पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था होय. शील, दान, उपेक्षा, शांती, नैष्कम्य, विर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री या दहा पारमिता होत.
दानाचे तीन प्रकार :-
१) आमिष दान म्हणजे पैसे, कपडे, औषधे काही महत्त्वाच्या गरजू वस्तूंचे दान देणे.
२) अभयदान म्हणजे अदृश्य स्वरूपातील दान प्रेम, वेळ, आशिर्वाद, सुरक्षा, म्हणजे अभयदान.
३) धम्मदान म्हणजे धम्म सांगणे, धम्मपोदेश देणे, निसर्गाचे नियम सांगणे. योग्य मार्ग दाखवणे. योग्य सल्ला देणे.
सर्व दानात सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे. कारण काही दानाने केवळ काही वेळापुरताच फायदा होतो. पण धम्मदानाने व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य सुधारते.
दानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय. दान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की,
तिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा ।
तस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥
याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग ( रागरहित ) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.
दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात फार महत्व आहे.
राजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावांचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.
दान करणे हा श्रेष्ठ गुण होय. दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. घेण्याएवजी माणूस देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे. जे विवंचनेत आहेत, जे दानावरच जगतात अशांना सढळ हाताने मनपूर्वक दान केले पाहिजे. दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये. कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे सुख प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती. पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे. त्याचा देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द उपासकाने धन, द्रव्य, वस्त्र, रक्त व प्रसंगी शरीराचेही दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय.
समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतो. आपण जे कमावले त्याला अप्रत्यक्षपणे समाजाचाही हातभार लागलेला असतो. दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्या, तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल, म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ लागतो. मनातील तृष्णेचा क्षय होऊ लागतो, समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय, धम्माच्या प्रसार, प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे.
भवतु सब्ब मंगलम्
0 comments: