तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?
सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.
———-
भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .
पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो. तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते.
त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.
आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.
या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.
स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत.
पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत.
वैचारिक भिन्नता:
आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.
त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे.
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:
पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे.
राजकीय स्वार्थ आणि वापर:
बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात. न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.
मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत.
पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.
स्वायत्ततेची गरज:
अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.
आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.
