Sunday, 30 September 2018

शबरीमला मंदिर प्रवेश






धर्म म्हणजे सत्य आणि(अथवा) नीती फार -फार तर जीवन जगण्याची कला, मार्ग. या पलीकडे मला धर्माचं महत्व  अथवा गरज वाटतं नाही.

जो धर्म पशूला माता आणि माणसाला अस्पृश्य मानतो. ज्या धर्माचे धर्मग्रंथ व्यभिचार, बळजबरी, बहिपत्नीक, बहुपती आणि वर्णव्यवस्थेचे चे लागूनचालन करण्यादंग असतील. दांभिकता, हिंसाचार,अंधश्रध्दा पूरक भाकड कथांनी जे ओतप्रोत भरलेले असतील.

त्या धर्मात, समाजात सतिप्रथा, विधवा विवाह बंदी, बालविवाह, हुंडाप्रथा, हुंडाबळी, स्त्री-भ्रूणहत्त्या, बलात्कार, केशवपन, मंदिर बंदी,देवदासी, पडदा प्रथा, ऑनर किलिंग...इत्यादी असंण म्हणजे नवल नाही. यालाच ते संस्कृती असं म्हणत असावेत बहुदा?

मंदिर प्रवेश मग तो स्त्रियांचा असो अथवा दलितांचा तो काही देवाच्या भेटीचा अट्टाहास मुळीच नाही. स्त्री-पुरुष हा भेद करणारे हे कोण देवाचे ठेकेदार लागून गेले.

माणूस म्हणून सगळे समान आहेत हे सांगण्यासाठी म्हणून शनिशिंगणापूर, हाजी अली दर्गा, आणि शबरीमला मंदिर प्रवेशाचा न्यायालयीन लढा..

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुरुषी अहंकार, पुरुषसत्ताक व्यवस्था, धर्माचा कोप, भ्रामक अंधश्रद्धा या सर्वांना वेसण घातली म्हणून न्यायपालिकेचे अभिनंदन करावे तितके कमीच.

मूळ मुद्दा हा मानसिकता बदलण्याचा आहे.
स्त्रीस माता, अम्मा, पूजनीय मानायचे..मूर्त्यांची पूजा अर्चा करायची आणि खऱ्या खुऱ्या स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या शारीरिक नैसर्गिक बदलास मात्र अपवित्र मानायचे?

ज्या पासून आपला जन्म होतो ते अपवित्र मानलं तर आपण कोणत्या अंगाने पवित्र ठरू बरे?

पुरुषप्रधान मानसिकतेचं हा कावेबाजपणा आणि हेतुपुरस्कर केलेला दुटप्पीपणा धर्माच्या  नावाखाली सुरू होता. तो धार्मिकभिती व कोप या नावाखालीही आजतागायत चालवला गेला.

आज समाजाची मानसिकता व प्रौढता बदलत आहे सामाजिक जाणिवा बदलत आहेत त्या अधिक प्रगल्भ व्हाव्यात. अधिक विज्ञान व मानवतावादकडे जाव्यात हीच कामना..


धन्यवाद...!