बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूचा होता. जिथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशाली राज्याचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्यांच्या संवादातून उत्तमरित्या दर्शविली गेली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करत असल्याचे समजल्यावर सिंह सेनापति त्यांच्याकडे गेला व त्यांनी असे विचारले:
'भगवान अहिंसेचा उपदेश करतात. याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका- मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये, असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय? '
बुद्धाने उत्तर दिले, " मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे.
न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणार न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्यामुळे दोष लागत नाही. न्यायासाठी व सुरक्षेसाठी लढणाऱ्या माणसावर अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय यशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरु करतो त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल, पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये.
0 comments: