Monday, 6 February 2023




 माघ पौर्णिमा ०५ फेब्रुवारी २०२३

-------------------------------------

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या  संपूर्ण जीवनात बाराही पौर्णिमाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु बौद्ध धम्मात माघ पौर्णिमा ही तथागताच्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेकरिता प्रसिद्ध आहे. भगवान बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश करीत ४५ वर्षे पायी फिरत होते. त्यांचे वय ८० वर्षे झाले होते. अशा वेळी त्यांचा मुक्काम वैशाली नगरीत होता.


भगवान बुद्धांचा संघ आणि स्वतः तथागत चापल चैत्य विहारात विश्रांती घेत होते. एक दिवस तथागतांनी प्रिय शिष्य आनंद याला जवळ बोलावले आणि सारंद्र्य चैत्य विहारात चलण्यास सांगितले. भन्ते आनंद यांनी सर्व भिक्षूंना तथागताचा आदेश सांगितला. त्याप्रमाणे सर्व भिक्षू संघासहित सारंद्र्य चैत्य विहारात आले. भिक्षू संघ विहारात बसले असता भन्ते आनंद तथागतांना विनंती करतात की, संघासाठी आपण उपदेश करावा. तथागत सर्व भिक्षूंना म्हणाले, " मी येत्या तीन महिन्यांनी देहत्याग करणार आहे. येत्या वैशाखी पौर्णिमेला माझे परिनिर्वाण होणार आहे." त्या दिवशी माघ पौर्णिमा होती. तथागत म्हणतात, " मी दिलेल्या शिकवणुकीनुसार आपण धम्म प्रसार करावा. लोकांना उपदेश करावा. यापुढे धम्मच तुमचा मार्गदाता राहणार आहे."


माघ पौर्णिमेस  इसवी सन पूर्व ४८४  या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण घोषणेमुळे माघ पौर्णिमा ही " महापरिनिर्वाण घोषणा दिन " म्हणून प्रसिद्ध आहे.



 यानंतर दुसऱ्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध वैशाली नगरीत गेले. तेथे त्यांनी आशीर्वादाच्या रूपाने  आपले भिक्षापात्र दान स्वरूपात लिच्छवी लोकांना भेट दिले.


दुसरी घटना अशी की भगवान बुद्धांचा प्रिय शिष्य  आनंद यांचे देखील  परिनिर्वाण माघ पौर्णिमेस झाले.

0 comments: