भारताच्या राष्ट्रीयत्वाची व राष्ट्रवादाची जी परिकल्पना स्पृश्य हिंदू नेत्यांनी बनवली होती, तिला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील महाड सत्याग्रहाने छेद देत भारताच्या राष्ट्रवादाला वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई सर्वसमावेशक असली पाहिजे,आणि ती जर सर्वसमावेशक नसेल तर ती स्वातंत्र्याची नव्हे तर फक्त विशेष अधिकारांची लढाई ठरेल; बाकी सगळं केवळ सोंग ठरेल. बाबासाहेबांचा विरोध ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला नव्हता, तर अशा खोट्या स्वरूपांच्या लढायांना होता. हा नैतिक फरक जात-आंधळ्या इतिहासकारांना व संशोधक अभ्यासकांना लक्षात आला नाही.
गांधी प्रणित दांडी यात्रा जशी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते, तिच्यावर चर्चा होते तशीच महाड सत्याग्रहावर मात्र चर्चा होत नाही, किंवा त्याकडे सम्यक दृष्टीने पाहिले जात नाही. अस्पृश्यांच्या गावकुसा बाहेरील वस्त्यांप्रमाणेच अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील इतिहासालाही कोपऱ्यात ठेवून दुर्लक्षित करण्याचा सूडबुद्धीने केलेला हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक बोज्जा थारकम यांनी या विषयाकडे नेमके लक्ष वेधले आहे.
एक महाड आणि एक दांडी
या दोन घटनांमध्ये किंवा चळवळींमध्ये सारखेपणा कदाचित आढळूनही शकतो पण त्यांच्यात जशास तसे समांतर तुलना मात्र होऊ शकत नाही. ब्रिटिश राजवट गांधींना शाप वाटत असेल तर हिंदू राजवट अस्पृश्यांसाठी शापापेक्षा भयंकर होती.ती एक अनिष्ट,निंदनीय गोष्ट असे तसेच अखिल मानवते विरूद्ध गुन्हा होता.
मुंबई विधिमंडळात 1923 मध्ये एस.के.बोले यांनी मांडलेला ठराव मंजूर करून महाड नगरपालिकेने 1926 मध्ये काही दुरुस्त करून त्याला मंजुरी दिली आणि अस्पृश्यांसाठी चवदार तळे खुले केले. तथापि नगरपालिकेचा ठराव हा केवळ कागदी ठरावच राहिला. तथाकथित उच्च वर्णियांच्या हिंसेच्या भीतीने अस्पृश्यांना त्यांचा हक्क बजावता आला नाही.
महाडचा सत्याग्रह 19 / 20 मार्च,1927 रोजी सुरू झाला आणि 25 डिसेंबर 1927 रोजी (मनुस्मृती दहन) पर्यंत तो जारी होता. तरीही आणखी १० वर्षे त्याची कायदेशीर लढाई सुरूच होती. तर दांडी यात्रा 12 मार्च 1930 मध्ये सुरू झाली आणि 05 एप्रिल 1930 रोजी 25 दिवसात समाप्त झाली. दांडी ही शांततापूर्ण पदयात्रा होती. तेथे कोणाला अटक नव्हती,हिंसाचार नव्हता,मोर्चेकरी हल्याने रक्तबंबाळ नव्हते, खटले, भुकेलेले,अनवाणी,अस्पृश्य स्त्रिय-लेकर व असे लोक नव्हते. दांडी हा पूर्णपणे पटेलांच्या नियोजनात अनुकूल परिस्थितीत अंमलात आला तर त्याच्या अगदी उलट प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाड सत्याग्रह झाला. असं जरी असला तरी दांडी पदयात्राचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी भरभरून कौतुक केले. मात्र महाड सत्याग्रहावर लेख, पुस्तक, ग्रंथ किंवा साहित्य वर्तुळात किमान एक दोन ओळी देखील फार खरडल्या गेल्या नाहीत. पत्रकारांनी त्याची फार दखल देखील घेतली नाही.
सदर पुस्तकातून या दोहोंमधील नैतिक, सामाजिक-राजकीय, आर्थिक स्वरूप मांडले आहे.शीर्ष नेतृत्वाची हाताळण्याची पद्धती देखील मांडली आहे.

0 comments: