बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बहुसंख्य अस्पृश्यांना नागभूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित व भारतीय संविधानाला पुरक अशा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्यासोबतच धम्म आणि संविधान अशी दुतर्फा जिम्मेदारी देखील दिली.
बाबासाहेबांच्या हयातीतच सन १९५६ साली ते सिलोन येथे गेले असता बौद्ध धम्मातील पूजा पाठ व गाथा त्यांनी संग्रहित व रेकॉर्ड करून घेतल्या होत्या.
बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणे त्यांनी बायबल सदृश्य धम्म ग्रंथ १९५६ ला आपल्यासाठी लिहून देखील ठेवला. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “दि बुद्धा अँड हिस धम्मा” या अप्रतिम ग्रंथाला वैश्विक पातळीवरील बौद्धांचा एक आदर्शभूत बायबल सारखा ग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकलो नाही आहोत. ही शोकांतिका म्हणावी लागेल.
धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या ५३ दिवसांत म्हणजे ०६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले. अर्थातच त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व संस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही जबाबदारी अपसुकच ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या नवदीक्षित व शिक्षित उपासकांवर आली.
या नवदीक्षित आणि शिक्षित आंबेडकरी समाजाला आपण स्वीकारलेल्या नवीन जीवन मार्गाच्या संपन्नते बाबत कुतूहल, निकड व ज्ञान जालसा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे चौफेर वैचारिक घुसळणीतुन अनेक धम्म संस्कार पुस्तकांपासून ते थेट पाली त्रिपीपटकापर्यंतच्या अनुवादापर्यंत अशा अनेक अप्रतिम व उत्तम ग्रंथ संपदा व साहित्य निर्मिती झाली.
आचार्य राहुल संस्कृत्यायन लिखित “बुद्धचर्या”, पी.एल.नरसू लिखित “इसेन्स ऑफ बुद्धिझम”, पॉल कॅरोस लिखित “दि गॉस्पेल ऑफ बुद्धा”, रा.धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीलासार”, पंडित कोसंबी लिखित “बुद्ध धर्म आणि संघ”, वा.गो. आपटे यांचे “बौद्ध पर्व”, केळुस्कर गुरुजींचे लिखित “भगवान बुद्धांचे चरित्र”, आचार्य बुद्धघोष लिखित अठ्ठकथा तसेच भदंत कौसल्यायन लिखित असे नानाविध साहित्य संपदा उपलब्ध झाली.
त्यानंतरच्या टप्प्यात अनेक विद्वानांनी वेळोवेळी लेखन केले आहे. जसे पँथर राजा ढाले सर संपादित “धम्म लिपी” अंक. डॉ. गंगाधर पानतावणे सर संपादित “अस्मितादर्श” मधील समीक्षात्मक लेख असतील. एडवोकेट विमल सूर्य चिमणकर सर “दी पीपल” या मासिकातून संपादित लेख असतील असे अनेक विद्वानांनी निर्लोप लिखाण केले.
पुढील काळात बहुजनवादी,मूलनिवासीवाद,शिवधर्म व गोयंका गुरुजींचे विपश्यना असे अनेक प्रयोग देखील येथे घडले. ते कितपत हितकारक अथवा अहितकारक त्यावर अनेकांनी आपली मते मांडलीच आहेत. राज ढाले, यशवंत मनोहर व तत्सम दोन्ही बाजूचे लिखाण झाले.
बाबासाहेबांनंतर नव दीक्षित आणि शिक्षित समाज आणि त्याची सामाजिक चळवळ याची वर्तमान स्थिती ही निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. काळजी करण्यासारखी जरी असली तरीही आंबेडकरी चळवळ संपलीआहे का? या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.
मात्र विविध महाविद्यालयातून विद्यापीठांमधून प्राध्यापक ,अभ्यासक, भिक्कू संघ, उपासक,साहित्यिक लेखक यांच्याकडून बौद्ध साहित्य,संस्कृती,लेणी, धम्माचे तत्त्वज्ञान व आंबेडकरवाद या सर्वांचा अभ्यास करून अधिक स्पष्ट नवसर्जन नवनिर्माण साहित्य, ग्रंथ निर्मिती व संस्थात्मक काम होणे अपेक्षित आहे.

0 comments: