तुमच्यावर वाईट संगत असर करते का? मग चांगली संगत असर का नसेल करत? की चांगली माणसे कधी तुम्ही पाहिली, ऐकली अथवा अनुभवलेलीच नाहीत असं तर नाही ना? मुळात चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक न कळण्या इतके आपण दुधखुळे असतो काय?
वाईट गोष्टी...मग ते कुठलंही हानिकारक व्यसन, खोटं बोलणं, पैसे उडवण्याचा मोह, उदानटप्पू करण्याचा नाद असेल.
ही सर्व व्यसन अनेकांना क्षणिक पण झटपट आनंदाची खात्री देणारी व चटक ही लावणारी मोहक असतात. आजकाल या सर्व व्यसनांना उचभ्रूपणाचे लेबल व जणू समाजमान्यता असल्यामुळे ते मिरवता देखील येतात.
याउलट तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी सुख मिळवण्यासाठी प्रथम कष्ट उपसावे लागतात. आणि कष्ट अनेकांना नको असतात. अथवा शॉर्टकट्स हवे असतात, त्यामुळे आपण अनेकदा चकाकणार्या काचेच्याच तुकड्याला हिरा समजून कवटाळत बसतो.
चांगल्या आणि वाईट संगती मधून आपण स्वतः निवड करत असतो. आपल्या आजूबाजूला दोन्हीही प्रकारचे पर्याय उपलब्ध असतांना सरतेशेवटी आपण त्यात काय पाहतो व काय निवडू ईच्छीतो तेच आपल्याला मिळते.