माणसं पोरकी असतात..
अनेक अर्थाने..
कधी उन्मळून पडतात.
खूप बोलणारी माणसे रीती होतात अनेकदा..हातच काहीही न ठेवता. भर-भर बोलतात आणि विसरून जातात.
काही बोलत राहतात. तेच-तेच, तेच-तेच.. कुरवाळत राहतात. सुखाला, दुःखाला..मोठं करतात प्रतिमेला. स्वतःहून, स्वतःपेक्षा अनेकदा…
न बोलणारी माणसे. आसुसलेली असतात.ऐकायला…. तुम्ही त्यांना ओरडा-बोला. ती ऐकत राहतात फक्त.. तंद्री लागल्यासारखी.. ती कुणाच्याही प्रेमात पडतात. त्यांना सगळेच चांगले भासतात. प्रेमात असतात प्रेमाच्या, चांगुलपणाच्या..
अगदी शेवट पर्यंत…
शेवटा पर्यंत. आनंदाने.
ते खूप बोलतात- खूप बोलतात स्वतःशी.. एकांताशी.. गप्पा करतात स्वप्नांशी,चित्र रंगवतात..कधी घाबरतात. पळतात,रडतात. कधी पडतात,धडपडतात,घडतात..कधी रेंगाळतात जिवन प्रवासात… चित्रावर, मित्रावर,रंगावर, गंधावर..ढेपाळतात. सावरतात स्वतःला. मग लपतात,लपवतात स्वतःला, स्वप्नाला
अनेकदा..
मग ती घाबरतात. त्यामुळे चिडचिड करतात..रागे भरतात सगळ्यांना…भीती पोटी.
ती प्रेमानेच बोलतात पण मोठ्याने..आतला आवाज दाबण्यासाठी.
माणसं ती…. चुकतात. शिकतात. काही फूलतात, काही गळतात.. मागे पडतात. त्याचं गाळात.
काही संपतात..
उरतात..कायमची.

0 comments: