Friday, 14 July 2023

परिवर्तन

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, तुमच्या मिळकतीतील किमान विसावा हिस्सा तुम्ही समाजासाठी दान केला पाहिजे. हे अवाहन दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.  आता प्रश्न असा आहे की, आपण जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवुन घेतात. ते आपल्या मिळकतीतील विसावा हिस्सा समाजासाठी खर्च करतात का;  आणि जर करत नसतील तर आपण खरंच आंबेडकरवादी आहोत का? हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बरं विसावा हिस्सा म्हणजे किती? तर ज्याला लाखभर रुपये पगार आहे.  त्यांनी किमान पाच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे. ज्याला पन्नास हजार रुपये पगार आहे त्यांनी अडीच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे.  आणि ज्याला 25 हजार रुपये आहे त्यांनी १२५० प्रती माह खर्च केला पाहिजे. 


 आता दुसरा प्रश्न असा उरतो आपण जर समाजासाठी हे दान  करत नसून तर ज्या म्हणून आंबेडकरवादी चळवळी आहेत त्या कशा टिकणार? आंबेडकरवादी चळवळी मृतप्राय होण्याचे हे प्रमुख कारण आहे. ज्या समाजाने आंबेडकरी होण्याचा फायदा घेतला. तो समाज आंबेडकरी होण्याचं देणंही लागतो हे तो  स्व-स्वार्थापायी जाणून बुजून विसरला आहे.


 बरं जे जागृत आहेत त्यांनी तरी किमान हा जागृतीचा विस्तव विझु देता कामा नये. तुम्ही-आम्ही आंबेडकरी चळवळीचे डायरेक्ट बेनिफिशरी अर्थात सरळ लाभार्थी आहोत. तो लाभ आपण सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व राजकीय अशा निरनिराळ्या स्तरावरती  उपभोगले आहेत.


 त्यामुळे किमान आंबेडकरी चळवळी राजकीय असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील किंवा शैक्षणिक असतील या मृतप्राय होता कामा नये. त्या कार्यरत आणि वृद्धिंगत व्हाव्यात म्हणून आपण सामाजिक दान केलंच पाहिजे. कारण जोवर चळवळ आहे तोवर आपण आहोत.


व्हाट्सअप आणि फेसबुक हे खरंतर संभाषणाची उत्तम साधन आहेत परंतु केवळ व्हाट्सअप आणि फेसबुक वर पोस्ट आणि व्हिडिओच्या रतीबच्या-रतीब टाकून आंबेडकरी चळवळीला आपण सहकार्य अथवा  नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहोत अशा अविर्भावात मुळीच राहू नये.  या भ्रमात असणाऱ्यांनी, स्टेजवरून लांबलचक भाषण झोडपणाऱ्यांनी आणि स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांनी.  जमिनी स्तरावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ता व संस्थांना  सहकार्य व सक्रिय सहभाग नोंदवून आपला पाठींबा व योगदान दिले पाहिजे. हाच खरा मार्ग होय.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬