Tuesday, 7 November 2023

आंबेडकरवादी नेतृत्व हवे.


संघटन, संभाषण व संविधानिक कौशल्य तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आकलन नसणाऱ्या व्यक्तीस कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय  संघटनेत पद, प्रतिष्ठा अथवा नेतृत्व दिल्यास संघटन निकामी, निकृष्ट व सैरभर न झाले तर नवलच.


जो समाज उच्च शिक्षित झाला. नीतिमत्ता हे मूळ तत्वज्ञान ज्या बौद्ध धम्माचे आहे. ते तत्वज्ञान स्वीकारून ६७ वर्ष ज्या समाजाला झाले. शिकावा, चेतवा व संघटीत व्हा असे सांगून ९९ वर्ष ज्या समाजाला झाले. म्हणजेच "शिक्षा" आणि "दीक्षा" दोन्हीही उत्तम ज्या समाजाकडे आहे. अशा समाजाने यापुढे आपले नेते, पुढारी व मार्गदर्शक निवडतांना अतिशय बेजबाबदार, अंध व परंपरागत असून कसे चालेल?


आपले नेते मग ते धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक असतील. ते देश, राज्य अथवा गल्ली बोळातील असतील.. अगदी तुमच्या संघटनेचे, जयंती मंडळाचे किंवा बचतगटाचे असतील... असे नेते,प्रमुख निवडतांना या प्रबुद्ध,वाचक व शिक्षित समाजाने चोखंदळ असायला नको का?


ज्या बौद्ध धम्माचा वारसा,विरासत आणि विचार आपण चालवू इच्छीतो. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व धार्मिक चळवळीचे नैतिक वारसदार म्हणून आपण स्वतःला म्हणवून घेतो. त्या समाजाचे आचरण व  नेतृत्व देखील त्याला 

साजेसे नको का?


केवळ मंत्रोच्चारा प्रमाणे आंबेडरवाद व बौद्ध धम्माचे विचार मांडायचे परंतु आचरण मात्र विपरीत व विरुद्ध करायचे हे असे किती दिवस चालायचे?


लक्षात घ्या बाबासाहेब यशस्वी झाले ते त्यांच्या ठायी असणाऱ्या ज्ञान व शील या गुणामुळे.



पुणे कररातून निपजलेल्या निर्बुद्ध   निकृष्ट नेते तुमच्या स्वाभिमानाची लढाई लढणारे नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुरदृष्टी नसणारे हे नेते चळवळीला संपवतील. म्हणून येणाऱ्या काळात नेतृत्वाला नेते होण्यासाठी आंबेडकरवादी होणे, बौद्ध धम्माचे पाईक होणे ही प्रथम कसोटी असलीच पाहिजे.

0 comments: