Monday, 7 August 2023

ब्रम्हविहार

 




किच्छेन में अधिगतं हलं दानि पकासितूं ।
रागदोसपरेतेहि नायं सुसबुद्धो ।।१।।
परिसोतो निपुणं गंभीर दूद्दसं अणूं ।
रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्देन आवुटा ति ।। २।।
संबोधी प्राप्त केल्यावर बुद्धांच्या मनात विचार आला की, मला अवगत झालेला हा मार्ग लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाणारा आहे, हा मार्ग सामान्य व्यक्तीला समजुन येणे कठिण आहे, तर बुध्दिमान लोकांसाठी तो अत्यंत अतिसूक्ष्म पातळीवर घेवून जाणारा गहन विचार आहे. त्यामुळे, खुळचट परंपरा,धार्मिक संस्कार,आत्मवाद, ब्राम्हणी कर्मवाद याने ग्रस्त असलेली लोकं हा ज्ञानमार्ग आत्मसाद करतील काय ? या संसारातील लोक अज्ञानावरणाने अच्छादित व विषयासक्त जीवन जगत आहेत त्यामुळे मला प्राप्त झालेल्या ह्या ज्ञानाचा ते योग्य अर्थ लावतील काय ? आणि तसा योग्य अर्थ लावला गेला नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग तरी काय ? लोकांना माझ्या ज्ञानाचे परिपूर्ण अवलोकन न झाल्याने लोकांचे कल्याण होण्याऐवजी अनर्थ घडेल काय ? या आणि अश्या अनेक नकारार्थी प्रश्नांचे काहूर बुद्धांच्या मनात निर्माण झाले.
धम्म तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करावा, या बुद्धाने घेतलेल्या निर्णयात सदर प्रश्न बाधा आणित होते. यालाच बुद्धाचा विषादयोग असे म्हणतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरीता बुद्धाने चित्तास आणखी एकाग्र केले आणि अन्वेषण पद्धतीचा वापर करुन, म्हणजेच स्थूलतम विचारांचे सूक्ष्मतम विघटन करुन या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवली. बुद्धाच्या अश्या चिंतन प्रक्रियेला 'ब्रम्हविहार' असे म्हणतात. अथवा...मैत्री,करुणा,मुदिता(अनंदिवृत्ती), उपेक्षा या चार मानवी भावना ब्रम्हविहार होत !
" तिठचर निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिधो, एतं सति अधिठेय ब्रम्हमेत विहारं इधरमाहु"
( उभे असता, चालत असता, बसले असता, किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यत झोप येत नाही तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी, कारण तिलाच ब्रम्हविहार म्हणतात")
बौद्ध धम्मात पुर्णजन्म आहे हिंदू धर्मात ही आहे , बौद्ध धमात देव आहे हिंदू धर्मात ही आहे , बौद्ध धमात ब्रम्ह आहे हिंदू धर्मात ही आहे, परंतु हिंदू धर्माचा पूर्णजन्म आत्म्यासह आहे पण बौद्ध धमात आत्मा नाही...अश्या पद्धतीने इतर संकल्पना ही विरोधी आहे.
ब्रम्ह , ब्रम्ह विहार, ब्रम्हलोक या सर्व संकल्पना बुद्ध धमात आहे आणि त्या ध्यानाशी निगडित आहे.
ब्रम्हदेव, ब्रम्हविहार म्हणजे मैत्री, करुणा ,मुदिता, किंवा उपेक्षा यापैकी एखादी मनुवृत्ती होय किंवा या सर्व भावनांची असलेली प्रतिकृती होय.
तेव्हा ब्रह्मदेव बुद्धांजवळ आला किंवा मार बुद्धांजवळ आला याचा अर्थ या मनोवृत्ती बुद्ध यांच्या मनात विकास पावल्या, त्यांच्यासमोर कोणी व्यक्ती नव्हे.
ब्रम्हविहार: मैत्री, (मेत्ता) करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार मनोवृत्तींना ब्रह्मविहार म्हणतात.
(१) मैत्री : सामान्यत: माणसाला दुसऱ्याच्या सुखाविषयी ईर्ष्या किंवा मत्सर वाटतो आणि त्यामुळे मन कलुषित होते. ते तसे न होता निर्मळ व्हावे म्हणून दुसऱ्याशी मैत्रीचा भाव बाळगावा . मैत्रीत प्रेम असते आणि दुसऱ्या व्यक्तीचा उदार स्वीकार असतो. दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाला पाहून आपल्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण झाली, तर ती ईर्ष्या आपलेच चित्त मलिन करते. त्याऐवजी मैत्री भावना ठेवल्यास आपले चित्त शुद्ध आणि प्रसन्न राहते.
(२) करुणा : दुसऱ्याचे दु:ख पाहून दया वाटणे ही साधारण प्रतिक्रिया झाली. क्वचित कधीतरी, ‘बरे झाले त्या माणसाला योग्यती शिक्षा मिळाली’ अशी विकृत समाधानाची किंवा ‘मी किती नशीबवान म्हणून असले दु:ख माझ्या वाट्याला आले नाही’ अशी आत्मतुष्टीची भावनाही मनात येवू शकते. याप्रकारच्या भावना चित्ताला मलिनता आणतात. दु:खाविषयी दया दाखविण्यात अहंकाराचा सूक्ष्मगंध असतो. करुणाही त्याहून उच्चपातळीवरील भावना आहे. दु:खी व्यक्तीसाठी करुणा बाळगल्यास स्वत:चे चित्त मलिन होत नाही.
(३) मुदिता : मुदिता म्हणजे आनंदाची भावना जोपासली पाहिजे. दुसऱ्याने केलेल्या पुण्यकर्माबद्दल साधकाला आनंद वाटला पाहिजे आणि त्याने स्वत:सुद्धा असे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(४) उपेक्षा : पापाविषयी उपेक्षा बाळगावी याचा अर्थ असा की, पापाचरण करणाऱ्या व्यक्तीचा राग मानू नये, कारण हा राग साधकाचे मन कलुषित करतो. दुसरी व्यक्ती पापाचरण करीत असेल तर त्याचे चित्त कलुषित आहे परंतु, अशा व्यक्तीविषयी क्रोध उत्पन्न झाल्यास आपले स्वत:चे चित्तही कलुषित होते. त्यामुळे त्याविषयी तटस्थता बाळगणे म्हणजे उपेक्षा. पापाचरण करणाऱ्या व्यक्तीला सत्कर्म करण्यास प्रेरित करावयाचे असेल तर त्यासाठी स्वत:चे चित्त द्वेष किंवा क्रोध यापासून मुक्त असणे गरजेचे आहे. टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारणे’. ही उपेक्षा भावना नकारात्मक नसून अन्य तिन्ही भावनांप्रमाणे सकारात्मक आहे. ह्या भावना वाढीस लागतात तसतसे रजोगुण व तमोगुण क्षीण होत जातात आणि सत्त्वगुणाचा प्रकर्ष होतो.
या सूत्रात सांगितलेल्या मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना जोपासणे सकृद्दर्शनी सोपे वाटले तरी त्या मनात दृढपणे रुजविण्यासाठी साधकाला सतत प्रयत्नशील राहावे लागते.

0 comments: