प्रश्न विचारणारे मिलिंद नको, तर उत्तर देणारे नागसेन व्हा! हे वाक्य कानाला ऐकायला जरी छान व टाळ्या खाऊ असेल, तरीही प्रश्न विचारू नका. हा ध्वनीत होणारा अर्थ, हा मेसेज प्रचंड घातक आहे.
पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा पायाच मुळी येथील वेद, उपनिषीद,धर्म व तत्त्वज्ञान यांना प्रश्न विचारण्यात आहे. चार्वाक,जैन महावीर व बौद्ध हे नास्तिक तत्वज्ञान, दर्शन हे मुळात येथील प्रचलीत समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारे व त्यातून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नास्तिक मार्ग,कैवल्य व निर्वाणाचे (निब्बाण) तत्वज्ञान स्वीकारणारे दर्शन आहे.
झाडाखाली बसून डोळे मिटून ज्ञानप्राप्ती होत नाही. त्यासाठी अगोदर प्रश्न पडावे लागतात की या जगात दुःख का आहे? आहे तर त्याचे कारण काय आहे? त्यावर उपाय काय करता येईल? हे सर्व करण्यासाठी अलारकलाम पासून तर उदकरामपुत्त यांना प्रश्न विचारावे लागतात. त्यानंतरही शंकेचे निरसन व मार्ग सापडत नसेल तर मिळालेल्या ज्ञान,अनुभव व उत्तरांच्या, प्रंचड चिंतनाचा कसोट्या व पायऱ्या चढल्यावर मध्यम मार्गाचा बोध होत असतो. त्यासाठी निमित्तमात्र ही सुजाता व पूंना (पूर्णा) ठरत असते.
कुठल्याही शोधाची जननी ही केवळ गरज नसून जिज्ञासा देखील असते हे विसरून चालणार नाही. धर्माला सिद्ध होण्यासाठी विज्ञानाची गरज भासते. कारण धर्म हे तत्त्वज्ञान (Philosophy, Meta Physics) आहे. विज्ञान हे स्वयं सिद्ध असते कारण अनेक वारंवरतेच्या कसोट्या पार करून ते सिद्ध होते. तरीही विज्ञान अंतिमतः हेच सत्य आहे असा दावा करत नाही. त्याउलट प्रश्न विचारण्याची मुभा ते देते. आईन्स्टाईन ला चुकीचे ठरवून नोबेल मिळालेत ते विज्ञानातच.अपौरुषी धर्मात मात्र ती मुभा नाही.
अनेक धर्म विज्ञानवादी असण्याची थाप मारतात. मुळात तशी गरज नाही. विज्ञान व तत्वज्ञान (दर्शन) हे वेगवेगळे आहेत. जे धर्म प्रचारक अशी थाप मारतात तयांनी मलिंदाला नाकारावे हे तर चूकच.
बालबुद्धीने प्रश्न विचारूनये का? प्रश्न न विचारता आलेल्या आदेशाचे केवळ पालन करणाऱ्या भक्त जमातीने आजवर केलेले नुकसान काय कमी आहे? सद्सद्विविवेक बुद्धी गहाण ठेवणारे संघटनेसाठी चांगले असतात हे जरी मान्य केले तरी बुद्धांनी प्रश्न विचारा यासाठी प्रचंड आग्रह केलेला आहे. कलामांच्या प्रश्नाचे उत्तर कलामसुत्ततात दिलेच आहे की..
क्रमशः
0 comments: