saturday, 24 October 2020

परिवर्तन


पाथर पूजे हरि मिले , तो मैं पूजू पहाड़ . घर की चाकी कोई ना पूजे, जाको पीस खाए संसार... - कबीर

धर्म ही एक व्यक्तिगत अथवा वैयक्तिक बाब आहे; असे आपण कितीही जरी कितीही म्हटलं किंवा मानलं तरी ते आज मितीला साफ खोटं आहे. कारण, धर्म हा आर्थिक-सामाजिक-राजकीय व तत्सम बहुअंगी-बहुढंगी   

 गोष्टी व घडामोडींवर बहुआयामी परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. मुळात धर्म हा समाजाचेही सामाजिक जीवन जगण्याचे लिखित अथवा अलिखित नियमन आहे. म्हणून...

आपण नामस्मरण करतो, माळ जपतो, पूजा करतो, नमाज पडतो, मंदिर, मस्जिद, चर्च,विहार, गुरुद्वारा, किंवा इतर धार्मिक स्थळांना भेटी देतो, धार्मिक क्रिया करतो, सकाळी फोटो-मूर्तीला हार घालतो, नवस-सोहळे पाळतो,तीर्थाटन , उपवास करतो.. यातून आपण धर्माचे पालन करत असतो असे आपणाला वाटत असेल तर आपण चुकीच्या वाटेवर आहोत.

खरा धर्म हा सत्य, समाधी, समता, बंधुता,प्रज्ञा, करुणा आणि शिलाचे पालन यात आहे. काम,क्रोध, मोह, माया, मत्सर हा दुर्गुणांचा त्याग करण्यात आहे. जे मला किंवा तुम्हाला ही अवघड वाटते.

त्यामुळे माणसे बाह्य अवडंबर, कर्मकांड, गाजावाजा, अंगप्रदर्शन यावर भर देऊन स्वतः ला धार्मिक,आस्तिक व श्रेष्ठ सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतात. अनेक बुवा-बाबा अम्मा-टम्म, राजकीय पुढारी, धर्माचे ठेकेदार धर्माचा,धरणांचा व आपल्या भावनीक श्रद्धेचा गैरवापर करून आपलेच आर्थिक, सामाजिक, शारीरिक व राजकीय शोषण करत असतात.

धर्म ही धारण करण्याची गोष्ट आहे. तो रंग, वर्ण-वर्ग या बाह्यांगाशी संबंधित नाही. धर्म हा अंतर्मन, काया-वाचा, आचार-विचार व आत्मशुद्धीचा सम्यक समबुद्ध, प्रबुद्ध होण्याचा मार्ग आहे.

Friday, 26 June 2020

आपण कसे घडतो?




तुमच्यावर वाईट संगत असर करते का? मग चांगली संगत असर का नसेल करत? की चांगली माणसे कधी तुम्ही पाहिली, ऐकली अथवा अनुभवलेलीच नाहीत असं तर नाही ना? मुळात चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक न कळण्या इतके आपण दुधखुळे असतो काय?

वाईट गोष्टी...मग ते कुठलंही हानिकारक व्यसन, खोटं बोलणं, पैसे उडवण्याचा मोह, उदानटप्पू करण्याचा नाद असेल.

ही सर्व व्यसन अनेकांना क्षणिक पण झटपट आनंदाची खात्री देणारी व चटक ही लावणारी मोहक असतात. आजकाल या सर्व व्यसनांना उचभ्रूपणाचे लेबल व जणू समाजमान्यता असल्यामुळे ते मिरवता देखील येतात.

याउलट तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी सुख मिळवण्यासाठी प्रथम कष्ट उपसावे लागतात. आणि कष्ट अनेकांना नको असतात. अथवा शॉर्टकट्स हवे असतात, त्यामुळे आपण अनेकदा चकाकणार्या काचेच्याच तुकड्याला हिरा समजून कवटाळत बसतो.

चांगल्या आणि वाईट संगती मधून  आपण स्वतः निवड करत असतो. आपल्या आजूबाजूला दोन्हीही प्रकारचे पर्याय उपलब्ध असतांना सरतेशेवटी आपण त्यात काय पाहतो व काय निवडू ईच्छीतो तेच आपल्याला मिळते.

Thursday, 25 October 2018

सावध ऐका पुढल्या हाका..




इथला सो कॉल्ड मीडिया अथवा पुरोगामी दलितांचे मूळ प्रश्न कधीच मांडणार नाही. इथले विचारवंत आणि बुद्धिजीवी फक्त चकाचौन्द आणि  विचारांची झालर पांघरून तुम्हाला मोह जाळयात घेऊन स्वतः मोठे होतील. दोनचार दलितांच्या स्वार्थी नेत्या अन चाटु चमच्यांच भलं करतील. आणि पुरोगामी, समाजसेवक, समाजसुधारक असल्याचा गावभर आव आणतील स्वतः ची प्रतिमा प्रतिस्थापना करून मग NGO टाकून करोडो कमवतील. आशा मुखवटे धारी लोकांपासून दलितांनी सावध राहिले पाहिजे. अशा मुखवट्यांना आपण समर्थन देऊन मोठेतर करत नाहीत ना हे तपासलं पाहिजे.

पितळ, #तांबे, अन #सोन ओळखता यायला हवं व योग्य #दिशा स्वीकारायला हव्यात.  नाहीतर हरीहरी (कन्हैया) करत ##नरकेत जावं लागेल. #आठवलं म्हणून सांगतोय.

सो कॉल्ड सवर्ण हा हजारो वर्षापासून सत्ता संपत्ती ज्ञान याचा   पूर्ण लाभ, उपभोग घेतोय. त्याला मिळालेल्या अमर्याद संधीतून त्याने सगळीकडे सत्ता काबीज केली आहे. आज तो develop दिसतोय त्याचं कारण तो पिढ्यानपिढ्या याचा वापर करून संपन्न, तरबेज झालाय. आजही जल, जमीन, जंगल ही याच उच्चभ्रुनची मालकी आहे. दलितांकडे आरक्षण आणि संविधान या पलीकडे काहीही survival साठी आधार नाही. ते ही स्वातंत्र्यापासून आजतागायत अधिक धोक्यात येत आहे. ज्यांची पहिली अथवा दुसरी पिढी आता शिकतेय त्यांची स्पर्धा सर्व संपन्न सवर्ण समाजाशी होऊ शकत नाही. जिथे धर्मांधता, जातबंधु लॉबिंग, खोटे मेरिटधारी विद्वेषी असतील. Step by step evolution and revolution, delvelop नावाचा प्रकार असतो की नाही?

हा सवर्ण दोन्ही तिन्ही चारी बाजूच नेतृत्व आपल्याच हातात ठेवतो. ते समाजवादी, संघवादी, मार्क्सवादी, धर्मवादी, पुरोगामी , कला क्रीडा, ज्ञान राजकारण सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र आपले नेतृवत उभे करत असतात. आंबेडकरवाद्यांमध्ये देखील हे घुसलेत... आंबेडकरवाद्यांनी दाई आणि माई यातला फरक वेळीच ओळखला पाहिजे.

आंबेडकरवाद्यांनी धार्मिक, वैचारिक, राजकीय प्रतिक्रांती पासून अर्थात सवरणांच्या मुखवट्या पासून आणि आपल्यातील चाटुगिरांपासून सावधान राहिले पाहिजे.

आंबेडकारवादी विचारधारेला धोका या पांचट, गुळचट, बोटचेप्या, घरभेदया,आळशी, घरकोख्या, सोंगाड्या, दिखावू धम्म आचरण, आंबेडकरवादी मुखवट्यापासून देखील आहे.