Monday, 6 July 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायाचेही प्रणेते

 

अनेकांना वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ सामाजिक न्याय, अस्पृश्यता निर्मूलन आणि आरक्षणापुरते मर्यादित होते. परंतु हे पूर्ण सत्य नाही. बाबासाहेबांचे ध्येय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या तिन्हींची स्थापना करणे हे होते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय" या मूल्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी संविधानिक हक्क, मूलभूत अधिकार, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाची व्यवस्था केली. परंतु आर्थिक न्यायासाठीही त्यांनी एक स्पष्ट आणि दूरदृष्टीचा आराखडा मांडला होता.

१९४७ मध्ये त्यांनी States and Minorities या दस्तऐवजात *राज्य समाजवाद (State Socialism)* ही संकल्पना मांडली. त्यांचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीची स्थापना करणे नव्हता, तर लोकशाही मार्गाने आर्थिक विषमता कमी करणे हा होता.

बाबासाहेबांच्या मते भारतातील आर्थिक विषमतेचे एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीचे असमान वाटप. काही मोजक्या जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर जमीन होती, तर लाखो शेतकरी आणि शेतमजूर भूमिहीन किंवा अल्पभूधारक होते. त्यामुळे त्यांनी पुढील उपाय सुचवले:

* सर्व शेतीजमीन राज्याच्या मालकीची असावी.

* खाजगी जमिनदारी व्यवस्था संपुष्टात यावी.

* राज्याने जमीन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने (Lease) द्यावी.

* सामूहिक किंवा सहकारी पद्धतीने शेतीला प्रोत्साहन द्यावे.

* सिंचन, बियाणे, खत, यंत्रसामग्री, कर्ज इत्यादी सुविधा राज्याने उपलब्ध करून द्याव्यात.

* शेतीतील उत्पन्नाचे वाटप न्याय्य नियमांनुसार व्हावे.

याचा अर्थ सरकार स्वतः शेती करणार, असा नव्हता. जमिनीची मालकी राज्याकडे, पण शेती प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी करावी, ही त्यांची संकल्पना होती.

बाबासाहेबांचा दृष्टिकोन पारंपरिक साम्यवादापेक्षा वेगळा होता. ते हिंसक क्रांती, एकपक्षीय हुकूमशाही किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दडपशाहीचे समर्थक नव्हते. त्यांनी संसदीय लोकशाही, घटनात्मक शासन, मूलभूत अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना सर्वोच्च स्थान दिले.

म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना *लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism)* असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

भूमिहीनांच्या प्रश्नावर भारतात तीन मार्ग समोर आले होते.

१. तामिळनाडू आणि कम्युनिस्ट चळवळी:

तामिळनाडूत तसेच इतर काही राज्यांत (विशेषतः तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल) कम्युनिस्ट शेतकरी चळवळी झाल्या. काही ठिकाणी त्या हिंसकही झाल्या. कारण त्यांचा विचार असा होता की जमीनदार स्वेच्छेने जमीन देणार नाहीत; म्हणून वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे.

हा दृष्टिकोन मार्क्सवादी होता.


२. विनोबा भावे यांचे भूदान

भूदान चळवळीचा आधार नैतिक परिवर्तन होता.

विनोबा भावे यांचा विश्वास होता की जमीनदारांनी स्वेच्छेने काही जमीन भूमिहीनांना द्यावी. यात संघर्षापेक्षा सद्भावना आणि नैतिक आवाहन यावर भर होता. या चळवळीमुळे लाखो एकर जमीन दान म्हणून जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात सर्व जमीन कायदेशीररीत्या भूमिहीनांना मिळालीच असे नाही. अनेक जमिनी वादग्रस्त, नापीक किंवा हस्तांतरणास अयोग्य होत्या.


३. दादासाहेब गायकवाडांचा भूमिहीनांचा सत्याग्रह

हा बाबासाहेबांच्या विचारांशी जोडलेला होता.

दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांसाठी मोठा सत्याग्रह उभारला. घोषवाक्य होते:

"कसेल त्याची जमीन; नसेल त्याचे काय?"

हा हिंसक नव्हता.त्यात संविधानिक मार्ग,सत्याग्रह,अटक,मोर्चे,लोकशाही आंदोलन यांचा अवलंब करण्यात आला.

या चळवळीमुळे महाराष्ट्रात भूमिहीनांना सरकारी पडीत जमीन वाटपाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला.


बाबासाहेबांचा मार्ग नेमका कोणता?

मला वाटते, येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा.

बाबासाहेब:

भूदानासारख्या केवळ स्वेच्छेच्या मार्गावर अवलंबून नव्हते.

कम्युनिस्टांप्रमाणे हिंसक क्रांतीचे समर्थकही नव्हते.


त्यांनी तिसरा मार्ग सुचवला:

राज्याने कायद्याने जमीनव्यवस्था बदलावी.

जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे.

भूमिहीनांना लागवडीचा हक्क द्यावा.

हे सर्व संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत करावे.


म्हणूनच त्यांच्या आर्थिक विचारांना लोकशाही राज्य समाजवाद (Democratic State Socialism) असे संबोधले जाते.


 क्रमशः

Friday, 29 May 2026

बाबासाहेब


 

Cultivation Of Mind Should Be The 

Ultimate Aim Of The Human Existence.


-Dr. B.R. Ambedkar 

🌸🌸🌸


बाबासाहेब सांगतात की, धर्माच्या अधिष्ठानावर उभी असलेली जातव्यवस्था ही अशी रचना आहे की ती शोषितांविषयी सहानुभूती निर्माण करत नाही; उलट अस्पृश्यांविरुद्ध ‘धार्मिक रोष’ निर्माण करते. परिणामी, माणसाची न्यायबुद्धी बोथट होते आणि तो धार्मिक शिकवणीच्या प्रभावाखाली अन्यायातही सहभागी होतो. इतकंच नव्हे, तर त्या अन्यायालाच न्याय्य समजू लागतो. 


म्हणूनच, सामाजिक परिवर्तनाचा प्रश्न केवळ शोषितांच्या सक्षमीकरणापुरता मर्यादित राहत नाही. उलट, ज्या समाजघटकांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यातच जाणीव (consciousness) निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण अन्याय ‘न्याय्य’ आहे अशी धारणा सतत पेरली जाते आणि तीच व्यवस्था टिकवून ठेवते. त्यामुळे या चुकीच्या समजुतींना आव्हान देणारे, त्यांचे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि नैतिकतेच्या नव्या चौकटी उभ्या करणारे प्रयत्न अत्यावश्यक ठरतात.


व्यक्तीच्या विचारात बदल करणे महत्त्वाचे असते. न्यायव्यवस्था, वकिली आणि धोरणनिर्मिती हाताळणारे हेच, लोक समाजातील नैतिक दिशा ठरवणार आहेत.परंतु अशा जाणीवा शैक्षणिक संस्था क्वचितच निर्माण करतात

जयंती - 02

 



पोस्ट क्रमांक ०२

🟦🟨🟥⬜️🟧

📖 पुस्तक आणि बाबासाहेब 


बाबासाहेबांना ५०,००० हून अधिक पुस्तके होती. मुंबईतील राजगृह हे बाबासाहेबानी खास ग्रंथालयासाठी बनविले होते. त्यात इंग्रजी,मराठी,उर्दू,संस्कृत,पारसी,फ्रेंच,जर्मन अशा अनेक भाषांतील ग्रंथांचा समावेश होता. साधारणपणे सोशल सायन्स चे पंधरा भाग,हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड चे पंचवीस भाग होते,तसेच इतिहासावर २६००,कायद्यावर आधारित ५०००,राजकारणा संबंधित ३०००,धर्मशास्त्रावर २००० तर १२०० चरित्रे ग्रंथ होती. अर्थशास्त्राची १०००,तत्त्वज्ञानावर ६०००,युद्धशास्त्रावर ३०००,इतर साहित्य ३००० आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर ७९०० ग्रंथ होते.


राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही जाण्याची मुभा नव्हती,त्यांचा पाळीव कुत्रा पीटर हा राजगृहाच्या दाराशी ग्रंथालयाची राखण करीत असे,हे ग्रंथ वर्गीकरण करून लेबलसह रचून ठेवले होते, त्यामुळे इतक्या प्रचंड ग्रंथालयात त्यांना कोणतेही पुस्तक हवे असल्यास ते अचूक मिळत होते,इंग्लंड मधील ठक्कर कंपनीतुन त्यासाठी बाबासाहेबानी ग्रंथालय कार्ड बनवून घेतले होते,व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी देऊन पुस्तकांची यादी पूर्ण करून घेतली होती.


बाबासाहेबांनी अभ्यास केलेले तत्वज्ञ :

बाबासाहेबांनी हिंदु धर्म ग्रंथ व पुराणे, बौद्ध साहित्य, ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता.

त्यांनी हेगल, मार्क्स,एंगेल्स,लेनिन,मुसोलिनी,

वोल्टअर,प्लेटो, सोक्रेटीस,महात्मा फुले,कार्लाईल, जॉन ड्युई, प्रो. सेलिंगमन, बरंट्रँड रसेल, फ़्रेंड्रिंक नितशे, लासकी, मॅक्स म्युलर, एडमंड बर्के, वूल्फ गँग गॉथे, सिगमांड फ्राईड , जॉन स्टुअर्ट मिल,जेरेमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस पेन, अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो इत्यादी विचारवंतांचे लेखन व विचार अभ्यासले होते.


त्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना अभ्यासांती गुरु मानले.


📚 बाबासाहेबांची ग्रंथसंपदा

॰ कास्ट्स इन इंडिया: त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास (1917)

॰ स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज (1918)

॰ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: त्याची उत्पत्ती आणि उपाय (1923)

॰ दि इव्हॉल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (1925)

॰ वेटिंग फॉर अ व्हिसा (1935–36)

॰ अनायलेशन ऑफ कास्ट (1936)

॰ मिस्टर गांधी अँड द एमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (1943)

॰ रानडे, गांधी अँड जिन्ना (1943)

॰ थॉट्स ऑन पाकिस्तान (1941 / 1945)

॰ व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (1945)

॰ महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट

॰ हू वेअर द शूद्राज? (1946)

॰ स्टेट्स अँड मायनॉरिटीज (1947)

॰ द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (1948)

॰ थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (1955)

॰ बुद्ध ऑर कार्ल मार्क्स

॰ कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट (1945)

॰ बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन (1950)

॰ द फ्युचर ऑफ पार्लियामेंटरी डेमॉक्रसी

॰ लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस

॰ बुद्धिझम अँड कम्युनिझम (1956)

॰ द बुद्धा अँड हिज धम्मा (1957)

॰ द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन


बाबासाहेबांच्या जिवन व तत्वद्यानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

अनेकांनी आपापल्या वैचारिक बैठकीनुसार आंबेडकरांवर लेखन केले आहे. व्यक्तीगत समज आणि वैचारिक दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या लोकांनी लिहलेली वेगवेगळी चरित्र, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वसंत मून ( इंग्रजी, मराठी), सहारे, कुबेर, चांगदेव खैरमोडे, शंकरराव खरात, झेलीयट बाई, ख्रिस्तोफर जेपरलॉट, डी. आर. जाटव, कंवल भारती, उमेश बगाडे, रावसाहेब कसबे, बी. सी. कांबळे, डी. आर कांबळे, आनंद तेलतुंबडे, गेल ऑम्वेट, धनंजय कीर, दत्तोपंत ठेंगडी, रमेश पंतगे, विमलसुर्य चिमनकर, य. दी. फडके, भा. ल. भोळे, शेषराव मोरे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, आर. संगीता राव,  सुधाकर गायकवाड, सुरेश माने अशा सगळ्यांची ( अजूनही अनेक जन आहेत)  पुस्तके आहेत आणि सोबतच, बाबासाहेबांचे मूळ साहित्य प्रामुख्याने वाचावेत.


लक्षात घ्या. बाबासाहेब केवळ तत्वज्ञानी नव्हते. त्यांनी कृतियुक्त संघर्षपूर्ण जीवन व्यतीत केल. अर्थशास्त्र, संविधान तज्ञ, लेखक, पत्रकार, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मशास्र इत्यादीमध्ये ते पारंगत होते.

चळवळ - 02

चळवळ वाढायची असेल, तर संघटक घडवावे लागतात. पण आज संघटक उरलेत कुठे? आज प्रत्येकाला influencer प्रभावशाली व्हायचं आहे. ही केवळ पिढी बदलल्याची गोष्ट नाही; ही सामाजिक-राजकीय संस्कृती बदलल्याची खूण आहे.


संघटक होणं म्हणजे स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता समाजाला केंद्रस्थानी ठेवणं. संघटक प्रकाशझोतात नसतो; तो पडद्यामागे असतो. तो भाषणांपेक्षा संवाद करतो. तो भक्त गोळा करत नाही; तो कार्यकर्ते घडवतो. त्याचं काम संथ, कठीण आणि अनेकदा नाव प्रसिद्धीस न येणार असतं. म्हणूनच संघटक होण्यासाठी संयम, सातत्य, वैचारिक स्पष्टता आणि लोकांविषयी खोल आस्था लागते.


इटालियन मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्रामशीने सांगितलं होतं की ,सत्ता केवळ पोलिस, कायदे किंवा दडपशाहीने टिकत नाही; ती लोकांच्या मनांवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करून टिकते. लोकांना एखादी व्यवस्था “नैसर्गिक” वाटू लागते, तेव्हा त्या व्यवस्थेचं खऱ्या अर्थाने वर्चस्व निर्माण होतं. ग्रामशी याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो. हे वर्चस्व मोडायचं असेल, तर समाजात पर्यायी विचार, पर्यायी संस्कृती आणि पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी करावी लागते. आणि ते काम influencer (प्रभावी वक्ते) करत नाहीत; संघटक करतात.


माणसं घडवणं ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एखाद्या गावात, वस्तीत किंवा कामगार भागात जाऊन लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. त्यांच्या दुःखात उभं राहावं लागतं. त्यांच्या भाषा, भीती, आशा समजून घ्याव्या लागतात. एकेक व्यक्ती जोडावी लागते. त्यातून लहान गट तयार होतात, गटातून संघटना तयार होते आणि संघटनांतून चळवळ जन्म घेते. ही प्रक्रिया एका प्रसिद्ध video पोस्टने किंवा एका भाषणाने होत नाही. यासाठी वर्षानुवर्षे काम करावं लागतं.


ग्रामशीने पारंपरिक बुद्धिजीवी आणि लोकमान्य बुद्धिजीवी असा एक महत्त्वाचा भेद केला होता. पारंपरिक बुद्धिजीवी म्हणजे विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, चर्चांमध्ये रमणारे; पण अनेकदा जनतेपासून दूर गेलेले बुद्धिजीवी. तर लोकमान्य बुद्धिजीवी हे लोकांमधून उभे राहतात. ते फक्त विचार मांडत नाहीत; ते लोकांना संघटित करतात, संघर्षाला दिशा देतात आणि सामाजिक शक्ती निर्माण करतात. ते समाजाविषयी केवळ बोलत नाहीत; ते समाजासोबत उभे राहतात.


आज आपल्या चळवळींसमोरची मोठी समस्या हीच आहे की संघटक कमी होत आहेत आणि दिखाऊ बुद्धिजीवी वाढत आहेत. समाजात जाऊन कार्यकर्ते घडवण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे. प्रदर्शनतेला बांधिलकी / निष्ठा पेक्षा जास्त किंमत मिळू लागली आहे.


एकेकाळी भारतातील डाव्या, समाजवादी, आंबेडकरी आणि इतर पुरोगामी चळवळींमध्ये संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी ही केंद्रस्थानी कल्पना होती. पन्नास, साठ, सत्तरच्या दशकातील कार्यकर्ते तळागाळात राहत, लोकांमध्ये मिसळत, अभ्यासवर्ग घेत, पत्रकं वाटत, संघटनात्मक बैठका घेत. त्यांना माहिती होतं की परिवर्तन हे फक्त विचारांनी होत नाही; ते संघटित लोकशक्तीने होतं.


याच संघटनात्मक कार्य / संघटन उभारणी च्या तत्त्वाला संघ परिवाराने अत्यंत गंभीरपणे समजून घेतलं. शाखा, नियमित बैठक, वैचारिक प्रशिक्षण, स्थानिक संपर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा, सेवा उपक्रम या सगळ्यांतून त्यांनी सातत्याने माणसं जोडली. त्यांनी समाजात खोलवर शिरकाव केला. त्यांची विचारधारा विषमता वाढवणारी आणि द्वेष पसरवणारी असू शकते; पण संघटन उभारणीचं महत्त्व त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी भाषणबाजांपेक्षा पेक्षा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केले.


दुसरीकडे, अनेक पुरोगामी प्रवाहांनी हळूहळू संघटनेची परंपरा गमावली. वैचारिक पातळीवर ते मजबूत असले, तरी जनतेशी त्यांचा जिवंत संपर्क कमी होत गेला. विद्यापीठं, परिसंवाद, लेखन, सोशल मीडिया हे महत्त्वाचे असले तरी ते जनसंघटनांची जागा घेऊ शकत नाहीत. विचार जर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले नाहीत, तर ते केवळ बौद्धिक, अकादमीक चर्चांपुरते मर्यादित राहतात.


१९८० नंतर स्वयंसेवी संस्था संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. समाजकारणाचं प्रकल्पकेंद्रीकरण झालं. निधी, अहवाल, कार्यशाळा, देणगीदार याभोवती अनेक उपक्रम फिरू लागले. काही चांगलं काम नक्कीच झालं; पण संघर्षाची जागा उत्तम व्यवस्थापनाने घेतली. कार्यकर्त्याचं रूपांतर व्यावसायिक कार्यकर्ता मध्ये होऊ लागलं. त्यानंतर नवउदारवादी अर्थव्यवस्थेने व्यक्तिवादाला आणखी आक्रमक बनवलं. “स्वतःचा विकास”, “वैयक्तिक प्रगती ”, “वैयक्तिक यश” या मूल्यांनी सामूहिक राजकारण कमकुवत केलं.


सोशल मीडिया आल्यानंतर दिखाऊपणा म्हणजेच कार्य, अशी समजूत निर्माण झाली. likes, shares, followers, reels, viral clips याभोवती राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती फिरू लागली. त्यामुळे आंदोलनवादी भाषणबाजांचा एक नवा वर्ग तयार झाला. हा वर्ग सतत दिसतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो; पण जमिनीवर संघटनात्मक कामात त्याचा सहभाग मर्यादित असतो.


यातली मोठी समस्या म्हणजे चळवळ ही “विक्रीयोग्य आशय” बनते. दुःख, अन्याय, संघर्ष हे लोकांच्या जगण्याचे प्रश्न न राहता लोकांचं लक्ष वेधून घेणारा प्रतिसाद मिळवण्याची, टाळीखाऊ साधनं बनतात. वर्तमाना व भविष्याविषयी सांगायला काही नसले की इतिहासाचे अलंकारिक उदात्तीकरण होते. भाषणं, पोस्ट्स, घोषणा यांना महत्त्व राहतं; पण माणसांशी नातं बांधणं मागे पडतं. अशा परिस्थितीत चळवळीचा गाभा कमकुवत होतो.


भाषणबाज वक्ता लोकांवर प्रभाव टाकतो; संघटक लोकांना सक्षम करतो.

भाषणबाज स्वतःभोवती केंद्र निर्माण करतो; संघटक सामूहिक नेतृत्व घडवतो.

भाषणबाज ला दुखाऊपणा लागते; संघटकाला विश्वास लागतो.

भाषणबाजचा प्रभाव अनेकदा क्षणिक असतो; संघटक व संघटनेची ची उभारणी दीर्घकालीन असते.


चळवळींचा इतिहास पाहिला, तर कोणतीही मोठी सामाजिक क्रांती भाषणबाजमुळे घडलेली नाही. त्या संघटित लोकांच्या शक्तीने घडल्या आहेत. कामगार चळवळी, शेतकरी आंदोलनं, स्त्रीवादी लढे, दलित आंदोलनं, स्वातंत्र्य चळवळ या सगळ्यांच्या केंद्रस्थानी संघटक होते. अशी माणसं जी स्वतःपेक्षा ध्येयाला मोठं मानत होती.


आज सर्वात मोठी गरज आहे ती संघटन निर्माण करण्याची. लोकांमध्ये राहणारे, अभ्यास करणारे, ऐकणारे, संयमाने काम करणारे संघटक . जे समाजाला फक्त प्रतिक्रियावादी करायला नाही, तर संघटीत व्हायला शिकवतील. कारण ग्रामशीच्या भाषेत सांगायचं तर, प्रतिवर्चस्ववादी संस्कृती उभी करायची असेल तर तळागाळातील संघटक आणि जनआधारित, लोकमान्य, लोकाभिमुख बुद्धिजीवी निर्माण करावे लागतील.


कारण शेवटी चळवळ भाषणांने ने नाही, संस्थात्मक बांधणी ने उभी राहते.

ती hashtags ने नाही, तर मानवी नात्यांनी टिकते.

ती प्रसिद्धीने नाही, तर संघटित जनतेच्या विश्वासाने वाढते.


आणि म्हणूनच :

चळवळ भाषणबाज नाही, संस्थात्मक बांधणीने संघटक उभे करतात.

Saturday, 4 April 2026

जयंती - 2026




पोस्ट क्रमांक ०१

🟦🟨🟥⬜️🟧


🔹 १. बालपण आणि शिक्षण (१८९१–१९१६)

१८९१ (१४ एप्रिल) जन्म – महू (मध्यप्रदेश)

१९०७ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण (दलित समाजातील पहिले)

१९१२ पदवी (कला शाखा) पूर्ण

१९१३ वडिलांचे निधन, बडोदा शिष्यवृत्ती मिळून अमेरिकेला प्रस्थान

१९१५–१९१६ कोलंबिया विद्यापीठ येथे पदव्युत्तर शिक्षण. “भारतातील जातीव्यवस्था” या विषयावर संशोधन.


🔹 २. परदेश शिक्षण व करिअरची सुरुवात (१९१७–१९२४)

१९१७ इंग्लंडला शिक्षणासाठी प्रयाण (नंतर शिष्यवृत्ती बंद → भारतात परत)

१९१८ सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक

१९२० (३१ जानेवारी) ‘मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू.

१९२२–१९२३ कायद्याची पदवी व उच्च शिक्षण पूर्ण (लंडन)


🔹 ३. सामाजिक क्रांतीची सुरुवात (१९२४–१९३५)

१९२४ बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना.

१९२७ (२० मार्च) महाड चवदार तळे सत्याग्रह

१९२७ (२५ डिसेंबर) मनुस्मृती दहन 

१९३० कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन (नाशिक)

१९३०–३२ गोलमेज परिषदेत सहभाग

१९३२ (२४ सप्टेंबर) पुणे करार

१९३५ येवले येथे धर्मांतराची घोषणा.


🔹 ४. राजकारण आणि विचारक्रांती (१९३६–१९४६)

१९३६ “जातिभेदाचा नाश” ग्रंथ प्रकाशित.

स्वतंत्र कामगार पक्ष स्थापना

१९३७ निवडणूक विजय

१९४२ व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर कामगार सदस्य.

१९४५–४६ पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना. संविधान सभेत प्रवेश.


🔹 ५. संविधान निर्मिती (१९४७–१९५०)

१९४७ भारताचे पहिले कायदामंत्री, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष

१९४९ (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधान स्वीकारले गेले.

१९५० (२६ जानेवारी) संविधान लागू.


🔹 ६. शेवटची वर्षे (१९५१–१९५६)

१९५२ (५ जून) कोलंबिया विद्यापीठाकडून सन्माननीय कायद्याची पदवी.

१९५२ राज्यसभा सदस्य.

१९५६ (१४ ऑक्टोबर) नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकार.

१९५६ (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण (दिल्ली) 

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.

Tuesday, 7 November 2023

आंबेडकरवादी नेतृत्व हवे.


संघटन, संभाषण व संविधानिक कौशल्य तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आकलन नसणाऱ्या व्यक्तीस कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय  संघटनेत पद, प्रतिष्ठा अथवा नेतृत्व दिल्यास संघटन निकामी, निकृष्ट व सैरभर न झाले तर नवलच.


जो समाज उच्च शिक्षित झाला. नीतिमत्ता हे मूळ तत्वज्ञान ज्या बौद्ध धम्माचे आहे. ते तत्वज्ञान स्वीकारून ६७ वर्ष ज्या समाजाला झाले. शिकावा, चेतवा व संघटीत व्हा असे सांगून ९९ वर्ष ज्या समाजाला झाले. म्हणजेच "शिक्षा" आणि "दीक्षा" दोन्हीही उत्तम ज्या समाजाकडे आहे. अशा समाजाने यापुढे आपले नेते, पुढारी व मार्गदर्शक निवडतांना अतिशय बेजबाबदार, अंध व परंपरागत असून कसे चालेल?


आपले नेते मग ते धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक असतील. ते देश, राज्य अथवा गल्ली बोळातील असतील.. अगदी तुमच्या संघटनेचे, जयंती मंडळाचे किंवा बचतगटाचे असतील... असे नेते,प्रमुख निवडतांना या प्रबुद्ध,वाचक व शिक्षित समाजाने चोखंदळ असायला नको का?


ज्या बौद्ध धम्माचा वारसा,विरासत आणि विचार आपण चालवू इच्छीतो. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व धार्मिक चळवळीचे नैतिक वारसदार म्हणून आपण स्वतःला म्हणवून घेतो. त्या समाजाचे आचरण व  नेतृत्व देखील त्याला 

साजेसे नको का?


केवळ मंत्रोच्चारा प्रमाणे आंबेडरवाद व बौद्ध धम्माचे विचार मांडायचे परंतु आचरण मात्र विपरीत व विरुद्ध करायचे हे असे किती दिवस चालायचे?


लक्षात घ्या बाबासाहेब यशस्वी झाले ते त्यांच्या ठायी असणाऱ्या ज्ञान व शील या गुणामुळे.



पुणे कररातून निपजलेल्या निर्बुद्ध   निकृष्ट नेते तुमच्या स्वाभिमानाची लढाई लढणारे नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुरदृष्टी नसणारे हे नेते चळवळीला संपवतील. म्हणून येणाऱ्या काळात नेतृत्वाला नेते होण्यासाठी आंबेडकरवादी होणे, बौद्ध धम्माचे पाईक होणे ही प्रथम कसोटी असलीच पाहिजे.

Monday, 24 May 2021

बुद्धजयंती



बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूचा होता. जिथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशाली राज्याचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्यांच्या संवादातून उत्तमरित्या दर्शविली गेली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करत असल्याचे समजल्यावर सिंह सेनापति त्यांच्याकडे गेला व त्यांनी असे विचारले:


 'भगवान अहिंसेचा उपदेश करतात. याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका- मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये, असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय? '


 बुद्धाने उत्तर दिले, " मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे.


न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणार न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्यामुळे दोष लागत नाही. न्यायासाठी व सुरक्षेसाठी लढणाऱ्या माणसावर अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय यशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरु करतो त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल, पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये.

Thursday, 25 October 2018

आंबेडकर व गांधी दोन वेगवेगळ्या विचारधारा ? भाग -०२



भाग -०२

श्रमविभागणी वर आधारलेली चातुर्वर्ण्याची पद्धती ही आदर्श समाज व्यवस्था होती असे गांधीजी मानीत असत. आवर्ण किंवा पंचम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्पृश्यांची गणना क्षुद्र या चौथ्या वर्णामध्ये करणे योग्य होईल असे त्यांना वाटत असे. मूळच्या चार वर्णांचे तुकडे पडून चार हजार जाती झाल्या कारण जात धर्म धिष्टित असते, तर वर्ण गुण आणि कर्मावरून ठरतो. चार वर्गांच्या व्यवस्थेमध्ये विषमता नाही, तर समानता आहे. कारण ही चारी वर्ण ही एकाच विश्वव्यापी पुरुषाच्या देहाचे चार अविभाज्य आहेत असाही ऋग्वेदातील पुरुष सुक्तातील ऋचेचा गांधीजी अर्थ लावीत असत. चतुवर्णचे पुरस्कर्ते भगवत्यागीतेतील चौथ्या गुणकर्म विभागनी: हे श्रीकृष्णाचे वचन नेहमी ते उधृत करीत असत. 【संदर्भ संदर्भ एम.के गांधी भगवद्गीता १९८० पृष्ठ क्रमांक १२३, १२४】

गीता म्हणजे अमृत, त्यातील श्लोक म्हणजे प्राणवायु, गीता म्हणजे कल्पवृक्ष तिची श्रद्धापूर्वक पठण व मनन करावे असे गांधीजी सांगत असत.

गांधीजींच्या मते आपल्या काळात खऱ्या अर्थाने वर्ण आढळत नाहीत. वर्ण म्हणजे सहभोजन वरील आणि आंतरजातीय विवाह वरील निर्बंध एवढाच त्यांचा मर्यादित अर्थ उरलेला आहे. वर्ण म्हणजे कार्याची विभागणी. त्यामुळे वर्णव्यवस्था ही केवळ हिंदू धर्म पुरती मर्यादित नसून ती जगात सर्वत्र आढळते आणि कोणत्याही काळात ती टिकते. या अर्थाने वर्ण व्यवस्थेसाठी प्राण देण्यासही माणसाने तयार असावे असे गांधीजींना वाटत असे. मुमुक्षु म्हणजे समाजाचा सेवक. आपली कर्तव्य म्हणजे समाजाने सोपवलेले कार्य ते केल्यास माणसाला मोक्ष मिळू शकतो असे गांधीजींचे मत होते.

ते म्हणत माझ्या मते वर्णाश्रमाच्या प्रश्नाचा धार्मिक दृष्ट्या विचार करताना शंभुकाच्या सारखी उदाहरण देऊ नये. 【संदर्भ एमके गांधी पुस्तक हिंदू धर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ५६】


१९२७ साली महाड सत्याग्रहा संबंधी लेख आपल्या बहिष्कृत भारत वर्तमानपत्रात लिहिताना गीतेचा आधार घेणाऱ्या आणि श्री कृष्णाचा उल्लेख परमात्मा भगवंत अशा शब्दात करणारे डॉक्टर आंबेडकर यांची श्रीकृष्ण विषयी तसेच गीते विषयाची मते कालांतराने पार बदलली. २४ सप्टेंबर १९४८ रोजी मद्रास येथे केलेल्या भाषणात त्यांनी वेद व गीता हे ग्रंथ खोडसाळ व बाष्कळ असल्याचे आपले मत दिले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंचा धर्मग्रंथ त्यांची निंदा-नालस्ती केली म्हणून ठीक ठिकाणी जाहीर सभा घेऊन निषेधाचे ठराव मंजूर करण्यात आले. आंबेडकर वाड्मयाच्या तिसऱ्या खंडात भगवद्गीता विषयी निबंध या मथळ्याखाली डॉक्टर आंबेडकर यांची अप्रकाशित टिपणी छापलेली आहेत. पृष्ठ क्रमांक ३५७ ते ३८०. या टिपणात भगवद्गीता ही बायबल कुराण किंवा धम्मपद याप्रमाणे धर्मग्रंथ नाही तसेच तो तत्वज्ञानावरील प्रबंध ही म्हणता येणार नाही असा डॉक्टर आंबेडकरांनी अभिप्राय दिला आहे. गीतेत श्रीकृष्णाने युद्धाचे आणि त्यातील हत्येचे तात्विक समर्थन केले आहे. आत्मा अमर असतो आणि शरीर हे नष्ट होते असे सांगून युद्ध आणि त्यांच्या हत्या यांच्यामुळे पश्चाताप करण्याची किंवा लाज वाटण्याचे कारण नाही असे कृष्ण सांगतो असे डॉक्टर आंबेडकरांच्या मते गीता प्रतिपादन करते.

खुनाचा आरोप असलेल्या अशिलाच्या वतीने खटल्यात श्रीकृष्ण बचाव पक्षाचे वकील म्हणून समजा आज न्यायालयात उभा राहिला असता आणि त्याने भगवत गीतेत केली आहे तसेच हत्येचे समर्थन केले तर त्याला वेड्याच्या इस्पितळात धाडले जाईल हे निसंशय. डॉक्टर आंबेडकरांचे ही टिपणी ४३ वर्ष अप्रकाशित राहिली तरी १९४४ साली त्यांनी एका सभेत भगवद्गीता यांच्यासंबंधी पुणे येथे जाहीर भाषणात वेदांची निर्मिती ही एक वेड्या व मूर्ख लोकांची कार्य आहे असे उदगार काढले होते, तसेच वर्णाश्रमाच्या स्थर्यासाठीच गीता सांगितली गेली असेही ते म्हणाले होते ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावयास हवी.  【पुस्तक कित्ता पृष्ठ क्रमांक ५४】

श्रीराम आणि शंभू काशी त्याचा शिरच्छेद कसा व का केला ही कथा डॉक्टर आंबेडकरांनी रामाचे कोडे गर्डन्स ऑफ राम उलगडून दाखवताना सांगितला आहे.【खंड ४ पष्ट ३३२】

क्रमशः

Wednesday, 10 October 2018

आंबेडकर व गांधी दोन वेगवेगळ्या विचारधारा ? भाग -०१



भाग -०१

ज्याप्रमाणे कस्तुरबाई गांधी व लक्ष्मी यांच्यामध्ये सापत्नभाव आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी व अस्पृश्यता यांच्यामध्येही थोडासा सापत्नभाव आहे असे म्हणावे लागते. कारण ते जितका खादी प्रसार व हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य यावर भर देतात तितका अस्पृश्यतानिवारण यावर देत नाहीत. तसा जर त्यांनी दिला असता, तर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या बाबतीत सुता वाचून मत नाही असा त्यांनी हट्ट धरला त्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणा वाचून काँग्रेसमध्ये शिरकाव नाही असाही आग्रह त्यांनी धरला असता. असो. जिथे कोणीच जवळ करीत नाही तेथे महात्मा गांधींनी दर्शवलेली सहानुभूती काही कमी नाही. 【संदर्भ मा.फ गांजरे संपादक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंड २ १९७४ पृष्ठ क्रमांक २】

अस्पृश्यता निवारणाचा गांधीजींनी आग्रह धरला तरी तो प्रश्न त्यांना स्वराज्यप्राप्तीचा तसेच हिंदू-मुस्लिम इतक्या इतका निकडीचा वाटत नव्हता, अशी तक्रार एकटे आंबेडकरच करीत होते असे समजण्याचे कारण नाही. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सारखा सवर्ण हिंदू तील करता समाज सुधारक ही गांधीजींना याबद्दल बोललावीत होता, हे लक्षात घ्यावयास हवे. २५ नोव्हेंबर, १९२४ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी गांधीजींना धाडलेल्या पत्रात लिहिले होते. तुमच्या हृदयात प्रथम स्थान खादिला, हिंदू-मुस्लिम ऐक्याला दुसरे आणि अस्पृश्यता निवारणाचा तिसरे स्थान आहे. 【संदर्भ म. प. मंगुडकर आणि इतर संपादक पुस्तक धर्म जीवन व तत्त्वज्ञान महर्षी विठ्ठल रामजी शिंदे १९७९ पृष्ठ क्रमांक ६६३ ते ६६५】

१९०६ सालापासून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीचे संस्थापक विठ्ठल रामजी शिंदे जातिव्यवस्थेमुळे अस्पृश्य समाजावरील होणारे अन्याय तसेच हिंदू समाजातील विषमता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले होते. त्याच वर्षी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती हिंदूंपेक्षा वेगळे असून विधानमंडळातील जागांचे वाटप हिंदू व मुसलमान यांच्या लोकसंख्येतील प्रमाणावरून करताना अस्पृश्यांची गणना हिंदूंमध्ये करू नये असे म्हणण्यास सुरुवात केली. या याचा अर्थ व दूरगामी परिणाम लक्षात घेऊन काही सवर्ण हिंदू नेते अस्पृश्योद्धाराचे भाषा करू लागले.

गांधीजींनी अस्पृश्यता निवारण करण्याचे प्रयत्न केले ते सत्याग्रहाच्या मार्गाने नव्हे तर स्पृश्यांचे केव्हा ना केव्हा तरी हृदय परिवर्तन होईल अशी आशा बाळगून त्यासाठी दीर्घकाळ थांबण्यास गांधीजी तयार होते.

आपण हिंदू आहोत एवढे म्हणणे गांधीजींना पुरेसे वाटत नसे तर आपण सनातनी हिंदू आहोत असा ते दावा करीत असत. आपली वेदांवर, उपनिषदांवर पुराणांवर आणि रामायण व महाभारत यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर श्रद्धा आहे; त्यामुळे अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना आपल्याला मान्य आहेत, असे गांधीजी जाहीर रीत्या म्हणत असत. गोरक्षणावर माझा विश्वास आहे, मूर्तीपूजेवर माझी श्रद्धा नाही असे नाही, असेही गांधीजी म्हणत असत 【संदर्भ म. गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ९】

१९२१ ते १९४७ या काळात महात्मा गांधींच्या वर्ग जातिव्यवस्थेबाबत चे मतांमध्ये हळूहळू बदल होत गेले. आरंभी सहभोजन व आंतरजातीय विवाह करणे हे अस्पृश्यता निवारण्यासाठी आवश्यक नाही असे गांधीजी म्हणत असत. आपल्या आश्रमात दुधा भाई हे अस्पृश्य इतर अश्रमास यांबरोबर बसून भोजन करीत असला तरी आपण असे व बाहेरच्या कुणालाही त्याचे अनुकरण करण्याची शिफारस करणार  नाही. मग आपल्याला कोणी ढोंगी म्हटले तरी चालेल असे असहकार आंदोलनाच्या काळात गांधीजी सांगत असत. 【संदर्भ एमके गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक १०३ ते १०५】
बॅरिस्टर आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेंनंतर मिस्टर गांधी म्हणाले होते की आंबेडकरांनी हिंदू धर्मग्रंधांचा अभ्यास करावा. अस्पृश्यता  आता उरली नाही असे मत गांधींचे त्यावेळी होते. बॅरिस्टर आंबेडकर १९२४ ते १९३५ पर्यंत गांधी व हिंदू धर्म यावर जहरी टीका करत नसत. एव्हाना काळाराम मंदिर प्रवेशावेळी सत्याग्रहाचा गांधींची तसबीर सभा मंडपात होती.

पण हळू-हळू आंबेडकरांच्या लेखनाची व भाषणाची धार वाढत होती. गांधी व वेद, पुराण, गीता, वर्णाश्रम यावर अनेकदा जाहीर कडवी मुद्देसूद टीका आंबेडकरांनी केली आहे. 【What gandhi and congress done with untouchables? Anhilation of caste. Riddles in Hinduism.】

या उलट कालांतराने बॅरिस्टर गांधींना स्वतःमध्ये बदल करावे लागले. सहभोजन व आंतरजातीय विवाहाबाबत ते सकारात्मक झाले.

यात मला आंबेडकरांचा द्रोष्टेपणा, कालसुसंगतपणा, जाणवतो. आजमितीला आंबेडकर आर्थिक, सामाजिक, राजकीय रित्या किती काल सुसंगत आहेत हे सांगावयास नको. आंबेडकर आज सर्वव्यापी आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. या पुढेही कालसुसंगत ते टिकेल.

क्रमशः

Thursday, 19 April 2018

Dr. B. R. Ambedkar

Dr. B. R. Ambedkar


Image may contain: 1 person, eyeglasses and closeup

बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे:

१. भारत देशाची ३९५ कलम, ८
परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना
लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे
पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क,
अधिकार दिले.
तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले.
याबरोबरच "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल"
देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद
केली.

३. राज्यघटने मुळे सामाजिक व
भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला
एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला
मतदानाचा अधिकार दिला.

५. प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील)
प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून
जगातील प्रथमच प्रयोग केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा
पाया रचला. "रिजर्व बँक ऑफ
इंडिया"च्या स्थापनेचा पाया रचला.

७. संविधान लिहून स्त्रीयांना
शिक्षणाचा अधिकार दिला.
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार
दिला.
अन्यथा देशातील महिला आजही "चूल आणि
मुल" सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने
हक्क मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू
कोड बिल संसदेत मांडले.
हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून
मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा
दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी
गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या
भरपगारी रजेची तरतूद केली.
(*जगात अशी तरतूद करणारे भारत हे
पहिले राष्ट्र आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या
चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच
(पुरुषांसारखाच) समान अधिकार मिळवून
दिला.

११. पुरुषांना एकपत्नित्व अधिकार...
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या
संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार
मिळवून दिला.

१२. नियोजन आयोगाची स्थापना केली.

१३. पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.

१४. भारतात प्रथम जलनिती तयार केली
व "नद्या जोडणी प्रकल्प" आखला पण
राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे
त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश
परिस्थिती व काही भागात
पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत
आहेत.

१५. भाकरा नांगल, दामोदर धरण,
सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे
उदगाते...

१६. 'कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे
बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम परिवार
नियोजनाचा नारा दिला.

१८. भारतात बालमजुरीवर रोख लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११
इतिहास,
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान,
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा पहिला आणि शेवटचा व्यक्ती...

२०. मजुरांना १२ तास काम करावे
लागायचे, त्यासाठी ८ तास ड्युटी व
आठवड्यातून एक सुट्टी कायदा केला.

२१. ८ तासापेक्षा जास्त काम केल्यास,
कामाचा मोबदला (ओवरटाईम)
प्रावधान लागू केले.

२२. ‘खोत बिल’ आणून सावकारी आणि
वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला उच्च-नीच जातीवादातून
मुक्त केले...
नाहीतर चांभाराच्या मुलांनी
चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी
बनावे...
असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज
कोणत्याही जातितील मुले डॉक्टर,
इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे
अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला
आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व
अधिकारांपासून हिणवण्यात आले,
अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना समान अधिकार मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत
महत्त्वपूर्ण योगदान.

२६. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात
महत्वपूर्ण योगदान...

२७. “मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे
आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या
अंतापर्यंत लढेन” अशी घोषणा केली...

२८. "मजुरमंत्री" असतांना
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी
‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB)
ची स्थापना केली.

३०. देशात प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन
आयोगाची स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी
नैसर्गिक संसाधन व कोळसा आयोगाची
स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या
विकासासाठी RCC (रिकन्स्ट्रक्शन
कमिटी कौन्सिलची स्थापना केली)

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे
यासाठी विभाजन करावे अशी सूचना
मांडली.
आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि
झारखंड राज्य निर्माण झाले...

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा
आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी
योगदान..

३५. स्त्रीभ्रूण हत्त्या विरोध, व
गर्भपात करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला उपराजधानी ची गरज आहे हे
सांगणारे प्रथम व्यक्ती...

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर
ऊर्जेपासून चालणारे जल विद्युत प्रकल्प
उभे करावेत हे सांगणारे प्रथम व्यक्ती जे
अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी कायदेमंत्री बनण्यापेक्षा मी
कृषिमंत्री होउन शेतकऱ्यांना न्याय
मिळवून देईन व देशात शेतीचा विकास
करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’
असे विधान करणारे सुद्धा बाबासाहेबच...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने
आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू
नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला
आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन लष्कर प्रमुख कधीच एकत्र येवून
देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी
मांडणी केली.

४१. एकमात्र भारतीय ज्यांना
ब्रीटीशांकडून गोलमेज परिषदेला येण्याचे
विशेष निमंत्रण दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय
नेता ज्यांनी स्त्रिया व ओबीसी
प्रवर्गासाठी असलेले बिल पास न
झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा
दिला...*

४३. बाबासाहेब देशातील पहिले
उच्चशिक्षित अर्थशास्त्री आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक,
शिल्पकार व चित्रकार सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण ९ भाषांवर प्रभुत्व होते.
इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती,
पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.

४६. त्यांनी पाली भाषेवर इतके प्रभुत्व
मिळविले कि पाली व्याकरण व
शब्दकोशाची सुद्धा निर्मिती केली...

४७. त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची
विधेयके : ~
महार वतन बिल,
हिंदू कोड बिल,
जनप्रतिनिधी बिल,
खोत बिल,
मंत्र्यांचे वेतन बिल,
रोजगार विनिमय सेवा,
पेंशन बिल,
भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल इ.

४८. मराठी हि राजभाषा व्हावी
यासाठी संसदेत मत मांडले...

४९. पाण्यासाठी आंदोलन करणारे (महाड
सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...

५०. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये
सर्वात जास्त पुस्तके वाचणारे पहिले व
शेवटचे व्यक्ती....

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी.
एस. सी. पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे
भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ
वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे
जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती, ते सुद्धा
भारतीय...

५३. देशात भविष्य निर्वाह निधी (पी.
एफ.) कायदा आणून कामगारांच्या हक्काचे
संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला वैयक्तिक
आयुर्विमा घेण्यासाठी आयुर्विमा
महामंडळाची स्थापना करण्यासाठी
कार्य केले..

५५. देशात इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची
निर्मिती केली व सर्व समाजातील
बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात
आवाज उठविण्यासाठी एक कुशल पत्रकार
म्हणून
मूकनायक,
बहिष्कृत भारत,
प्रबुद्ध भारत

जनता
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. 'बहिष्कृत हितकारणी सभे'ची
स्थापना करून जातींअंताची चळवळ सुरु
केली.

५८. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे
प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात कॉंग्रेस
च्या धोरणाला गोलमेज परिषदेत
विरोध...

६०. बहुजनांसाठी मो.क. गांधी
यांच्याशी वैचारिक संघर्ष करून पुणे करार
केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक
हक्कांसाठी कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष
केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती करता
निर्माण करण्यात आलेल्या पार्लमेंटरी
कमिटीचे सन्माननीय सदस्य...

६३. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धती,
विषमता व अन्याय-अत्याचाराला
कंटाळून १९३५ साली येवला येथे भरलेल्या
परिषदेमध्ये
‘मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी
हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा
केली...

६४. हिंदूंसाठी काळाराम मंदिर
प्रवेशाचा सत्याग्रह केला...

६५. “UNTOUCHABILIT” हा शब्द
बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी
भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले कायदेमंत्री
होण्याचा बहुमान...

६७. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना :
बहिष्कृत हितकारणी सभा,
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन इ.

६८.पीपल्स एज्युकेशन सोसायटीची
स्थापना ...

६९. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि
इकोनॉमिक्स ची स्थापना.

७०. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ ची
स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार-
प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ
इंडिया ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे मिलिंद
महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या
मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत
मान्यता मिळवून दिली...

७४. भारताला राष्ट्रीय चिन्ह “अशोक
चिन्ह” मिळवून दिले जे बुद्ध धम्मचक्र
आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंग, धम्माचे प्रतिक कमळ
फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष
(पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून
दिली....

७६. ‘सत्यमेव जयते’ सम्राट अशोक कालीन
ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून
पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
म्हणून त्याच्या सन्मानाच्या
निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला तिरंगा व त्याच्या
मधोमध अशोकचक्र अशी अनोखी भेट
दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या
(सन्मान) : ~
भारतरत्न (भारत सरकार),
द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड (कोलंबिया
विद्यापीठ),
द युनिवर्स मेकर (ऑक्सफर्ड
विद्यापीठ),
द ग्रेटेस्ट इंडियन (CNN IBN व
History वृत्त वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी
पुस्तकांसाठी एक घर बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती
ज्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त
पुस्तके/ ग्रंथ संच आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे
असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा
विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला
इतिहास बदलला...

८३. पाकिस्तान मध्ये एका भारतीयाची
जयंती साजरी होते ती व्यक्ती म्हणजे
बाबासाहेब....

८४. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्री,
समाजशास्त्री,
विधिज्ञ,
राज्यघटनाकार,
आधुनिक भारताचे जनक,
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः
घडविणारे सुद्धा,
मानववंशशास्त्र अभ्यासक,
पाली साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक
“बोधिसत्व”, h
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, दीन-दलित-
महिला-मजूर यांचे उद्धारक,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व प्रचलित
धर्मांचे गाढे अभ्यासक
होते....
वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच
मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित
आहे.
वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
“आधुनिक भारत देशाचा
निर्माता” एकच...
ते म्हणजे विश्वरत्न, बोधिसत्व प. पु. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर...