Saturday, 24 October 2020

परिवर्तन


पाथर पूजे हरि मिले , तो मैं पूजू पहाड़ . घर की चाकी कोई ना पूजे, जाको पीस खाए संसार... - कबीर

धर्म ही एक व्यक्तिगत अथवा वैयक्तिक बाब आहे; असे आपण कितीही जरी कितीही म्हटलं किंवा मानलं तरी ते आज मितीला साफ खोटं आहे. कारण, धर्म हा आर्थिक-सामाजिक-राजकीय व तत्सम बहुअंगी-बहुढंगी   

 गोष्टी व घडामोडींवर बहुआयामी परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. मुळात धर्म हा समाजाचेही सामाजिक जीवन जगण्याचे लिखित अथवा अलिखित नियमन आहे. म्हणून...

आपण नामस्मरण करतो, माळ जपतो, पूजा करतो, नमाज पडतो, मंदिर, मस्जिद, चर्च,विहार, गुरुद्वारा, किंवा इतर धार्मिक स्थळांना भेटी देतो, धार्मिक क्रिया करतो, सकाळी फोटो-मूर्तीला हार घालतो, नवस-सोहळे पाळतो,तीर्थाटन , उपवास करतो.. यातून आपण धर्माचे पालन करत असतो असे आपणाला वाटत असेल तर आपण चुकीच्या वाटेवर आहोत.

खरा धर्म हा सत्य, समाधी, समता, बंधुता,प्रज्ञा, करुणा आणि शिलाचे पालन यात आहे. काम,क्रोध, मोह, माया, मत्सर हा दुर्गुणांचा त्याग करण्यात आहे. जे मला किंवा तुम्हाला ही अवघड वाटते.

त्यामुळे माणसे बाह्य अवडंबर, कर्मकांड, गाजावाजा, अंगप्रदर्शन यावर भर देऊन स्वतः ला धार्मिक,आस्तिक व श्रेष्ठ सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतात. अनेक बुवा-बाबा अम्मा-टम्म, राजकीय पुढारी, धर्माचे ठेकेदार धर्माचा,धरणांचा व आपल्या भावनीक श्रद्धेचा गैरवापर करून आपलेच आर्थिक, सामाजिक, शारीरिक व राजकीय शोषण करत असतात.

धर्म ही धारण करण्याची गोष्ट आहे. तो रंग, वर्ण-वर्ग या बाह्यांगाशी संबंधित नाही. धर्म हा अंतर्मन, काया-वाचा, आचार-विचार व आत्मशुद्धीचा सम्यक समबुद्ध, प्रबुद्ध होण्याचा मार्ग आहे.