Sunday, 17 November 2024

कार्तिक पौर्णिमा- २०२४

 





प्रवचनात कार्तिक पोर्णिमेचे महत्व खालील प्रमाणे विषद करण्यात आले. 

१. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा: बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात दुसऱ्या खंडातील तिसऱ्या भागात सदर प्रसंग वर्णिला आहे. वाराणसी नजीक निरंजना नदी काठी उरवेला आश्रमात हे काश्यप बंधू स्थीत होते. 

i .उरवेल काश्यप ii . नदी काश्यप  आणि iii . गया काश्यप अशी त्यांची नावे होत. ते अग्निपूजक व ब्राह्मण गोत्राचे होते. त्यांच्या डोक्यावरील खांद्यापर्यंत लांब केसांमुळे त्यांना जटील/ जटाधारी म्हणतअसत.परिसरात त्यांना प्रतिष्ठा होती. जवळपास १००० शिष्य त्यांचे होते.  त्यांनी कार्तिक पौर्णिमेला धम्मदीक्षा घेतली. वयाच्या १४५ व्या वर्षी कार्तिक पौर्णिमेला उरवेल काश्यप यांना निर्वाण प्राप्त झाले.

२. सारीपुत्त व महामोग्गलायन यांची धम्मदिक्षा : राजगृहात संजय वेलठी यांचे दोन शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत. इतरही २५० असे शिष्य होते. उपतिष्य आणि कोलीत यांच्या शंकांचे निरसन अद्याप झाले नव्हते. त्यांनी आपसात ठरवलेलं की ज्याला प्रथम सत्य सापडेल तो दुसऱ्याला सांगेल. राजगृहात बुद्धांचे शिष्य भदंत आनंद यांचे चालणे,बोलणे वागणे व विचार यातून हे दोन्ही शिष्य प्रभावीत झाले. त्यांचे गुरु कोण आहेत? त्यांची शिकवण काय आहे? मार्ग काय आहे? हे सगळे जाणून त्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश घेतला व सोबत २५० शिष्य ही आले. उपतिष्य व कोलीत यांचे अनुक्रमे सारीपुत्त व महामोग्गलायन असे नामकरण झाले.    

सारीपुत्त व महामोग्गलायन हे पुढे संघाचे सेनापती व बुद्धांच्या डाव्या व उजव्या भुजा बनले. राहुलचे धम्मगुरू हे सारीपुत्त होते. यावरून त्यांचे महत्व कळते.  इ.स. पूर्व ४८४ मध्ये कार्तिक पोर्णिमेला त्यांनी इच्छामरण स्वीकारले. बुद्धांच्या हयातीतच त्यांचे चैत्य स्तूप श्रावस्थी येथे निर्माण केले. त्यानंतर लगेच १५ दिवसांनी म्हणजे कार्तिक अमावस्येला जैन धर्म प्रचारकांनी (निकंठक) यांनी महामोग्गलायन यांची हत्या केली. 


३. मूलगंध कुटीर विहार

चक्रवर्ती सम्राट अशोकाने नालंदा तक्षशिला निर्माण केले. नालंदा आता भारतात तर तक्षशिला पाकिस्तानात आहे. श्रीलंकेचे पूज्य अनागरिक धम्मपाल यांनी भारतात येऊन तक्षशीलेतून बुद्धांचे अस्थिकलश आणून सारनाथ येथे आधुनिक मूलगंध कुटी विहार निर्माण केले. कार्तिक पौर्णिमेला या अस्थींचे पूजन व मिरवणूक होते.

संदर्भ:

१. बुद्ध धम्म में ऐतिहासिक पौर्णिमायेकां महत्त्व- भदंत आर धम्मीकुर थेरो पान क्रमांक ५१,५२

२. ⁠बुद्ध आणि त्यांचा धम्म ( खंड दोन भाग तीन) - डॉ. बाबासाहेब 

३. ⁠वर्षावास आणि बारा पोर्णिमा - डॉ. लता धनराज

Thursday, 8 August 2024

प्रश्न विचारावेत का?

प्रश्न विचारावेत का?

 प्रश्न विचारणारे मिलिंद नको, तर उत्तर देणारे नागसेन व्हा! हे वाक्य कानाला ऐकायला जरी छान व टाळ्या खाऊ असेल, तरीही प्रश्न विचारू नका. हा ध्वनीत होणारा अर्थ, हा मेसेज प्रचंड घातक आहे.


पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा पायाच मुळी येथील वेद, उपनिषीद,धर्म व तत्त्वज्ञान यांना प्रश्न विचारण्यात आहे. चार्वाक,जैन महावीर व बौद्ध हे नास्तिक तत्वज्ञान, दर्शन हे मुळात येथील प्रचलीत समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारे व त्यातून समाधानकारक  उत्तर न मिळाल्याने नास्तिक मार्ग,कैवल्य व निर्वाणाचे (निब्बाण) तत्वज्ञान स्वीकारणारे दर्शन आहे.


झाडाखाली बसून डोळे मिटून ज्ञानप्राप्ती होत नाही. त्यासाठी अगोदर प्रश्न पडावे लागतात की या जगात दुःख का आहे? आहे तर त्याचे कारण काय आहे? त्यावर उपाय काय करता येईल? हे सर्व करण्यासाठी अलारकलाम पासून तर उदकरामपुत्त यांना प्रश्न विचारावे लागतात. त्यानंतरही शंकेचे निरसन व मार्ग सापडत नसेल तर मिळालेल्या ज्ञान,अनुभव व उत्तरांच्या, प्रंचड चिंतनाचा कसोट्या व पायऱ्या चढल्यावर मध्यम मार्गाचा बोध होत असतो. त्यासाठी निमित्तमात्र ही सुजाता व पूंना (पूर्णा) ठरत असते.


कुठल्याही शोधाची जननी ही केवळ गरज नसून जिज्ञासा देखील असते हे विसरून चालणार नाही. धर्माला सिद्ध होण्यासाठी विज्ञानाची गरज भासते. कारण धर्म हे तत्त्वज्ञान (Philosophy, Meta Physics) आहे. विज्ञान हे स्वयं सिद्ध असते कारण अनेक वारंवरतेच्या कसोट्या पार करून ते सिद्ध होते. तरीही विज्ञान अंतिमतः हेच सत्य आहे असा दावा करत नाही. त्याउलट प्रश्न विचारण्याची मुभा ते देते. आईन्स्टाईन ला चुकीचे ठरवून नोबेल मिळालेत ते विज्ञानातच.अपौरुषी धर्मात मात्र ती मुभा नाही.


अनेक धर्म विज्ञानवादी असण्याची थाप मारतात. मुळात तशी गरज नाही. विज्ञान व तत्वज्ञान (दर्शन)  हे वेगवेगळे आहेत. जे धर्म प्रचारक अशी थाप मारतात तयांनी मलिंदाला नाकारावे हे तर चूकच.


बालबुद्धीने प्रश्न विचारूनये का? प्रश्न न विचारता आलेल्या आदेशाचे केवळ पालन करणाऱ्या भक्त जमातीने आजवर केलेले नुकसान काय कमी आहे?  सद्सद्विविवेक बुद्धी गहाण ठेवणारे संघटनेसाठी चांगले असतात हे जरी मान्य केले तरी बुद्धांनी प्रश्न विचारा यासाठी प्रचंड आग्रह केलेला आहे. कलामांच्या प्रश्नाचे उत्तर कलामसुत्ततात दिलेच आहे की..


क्रमशः

Friday, 5 July 2024

बुद्ध आणि प्रेम

बुद्ध आणि प्रेम

 डोळ्यांनी आपल्याला जग केवळ दिसते. त्या दिसणाऱ्या जगाची अनुभूती हे आपल्या मनावर अवलंबून असते.


मनावर सर्वाधिक गारुड जर कुणाचं असेल तर ते प्रेमाचे असते. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला कडक उन्हात देखील सावलीची अनुभूती आणि चिंब सरींची बरसात जाणवू शकते. बाहेरच्या कर्णकर्कश हॉर्नसच्या आवाजात देखील त्याच्या कानात व्हायोलीन वाजू शकते. 


प्रेमात असणाऱ्या प्रियकराला आपली प्रियसी ही जगातील नितांत सुंदर स्त्री वाटत असते. 


आईला स्वतःचं बाळ हे जगातील सर्वाधिक गोंडस बाळ वाटतं असतं.


एखादया व्यक्तीकडे, वस्तूकडे, ठिकाणाकडे, नात्याकडे जेव्हा तुम्ही प्रेमाने पाहता तेव्हा ती वस्तू, व्यक्ती, ठिकाण हे सूंदर बनते. ही सूंदर बनवण्याची किमया प्रेमात असते.


अहिंसकाचा अगुलीमान व अगुलीमानाचा अरहंत बनण्याचा प्रवास हे त्याचे उदाहरण.


बुद्धाची करुणा ही दुसरं तिसरं काही नसून मानवी समाजासाठी असणारे प्रेम आहे. अन्यथा कोण राजकुमार आपली ऐश्वर्यसंपन्न जीवनशैली सोडून उपाशी-तापाशी, राना वनात आत्मक्लेश सहन करेल? 

आणि ते मिळालेले ज्ञान प्रत्येकाला लोक भाषेत समजावून सांगेल? वयाची ४५ वर्ष लोककल्याणासाठी खर्च करेल?


असे महानायक व अतुलनीय, अविश्वसनीय कहाण्या या निर्व्याज व निस्सीम प्रेमातूनच जन्माला येऊ शकतात.