
————————————
बौद्ध धम्म हा रूढ अर्थाने धर्म नसून ते तत्त्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान शिकवण्याची बौद्ध धम्म ही एक शिक्षण पद्धती आहे. स्वतः भगवान गौतम बुद्ध वयाची ४५ वर्ष चारिका करून धम्म सांगतात, धम्म शिकवतात. स्वतः तथागत भगवान बुद्ध एक आदर्श शिक्षक,गुरु आहेत. त्यांनी निर्माण केलेला संघ ज्याला आदर्श शिक्षण दिले जात होते. व तो संघ जगभरात बौद्धतत्त्वज्ञानाची शिकवण सद्धधम्माची शिकवण, शिक्षण देत होता. या धम्म आणि संघापासून निर्माण झालेली विहारे, लेण्या हे बौद्ध शिक्षणाचे शैक्षणिक स्थान होते.
बौद्ध धम्माचा हेतूच या जगाची पुनर्रचना करणे हा आहे. त्यासाठी धम्मात माणसाच्या मनाला योग्य वळण लावण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. बुद्ध धम्मात (प्रतुत्य समुत्पादात) सर्व दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान असे सांगितले आहे. माणसाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी त्याला योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात त्याची प्रगती होण्यासाठी त्यांनी आपले मन केंद्रित केले पाहिजे .कारण शीलवान मनुष्य आपले मन केंद्रित करू शकतो. जो मनुष्य शीलवान नाही; तो आपले मन केंद्रित करू शकत नाही. त्याचे मन इकडे तिकडे भटकत राहते म्हणून खरंतर बौद्ध धम्मात मनाच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नीतिमत्ता, मनाची एकाग्रता आणि यथाभूत ज्ञान आलेले शहाणपण म्हणजेच शील,समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांनी दाखवल्या मार्गाच्या पायऱ्या शिकविल्या जातात.
तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण्याची एक पद्धती होती. ते त्यांना जो सांगावयाचा मुद्दा आहे. त्याचे पूर्ण विश्लेषण करून सांगत. त्या मुद्द्याचे बारीक-सारीक अंग प्रत्यांग सांगितले जायचे. आपला मुद्दा पटवून देताना भगवान बुद्ध उपमा, उत्पेक्षा रूपक यांचा वारंवार उपयोग करीत असत. प्रामुख्याने दररोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या उदाहरणांचा दाखला दिला जात असे. तथागत प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत असत. चर्चेतून त्या मुद्द्याला अधिक स्पष्ट करून सांगावयाला ते लावत असत. जर त्यांना तो मुद्दा आवडला नाही तर त्याबद्दल ते विरोधी पक्षाची हेटाळणी करत नसत. तर ते विरोधी पक्षाला प्रश्न विचारून अधिक गोंधळात पाडत असत. त्या प्रतिप्रश्नांमुळे विरोधी पक्षाला मिथ्या धारणांची जाणीव करून देत असत. किंबहुना त्याच्याकडून त्या मिथ्या धारणेबद्दल वदवून घेत असत. अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांची अनेक उदाहरणे सुत्त पिटक, विनयपिटकात जागोजागी पाहावयास मिळतात.
तथागत भगवान गौतम बुद्ध चर्चा करतांना प्रवचन देतांना अथवा वादविवाद करतांना आपल्या विद्यार्थ्यांची, श्रोता वर्गाची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पातळीवर बोलत असत. भगवान बुद्धांनी केवळ मौखिक ज्ञानाला महत्त्व दिले नाही. तर आचरणत्मक ज्ञानाला त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले.
भगवान गौतम बुद्धांची शिकविण्याची आणखीन एक अनोखी पद्धत होती. ते शोध घेऊन स्वतः शिकणे या पद्धतीचा उपयोग देखील करत. किसा गौतमीचे उदाहरण आपण पाहू शकता. किसा गौतमीला शोध घेऊन आणि स्वतः शिकण्यास बोध घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले.
आकृती काढून किंवा चित्ररूपात विषय समजावून घेण्याची पद्धती भगवान बुद्धांच्या काळात अस्तित्वात आली. दिव्यवनात महामोग्घलायन प्रत्युत्य समुत्प्पाद शिकविताना बारा निदान (कड्या)असल्याची आकृती काढून शिकविले आहे.
शिकण्याविषयी आणि शिकविण्या विषयाची भगवान बुद्धांची मते महत्त्वाचे आहेत. सिगाल सुत्तात
भगवान बुद्धांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य सांगितले आहेत.
भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या मोठ्या प्रदेशातील लोकांना धम्म शिकवण्यासाठी लोकांत जाऊन त्यांच्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रशिक्षित शिक्षक हवेत. त्यांनी त्यासाठी त्या शिक्षकांचा एक संघ त्यांनी स्थापन केला. त्या संघाचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी विनयाचे नियम बनविले.
बुद्धांनी पहिल्यांदा साठ भिक्खूंना प्रशिक्षित केले. प्रशिक्षित केलेल्या त्या भिक्खूंना बहुजनांत जाऊन धम्म शिकवण्यास सांगितले.
“धम्म साकच्छा” म्हणजे धम्म विषयक चर्चा करणे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मतत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणे, मूल्यमापन करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे एक देखील संघाचे महत्त्वाचे बौद्धिक कार्य होते. या “धम्म साकच्छा” मुळे अभिधम्मपिटकासारखे त्रिपीटकातील ग्रंथ निर्माण झाले. धम्म साकच्छा चे ठळक उदाहरण म्हणजे “मिलिंद प्रश्न” मिलिंद पन्नास भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद यांची धम्मावर झालेली चर्चा होय.
बौद्ध धम्माच्या शिक्षण पद्धतीतूनच पुढे नालंदा,विक्रमशीला,तक्षशिला,ओदांतपुरी, घोसरावा, सोमपुरी,जगद्दल इत्यादी उत्तर भारतातील आणि वल्लभी, अमरावती, कान्हेरी, अजंठा, नागार्जुनकोंडा, कांची इत्यादी दक्षिण भारतातील विश्वविद्यालय निर्माण झाली.
भारतातील सर्वधर्मांची तुलना करता असे दिसून येते की,
बौद्धांनी सर्वात प्रथम साक्षरतेचे महत्व जाणले इसवी सन पूर्व 84 साली बौद्धांनी सर्व त्रिपिटक लीपीबद्ध केले. छांद किंवा छांदस ही त्यावेळीची वैदिक भाषा होती. संस्कृत भाषा ही भगवान बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी पालीचे भाषांतर संस्कार करून बनवली म्हणून त्या भाषेला संस्कृत असे म्हणतात.
भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माच्या आणि जैन, लोकायत वगैरे इतर धर्मांच्या विरोधाला बौद्धांना तोंड द्यावे लागले. प्रतिस्पर्तांशी वादविवाद करण्यासाठी लागणारे कौशल्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धकावर मात करण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात बदल होऊन धम्माशी प्रत्यक्ष संबंध नसलेले औषधोपचार शास्त्र, खगोलशास्त्र,गणित इत्यादी लौकिक विषय सुद्धा बौद्ध शिक्षणातून शिकवले जाऊ लागले. बुद्धांनी भिक्खूंना तिथीचा जाणकार होण्यास सांगितल आहे.
बौद्ध समाजाचे मुख्य दोन विभाग आहेत. एक “संघ” आणि दुसरा “उपासक” संघ हा पुरुष व महिला भिक्खू संघाचा मिळून बनलेला असतो. हा भिक्खू संघ त्यांच्या ठाई असणाऱ्या शिक्षण, ज्ञानामुळे होय.
