Thursday, 19 June 2025

भांडा सौख्यभरे

 



नातं कोणतही असो मित्र-मैत्रिणीच, पती-पत्नीच, भावा- भावच, बाप-लेकाच अथवा दुसरे कोणत. नात्यात कायम गोडी गुलाबीचे दिवस असत नाहीत. असले तर त्या नात्यात कुणीतरी एक वरचढ अथवा एडजस्टमेंट करत असतो. भांडण अथवा चर्चा ही अनेकदा दोन स्पर्धकांमध्ये होत असते. बॉस आणि कर्मचारी यांत ऑर्डर्स दिल्या व पाळल्या जातात. तेथे भांडण उद्दभवत नाही. झालीच तर धुसफूस होते. कारण भांडण करण्यासाठी बोलण्याचं व मत मांडण्याचे स्वातंत्र्य असणे ही पूर्वअट असते. नात्यात भांडण होत नसेल तर शक्यता आहे की, ते दिखावू असेल. कारण म्हणतात ना शेंदूर खर्वडल्याशिवाय देव की दगड हे कळत नसत.


भांडणाने अनेकदा मुद्याची चिकित्सा,समीक्षा होते. त्या मुद्याचे निरनिराळे कांगोर समोर आणले जातात. माझा मुद्दा किंवा माझे मत कसे बरोबर आहे हे पटवण्यासाठी अनेक अंगाने विचार मांडले जातात. समरूप उदाहरण दिली जातात. तुमच्या ज्ञानाची, अनुभवाची, भाषेची, व्यक्तिमत्वाची, आकलनाची, पटवण्याच्या क्षमतेची तेथे कसोटी लागते.


तुमचा मुद्दा पटवून देताना तुम्ही कसली मदत घेता त्यावरून तुमची स्व:ची ओळख समजत असते. तुम्ही तत्वद्यानाची व वैचारिक भिस्त लढवता? शिव्या श्राप व हिंसक भाषेवर उतरता? हात पाय चालवून बळाचा वापर करता? हे सगळं तुमच्या आतील माणसावर, कळत नकळत घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते.



अनेकदा आपण कशासाठी कुणासाठी व कुणासोबत भांडत आहोत हेच अनेक लोक विसरून जातात व भांडण हा मुद्दा बनतो. मुद्यावर भांडण राहत नाही. त्यातून काय मिळणार याचा विचार बाजूला पडून काय बरोबर या पेक्षा मी बरोबर यावर लोक भांडत बसतात. या अहंकार व मी पणाच्या भांडणाला अंत राहत नाही. त्यामुळे मूर्खांशी भांडण देखील करू नये असे म्हणतात ते उगीच नाही.


तुमच्या जिवनात तुमच जिवन समृद्ध करणारे भांडखोर लोक आहेत की कायम मानसिक उच्छाद मांडणारे लोक आहेत यावर खूप काही निर्भर करते.


कॉन्फिडेंट असणारे अनेक लोक मला मूर्ख, श्रीमंत असणारे सरंजामी व भांडणारे स्पष्टोक्ते वाटतात.