Thursday, 28 September 2023

आमच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच आम्ही जाणार



धर्मांतर करतांना बाबसाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञा पूर्वाश्रमीच्या महार समाजाला दिल्या. बाबासाहेबांना हे ज्ञात असावे की, आपण ज्या नरकातून या समाजाला बाहेर काढले आहे. त्याच मार्गाला काही नमुने परत जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणून बाबासाहेबांनी मुस्लिम, ख्रिश्चन अथवा इतर धर्माचा २२ प्रतिज्ञांमध्ये कोठेही उल्लेख केलेला आढळत नाही. धर्मांतराला आता जवळपास ६६-६७ वर्षे इतका कालावधी उलटून गेला आहे.


या ६६-६७ वर्षात देखील अगदी मूलभूत प्रबोधन ज्या नमुन्यांचे झाले नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे. प्रबोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे जरी मान्य केलं तरी; ज्यांना गुलामीचे साखळदंड हे सौंदर्य अभूषणे वाटावीत? इतका उच्च प्रतीचे गाढवंपण कुठून शिकतात हे लोक? अशांना कात्रजचा घाट दाखवलेले उत्तम.


प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणाचा सामाजिक बहिष्कार करणे हे कायद्याचा चौकटीत उचित ठरणार नाही. मात्र ज्यांनी हजारो वर्षे जातीच्या नावावर शोषण केलं त्यांनी हा उपदेश देऊ नये. 


बहुसंख्य समाजाचे अनुकरण, लागूनचालन हे जगभरात सुरू असते. अशावेळी अल्पसंख्याक समाज हा सर्व स्तरावर सुदृढ व सशक्त नसेल तर तो शरणागती पत्करतो. शरणागती न स्वीकारणारे शिकार देखील होऊ शकतात. शरणागती पत्करणारे देखील दुय्यम स्थान अथवा गुलामी स्वीकारतात.


भारतात बहुसंख्य समाज हा आक्रमक, अनधिकृत, अतिक्रमण व बुद्धिभेद करत असतांना असे घरभेदी पालखीचे भोई नसलेलेच बरे. असे घरभेदी केवळ गणपती बसवणारेच आहेत असे नाही. तर जेजे म्हणून आंबेडकरी विचारांना सामाजिक, राजकीय, धार्मिक ठिकाणी स्वतःचे गल्ले भरण्यासाठी वापरतात; व चळवळ सरंजामी सनातन्यांच्या दावणीला बांधतात. ते सगळे सारखेच कृतघ्न आहेत.


सामाजिक व राजकीय मंचावर सामाजिक सौदाऱ्याची भुमीका घेणे मी समजु शकतो; परंतु नको ते थोतांड घरात आणणे. त्या धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक दहशतवादी संघटनेचा भाग बनणे म्हणजेच पालखीचे भोई बनणे होय.


आपली कार्यशक्ती ही केवळ प्रतिक्रियावादी होण्यात अथवा पालखीच्या भोईंना सुधारण्यात घालवणे मला उचीत वाटतं नाही. जे सोबत आहेत त्यांना नवं निर्माणासाठी व आपल्या ध्येय उशिष्टांना पूर्ण करण्यासाठी ही शक्ती वापरावी या मताचा मी आहे. आपली स्वतःची शक्ती व उपद्रवमूल्य सिद्ध केल्याखेरीज चळवळ फोफावणार नाही.

0 comments: