Sunday, 12 February 2023

इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 माझे मुस्लिम समाजाचे अनेक मित्र प्रत्येक शुक्रवारी नचुकता नमाजीला जातात.  अनेक ख्रिश्चन बांधव रविवारी चर्चमध्ये जातात. अनेक हिंदू मित्र त्यांचे- त्यांचे सणवार, उपास-तापास जपत असतात. तर मग आपण बौद्ध बांधव इतके उदासीन का आहोत. आपण किमान महिन्यातून एकदा तरी विहारात जातो का? आपल्याला लेणी संरक्षण व संवर्धनाबद्दल आस्था आहे का? किमान डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्था जोपासल्या, जगवल्या व वाढवल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला सहानभूती तरी आहे का? 


की आपण झोपेत आहोत? झोपेचे सोंग घेऊन आहोत? की आपली चळवळ फक्त व्हॉट्सअप व फेसबुक पुरताच आहे? रचनात्मक काही निर्माण करायचे आहे की नाही? ज्या समाजाच्या नावावर शाळेत, नोकरीत प्रतिनिधीत्वाच्या नावावर आरक्षण भोगले त्या समाजाचे देणे तरी आपण लागतो की नाही?


की कुणीतरी भीमा कोरेगावला हल्ला करेल तेव्हा आपण जागे होणार? किती दिवस RSS च्या संघटनेचे गुणगान गाणार? कधी सेना, कधी राष्ट्वादी तर कधी भाजप, काँग्रेसच्या वळचणीला जाणार? 


आपला कृती कार्यक्रम आहे की नाही? 


संभाजी भिडे हजारो पोरांना मूर्ख बनवून शकतो. RSS सारखे उपद्रवी संघटन जोमात चालते. तर बाबासाहेबांच्या विचारांचे संघटन का चालत नाही??


ज्या बाबासाहेबांना बाप मानतो.  स्वतःला त्यांचे मानस संतान समजतो. त्यांचे वैचारिक वारसदार म्हणून मिरवतो. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार आहोत की नाही? की फक्त नावापुरते अपघाताने जन्माने आंबेडकरी आहोत आपण.?


आज जी आपल्याकडे गाडी, माडी आणि साडी आहे ती बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेल्या संधीमुळे आहे. अन्यथा आपल्या पूर्वजांहून आपण खूप हुशार किंवा स्मार्ट अथवा शिक्षित आहोत आसा समज असेल तर त्यातून बाहेर पडा. आपल्या पूर्वजांना संधी नव्हती तर आपल्याला ती संधी मिळाली आहे इतकाच तो फरक आहे. ती संधी बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्गाने निर्माण करून दिली आहे.


मिळालेली संधी आणि संसाधने साबूत ठेवण्यात चळवळीचा मोठा वाटा आहे. अगदी आरक्षण असेल, स्कॉलरशिप असेल, सरकारी नोकरीचा बॅकलॉग असेल सामाजिक प्रतिष्ठा असेल हे सगळे मिळवण्यात व टिकवण्यासाठी चळवळ झटत असते. त्यामुळे त्याचे आपसूक आपण लाभार्थी असतो.


तुम्ही २४*७ धम्माचे अथवा चळवळीचे काम करा असे कुणी सांगत नाही. परंतु एक सामाजिक जाणीव व जबादारीतून तुम्ही तुमचा शक्य तो सहयोग व सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्येकाला घरा-घरातुन खेचून जबरदस्तीने चळवळ चालत नसते तो सहभाग जाबदारीतून आला पाहिजे. इतकंच.

0 comments: