Saturday, 24 July 2021

आषाढ पौर्णिमा ,वर्षावास



त्रिपिटक


त्रिपिटक (पाली : तिपिटक): हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले. तीन विभाग विनयपिटक (संस्कृत व पाली) सूत्रपिटक (संस्कृत; पाली-सुत्तपिटक) अभिधर्मपिटक (संस्कृत; पाली-अभिधम्मपिटक)


विनयपिटक विनयपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत. (भिक्षुंच्या अनुशासनविषयक नियमांचा संग्रह) १. महावग्ग २. चुलवग्ग ३. पाराजिक ४. पाचित्तिय ५. परिवार.


सुत्तपिटक सुत्तपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात गौतम बुद्धांचा उपदेश आहे.(सामान्य जनांसाठी प्रवचन) (१) दिघ निकाय (२) मज्झिम निकाय (३) संयुत्त निकाय (४) अंगुत्तर निकाय (५) खुद्दक निकाय.


अभिधम्मपिटक अभिधम्मपिटकाचे सात विभाग आहेत. त्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन केले आहे.(धर्मासंबंधी गंभीर शिकवणूक) १. धम्मसंगणि २. विभंग ३. धातुकथा ४. पुग्गलपञती ५. कथावत्थु ६. यमक ७. पट्ठान.


अडीच हजार वर्षापूर्वी पाली भाषेला मागधी म्हणायचे, जी उत्तर भारतातील लोकभाषा होती. ती भाषा ज्यात बुद्धांनी धर्माची शिकवण दिली होती. ज्या प्रकारे हिंदू धर्मग्रंथाची भाषा संस्कृत आहे आणि कॅथॉलिकांच्या धर्मग्रंथांची भाषा लॅटिन आहे, त्याप्रमाणे पाली भाषेत भगवान गौतम बुद्धांची शिकवण सुरक्षित ठेवली गेली आहे; भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांत ५०० अरहंतांची विशेष सभा (प्रथम संगायन/संगती)झाली होती. त्यात भगवान बुद्धांनी केलेल्या सर्व उपदेशांचे म्हणजे त्यांच्या विपुल मौखिक शिकवणुकीचे संगायन (संकलन) केले गेले आहे. जी शिकवण भगवान बुद्धांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या जीवनकाळात दिली होती. अरहंत भिक्षुंनी याचे पठन (मुखोदगत) केले त्यापासुन जे लिखित स्वरूपात बनले यालाच त्रिपिटक म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ आहे, ‘तीन पेटारे.’


 हेच त्रिपिटक श्रीलंकेत राजा वट्टगामिनीच्या संरक्षणात झालेल्या चवथ्या संगायनाच्या वेळी ताडपत्रांवर लिहिले गेले.पाचवे संगायन ब्रह्मदेशाच्या मांडले शहरात राजा मिन्डोमिनच्या शासनकाळात झाले. पूर्ण त्रिपिटक संगमरवरी मोठमोठ्या ७२९ पट्ट्यांवर अंकित केले गेले. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पट्टीला छोट्या पॅगोडात ठेवले गेले. ज्यांना ‘पिटक पॅगोडा’च्या नावाने विश्वातील सर्वांत मोठ्या पुस्तकाच्या रूपाने जाणले जाते. हे पिटक पॅगोडे मांडेल पहाड्याच्या उतारावर बनलेले आहेत़ हे साहित्य नंतर २१ खंडांत छापले गेले.

 #आषाढ पौर्णिमा  #वर्षावास 

0 comments: