Saturday, 20 September 2025

परिवर्तन


 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर बाबासाहेबांनी दिल आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा आणि पंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बुद्धीला पटला. तो धम्म, ते विचार त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे विचारांच आपलं एक महत्त्व आहे. यात काही शंका नाही. 


परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी जो धम्म या देशाचा प्रमुख जीवन मार्ग होता. तो धम्म या भूमीवरती संपुष्टात आला होता. अर्थात बाबासाहेबांनी जर त्याला  पुनर्जीवित केले नसते; तर भारतात बौद्ध धम्म पुन्हा गतिमान झाला असता का? तर याचे उत्तर नाही असे मिळते. 


त्यामुळे सदर दोन मुद्द्यातून हे स्पष्ट होते विचार चांगले असले की ते कालातीत असतात. परंतु असे असले तरी त्या विचारांचे लोक,विचार प्रचार प्रसार व संरक्षण करणारे लोक जर नसतील; तर विचार कितीही चांगला असला तरी तो कायमचा संपुष्टात येऊ शकतो. हे बाबासाहेबांनी देखील म्हटले आहे.


त्यामुळे वरील मुद्द्यातून हे स्पष्ट होते की विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही मिळाले तरच तो टिकतो. आजच्या भाषेत राजकीय पाठबळ असेल तरच अधिक विस्तृत होतो.


उदाहरण दाखल आपण बुद्धांकडे वळूया. बुद्ध हे राजपुत्र होते. बुद्ध हे अडीच हजार वर्षांपूर्वी राजपुत्र होते आणि साधेसुधे राजपुत्र नसून सुखाच्या पायघड्या त्यांच्या पायाशी लोळण घालत होत्या असे अत्यंत विलासित जीवन ते व्यतीत करत होते. आता विचार करा अडीच हजार वर्षांपूर्वी असा सुंदर आणि श्रीमंत राजपुत्र जर गृहत्याग करत असेल तर त्याचा परिणाम  इतर जनमानसात व राज संबंधात सर्व दूर पोहोचल्यानंतर त्याचे ऐतिहासिक परिणाम होणार नाहीत का? मला येथे सांगायचं आहे की बुद्ध हे राजपुत्र होते.  सत्तेशी- शक्तीशी जवळचे असल्यामुळे जनमानसावरती ऐतिहासिक प्रभाव टाकणे व पडणे साहजिक होते. त्या काळात अहिंसा,शांतता प्रिय इतरही धर्म, पंथ ,विचार व प्रचारक होते. अडीच हजार वर्षांपूर्वी गृहत्याग करून अंतिम सत्य शोधण्यासाठी न जाणो कित्येक जीव डोंगरदर्या खोऱ्यात फिरत होते. बुद्धांच वेगळ पण त्यांच्या सामान्यजनापासून वेगळ असण्यात आहे. त्यांच्या राजपुत्र असण्यात आहे. हे मला येथे नमूद करावयाच आहे. विचार करा जर बौद्ध धम्माला राजश्रय प्राप्त झाला नसता. तर त्याला लोकश्रय प्राप्त झाला असता का? देशा परदेशात धम्म पोहोचु शकला असता काय?


अजून उदाहरण पाहू. लक्षात घ्या बुद्ध राजपुत्र होते. महात्मा फुले हे एक श्रीमंत आजच्या भाषेत बिल्डर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्या काळात मिलिटरी मध्ये शिक्षक होते. जेव्हा दलितांना शिक्षणाचा गंध देखील नव्हता. तेव्हा बाबासाहेब या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्या घेत होते. बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा दस्तूरखुद्द केळुस्कर गुरुजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजश्रय त्यांना लाभला आहे. सयाजीराव गायकवाड यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. लक्षात घ्या बाबासाहेब ब्रिटिश राजवटीत देखील प्रबळ नेता व मंत्री होते. गांधींच्या व काँग्रेसच्या काळात देखील ते संविधानाचे निर्माते व मंत्री होते. सत्ता आणि शक्ती बाबासाहेबांचा हातात असल्यामुळे अनेक धाडसी निर्णय व कार्य ते करू शकले. ही सत्तेची किमया बाबासाहेब भलीभाती जाणत होते.


मला येथे हे सांगायचं आहे की ही चळवळ चालवण्यासाठी राजश्रय व लोकश्रय खूप महत्त्वाचा असतो. शक्तीचे स्त्रोत तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही विधायक काम करू शकत नाहीत. सम्राट अशोक जर राजा नसते तर ते इतके शिलालेख व धम्मकार्य निर्माण करू शकले असते काय? ते शिलालेख लिहिणाऱ्या किती सामान्य कारागिरांची नावे आपल्याला ज्ञात आहेत? त्यामुळे सत्ता नेहमी महत्त्व ठेवून असते.


मार्क्सवादाचे उदाहरण घेऊ. कार्ल मार्क्स हयात असताना मार्क्सवाद किती फोफावला? आणि त्यानंतर लेनिन जेव्हा सत्तेत आला त्यानंतर मार्क्सवादाचे स्वरूप आणि आवाका किती मोठा होता हे आपण नजरेआड करून चालणार नाही.


आता वर्तमानाकडे येऊ या. भारतातील जेवढे काय म्हणून अब्जाधीश श्रीमंत लोक आहेत ते आपसूकच जातीने सवर्ण वर्गातून कसे येतात? संख्येने केवळ तीन ते पाच टक्के असणारे हे लोक भारतीय अब्जाधीशांच्या यादीत 90 ते 95 टक्के जागा व्यापून आहेत. हा केवळ योगायोग नाही. जगभरात देखील स्थिती काही फार वेगळी नाही. जगभरातील 90% साधन संपत्ती ही केवळ तीन ते पाच टक्के लोकांकडे आहे. आणि तरीही सर्व काही अलबेल सब चंगा सुरू आहे.


या देशातील जेलमध्ये जाणारे लोक बेल न मिळाल्याने जेलमध्ये कोंबलेले लोक कोणत्या वर्णाचे व कोणत्या वर्गाचे आहेत? हे गुपित सत्य आहे.


या देशातील सर्वोच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील जज कोण आहेत. या देशातील निरनिराळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री, व्यापार, सोने-चांदीचे, हिरे व्यापार, शेकडो एकर जमिनीचे मालक कोण आहेत हे उघड सत्य आहे.


ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चौकसी, विजय मल्या, जतिन मेहता या सर्वांची जातकुळी कोणती? 

एका ठराविक वर्गाच्या हातात येथील व्यवस्था राहिली आहे. नीरा रडिया टेप केस यांची साठ गाठ उघडी पाडते. 


देशातील गरीब जनतेला मग डुकरांना कोंबावे व खाणे द्यावे तशी स्थिती आहे. ८० कोटी लोकांना अल्पदरात (निकृष्ट) धान्य दिले जाते. लाडकी बहीण, भाऊ योजना दिली जाते. मूळ समस्यांवर बगल देऊन. धर्मांधतेची फोडणी दिली जाते.


हे सगळे बदलण्यासाठी व विधायक रित्या परिवर्तन करण्यासाठी बहुसंख्य बहुजनांने आर्थिक सत्तेचे, राजकीय सत्तेचे महत्व समजून घेतले पाहिजे व त्या अनुषंघाने नियोजन केले पाहिजे इतकंच.

Sunday, 31 August 2025

तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का?

 



तुमचा पुरोगाम्यांवर विश्वास नाही. का? त्यांनी असे काय करावे ज्यामुळे विश्वासार्हता येईल?

सदर प्रश्नावर माझे उत्तर मी येथे देत आहे.

———-

भारत स्वातंत्र्य झाला. परकीय उच्चभ्रू इंग्रजांकडून भारतीय उच्चभ्रू नेत्यांकडे शक्तीचे हस्तांतरण करण्यात आले. ते आजतागायत राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर टिकून आहे. त्यामुळे लोकशाही हि जरी "एकमत म्हणजे एक मूल्य" असे कागदोपत्री सांगत असली तरी; हि बहुसंख्य प्रतिनिधित्व लोकशाही आहे. तुमच्या मताला येथे केराची टोपली दाखवली जाते हि वास्तविकता आहे. अनुपाती प्रतिनिधित्व (Proportional Representation) देणारी निवडणूक पद्धती असती तर आपल्याला तसे म्हणत आले नसते. स्वातंत्र्यानंतरही अशी व याहून विदारक स्थिती असल्या कारणाने येथील बुद्धिजीवीवर्ग काय करतोय हे पाहणे क्रमप्राप्त होते .


पुरोगामीवर्ग हा भारतीय बुद्धीजीवी वर्ग आहे आणि तो उच्चभ्रू देखील आहे. तो खरंच बुद्धिजीवी आहे का तो विषय निराळा. असो.  तरीही अशी एक साधारण मान्यता आहे. जनसामान्य नेहमी या उच्चभ्रू / बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे या वर्गावर आपसूकच अधिकची नैतिक जबाबदारी येते. पुरोगामी हे आंबेडकरी चळवळीचे उघड मित्र आहेत? बाबासाहेबांमुळे जसे गांधीजी बदलत व अधिक वृद्धिंगत होत गेले. असे पुरोगामी म्हणतात. तसे पुरोगम्यांनी देखील आंबेडकरवाद्यांकडून शिकावे व अधिक व्यापक व मूळ भूमिकेवर यावे असे माझे मला वाटते. 


त्यामुळे तत्सम बुद्धीजीवी वर्गाने केवळ आंबेडकरी विचारमंचावर, आंबेडकर नगरात, आंबेडकरी जनतेला बुद्ध आणि बाबासाहेब भाषणातून सांगण्याची तितकीशी गरज उरली नाही. त्या उलट इतर मोठमोठ्या वस्तीत, सण-उत्सवात प्रामुख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करावेत.ज्यांच्यावर अन्याय झालाय व ज्यांनी बौद्धधम्म व आंबेडकरवाद स्वीकारलाय अशा शोषितांनाच भाषणं देण्यात काय हाशील ? शोषितांचे नेतृत्व हडपण्याची ही कला असू शकते फार तर. जे अन्याय करतात आणि जे शोषक आहेत त्यांचे परिवर्तन पुरोगाम्यानी करावे. ते खरे कार्य होईल.


आंबेडकर वादाचा अभ्यास व अनुभव आंबेडकरवाद्यांना जास्त आहे. आंबेडकरी विचारवंत केवळ एट्रोसिटी व समाजकल्याण विभाग यापुर्ती सीमित नाहीत. त्यामुळे पुरोगाम्यांनी आंबेडकरी नेत्यांना व विचारवंतांना त्यासाठी पाचारण करावे. यासाठी त्यांनी श्रीधर टिळकांचा आदर्श घ्यावा.


या पुरोगामी / बुद्धीजीवी मंडळीने श्रीधर टिळकांच्या प्रमाणे SSD स्थापन करावी. नुसते भाषण न देता कृतीतून रिपब्लिकन, वंचित सारख्या पक्षात प्रवेश करावा. धर्मांतर करून बौद्ध व्हावे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा. बाबासाहेब स्वीकारताना संविधानिक बाबासाहेब, राजकीय बाबासाहेब व धार्मिक बाबासाहेब असे वेगवेगळे व सोईस्कर बाबासाहेब न स्वीकारता समग्र बाबासाहेब स्वीकारावेत. भाषणात बाबासाहेबानी १९५६ धम्मक्रांती केली सांगायची आणि व्यक्तिगत जीवनात अंगीकार नाही करायचा. हा मुखवटेबाजपणा नव्हे काय? बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, लोकशाही सामाजिक समतेशिवाय चालू शकत नाही.


स्कॉलरशिप, आरक्षण, एट्रोसिटी, बैकलॉग भरणा, जल-जमीन-जंगल समान वाटप, झोपडपट्टी बचाव यासाठी मोर्चात यावे. मोर्चात येऊन, नेते न बनता. कार्यकर्ता बनावे. शाहू महाराजांकडून हे गुण त्यांनी शिकावेत. 

पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही छावण्यात नेतृत्व उच्चवर्णीय असेल तर झाले कल्याण. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीने खोट्या पुरोगामी, बुद्धिजीवी लोकांपासून अंतर ठेवावे, यामागे काही मूलभूत वैचारिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत. 


वैचारिक भिन्नता:

आंबेडकरवादी चळवळ ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित आहे, जी प्रामुख्याने जातीव्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी लढते. पुरोगामी विचारसरणी, जरी ती सामाजिक बदल आणि समानतेची भाषा बोलत असली, तरी बऱ्याचदा ती उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून येते. यामुळे ती जातीच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात किंवा त्यावर ठोस उपाययोजना करण्यात कमी पडते. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, कारण ती प्रत्यक्षात जातीच्या मुद्द्यांना टाळते किंवा त्यांचे गांभीर्य कमी करते.


त्यांचे लक्ष प्रामुख्याने आर्थिक विषमता, धर्मनिरपेक्षता किंवा इतर व्यापक मुद्द्यांवर असते. याउलट, आंबेडकरवादी चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू आहे जातीचा प्रश्न आणि त्यामुळे होणारा सामाजिक भेदभाव आहे. 


सांस्कृतिक आणि ऐतिहासिक फरक:

पुरोगामी विचारसरणी बऱ्याचदा हिंदू धर्मातील सुधारणांवर आधारित असते, ज्यामध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार काही प्रमाणात असतो. याउलट, आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि त्याच्या मूळ संरचनेला नाकारले आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळ हिंदू संस्कृतीच्या सुधारणांपेक्षा संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनावर भर देते. पुरोगामी लोकांचा हिंदू संस्कृतीशी असलेला संबंध आंबेडकरवादी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. 


राजकीय स्वार्थ आणि वापर:

बऱ्याचदा पुरोगामी गट किंवा राजकीय पक्ष आंबेडकरवादी चळवळीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करतात, पण दलित आणि शोषित समाजाच्या खऱ्या समस्यांना प्राधान्य देत नाहीत. उदाहरणार्थ, काही राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांचा खरा अंमल करताना दिसत नाहीत. अन्याय अत्याचाराच्या शेकडो घटना या काळात घडल्या आहेत. त्यावेळी पुरोगामी भाषणबाज लोक मुग गिळतात.  न्याय मिळत नाही. खैरलांजी, सोनाई, शिर्डी, जवखेडा, नितीन आगे, लातूर, बुलढाणा शेकडो प्रकरणात न्याय नाही. ७००० प्रकरण प्रलंबित आहेत. याउप्पर बावडा, वरळी दंगल, बीडीडी चाळ, नामांतर, पँथरवर केसेस, हिंदू कोड बील प्रकरण असे अनेक ठळक हल्ले झालेत ज्यात वेळेवर न्याय नाही.

मंडल कमिशन असेल,आरक्षणचा बॅकलॉक असेल, शिष्यवृत्ती कपात असे अनेक विषय आहेत. ज्यांत  न्यायसंगत भूमिका नाही किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रकार आहेत. 

 

पुरोगामी राजकीयसत्ता बदलाची भाषा व अवाहन करत असतात. परंतु सत्ता असताना ते अपेक्षित कार्य करत नाहीत. राजकीय सत्ताबदल हे कागदोपत्री होत असतात. त्याउप्पर सांस्कृतिक सत्ताबदल हा मोठा, स्थायी व करण्यास अवघड असतो. पुरोगामी प्रतिगाम्यांसोबत साटेलोटे असल्यासारखे उगी मलमपट्टी करत बसतात. समग्र परिवर्तन करण्यासाठी व खरा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल करण्याची प्रामाणिक धमक दाखवत नाही.


स्वायत्ततेची गरज:

अल्पसंख्यांकांना जगभरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वायत्ततेची गरज लागते.

आंबेडकरवादी चळवळीने आपली स्वायत्तता आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ती आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. पुरोगामी गटांशी खूप जवळीक ठेवल्यास चळवळीचे मूळ उद्दिष्ट, म्हणजे दलित आणि शोषित समाजाचे सक्षमीकरण, धोक्यात येऊ शकते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनसारख्या स्वतंत्र संस्था स्थापन करून ही स्वायत्तता दाखवली होती.

Thursday, 19 June 2025

भांडा सौख्यभरे

 



नातं कोणतही असो मित्र-मैत्रिणीच, पती-पत्नीच, भावा- भावच, बाप-लेकाच अथवा दुसरे कोणत. नात्यात कायम गोडी गुलाबीचे दिवस असत नाहीत. असले तर त्या नात्यात कुणीतरी एक वरचढ अथवा एडजस्टमेंट करत असतो. भांडण अथवा चर्चा ही अनेकदा दोन स्पर्धकांमध्ये होत असते. बॉस आणि कर्मचारी यांत ऑर्डर्स दिल्या व पाळल्या जातात. तेथे भांडण उद्दभवत नाही. झालीच तर धुसफूस होते. कारण भांडण करण्यासाठी बोलण्याचं व मत मांडण्याचे स्वातंत्र्य असणे ही पूर्वअट असते. नात्यात भांडण होत नसेल तर शक्यता आहे की, ते दिखावू असेल. कारण म्हणतात ना शेंदूर खर्वडल्याशिवाय देव की दगड हे कळत नसत.


भांडणाने अनेकदा मुद्याची चिकित्सा,समीक्षा होते. त्या मुद्याचे निरनिराळे कांगोर समोर आणले जातात. माझा मुद्दा किंवा माझे मत कसे बरोबर आहे हे पटवण्यासाठी अनेक अंगाने विचार मांडले जातात. समरूप उदाहरण दिली जातात. तुमच्या ज्ञानाची, अनुभवाची, भाषेची, व्यक्तिमत्वाची, आकलनाची, पटवण्याच्या क्षमतेची तेथे कसोटी लागते.


तुमचा मुद्दा पटवून देताना तुम्ही कसली मदत घेता त्यावरून तुमची स्व:ची ओळख समजत असते. तुम्ही तत्वद्यानाची व वैचारिक भिस्त लढवता? शिव्या श्राप व हिंसक भाषेवर उतरता? हात पाय चालवून बळाचा वापर करता? हे सगळं तुमच्या आतील माणसावर, कळत नकळत घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते.



अनेकदा आपण कशासाठी कुणासाठी व कुणासोबत भांडत आहोत हेच अनेक लोक विसरून जातात व भांडण हा मुद्दा बनतो. मुद्यावर भांडण राहत नाही. त्यातून काय मिळणार याचा विचार बाजूला पडून काय बरोबर या पेक्षा मी बरोबर यावर लोक भांडत बसतात. या अहंकार व मी पणाच्या भांडणाला अंत राहत नाही. त्यामुळे मूर्खांशी भांडण देखील करू नये असे म्हणतात ते उगीच नाही.


तुमच्या जिवनात तुमच जिवन समृद्ध करणारे भांडखोर लोक आहेत की कायम मानसिक उच्छाद मांडणारे लोक आहेत यावर खूप काही निर्भर करते.


कॉन्फिडेंट असणारे अनेक लोक मला मूर्ख, श्रीमंत असणारे सरंजामी व भांडणारे स्पष्टोक्ते वाटतात.

Sunday, 18 May 2025

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०३

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०३

 


————————————

बौद्ध धम्म हा रूढ अर्थाने धर्म नसून ते तत्त्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान शिकवण्याची बौद्ध धम्म ही एक शिक्षण पद्धती आहे. स्वतः भगवान गौतम बुद्ध वयाची ४५ वर्ष चारिका करून धम्म सांगतात, धम्म शिकवतात. स्वतः तथागत भगवान बुद्ध एक आदर्श शिक्षक,गुरु आहेत. त्यांनी निर्माण केलेला संघ ज्याला आदर्श शिक्षण दिले जात होते. व तो संघ जगभरात बौद्धतत्त्वज्ञानाची शिकवण सद्धधम्माची शिकवण, शिक्षण देत होता. या धम्म आणि संघापासून निर्माण झालेली विहारे, लेण्या हे बौद्ध शिक्षणाचे शैक्षणिक स्थान होते. 


बौद्ध धम्माचा हेतूच या जगाची पुनर्रचना करणे हा आहे. त्यासाठी धम्मात माणसाच्या मनाला योग्य वळण लावण्यावर सर्वाधिक भर दिला गेला आहे. बुद्ध धम्मात (प्रतुत्य समुत्पादात) सर्व दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान असे सांगितले आहे. माणसाचे अज्ञान नष्ट करण्यासाठी त्याला योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात त्याची प्रगती होण्यासाठी त्यांनी आपले मन केंद्रित केले पाहिजे .कारण शीलवान मनुष्य आपले मन केंद्रित करू शकतो. जो मनुष्य शीलवान नाही; तो आपले मन केंद्रित करू शकत नाही. त्याचे मन इकडे तिकडे भटकत राहते म्हणून खरंतर बौद्ध धम्मात मनाच्या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नीतिमत्ता, मनाची एकाग्रता आणि यथाभूत ज्ञान आलेले शहाणपण म्हणजेच शील,समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांनी दाखवल्या मार्गाच्या पायऱ्या शिकविल्या जातात. 


तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण्याची एक पद्धती होती. ते त्यांना जो सांगावयाचा मुद्दा आहे. त्याचे पूर्ण विश्लेषण करून सांगत. त्या मुद्द्याचे बारीक-सारीक अंग प्रत्यांग सांगितले जायचे. आपला मुद्दा पटवून देताना भगवान बुद्ध उपमा, उत्पेक्षा रूपक यांचा वारंवार उपयोग करीत असत. प्रामुख्याने दररोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या उदाहरणांचा दाखला दिला जात असे. तथागत प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत असत. चर्चेतून त्या मुद्द्याला अधिक स्पष्ट करून सांगावयाला ते लावत असत. जर त्यांना तो मुद्दा आवडला नाही तर त्याबद्दल ते विरोधी पक्षाची हेटाळणी करत नसत. तर ते विरोधी पक्षाला प्रश्न विचारून अधिक गोंधळात पाडत असत. त्या प्रतिप्रश्नांमुळे विरोधी पक्षाला मिथ्या धारणांची जाणीव करून देत असत. किंबहुना त्याच्याकडून त्या मिथ्या धारणेबद्दल वदवून घेत असत. अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांची अनेक उदाहरणे  सुत्त पिटक, विनयपिटकात जागोजागी पाहावयास मिळतात. 


तथागत भगवान गौतम बुद्ध चर्चा करतांना प्रवचन देतांना अथवा वादविवाद करतांना आपल्या विद्यार्थ्यांची, श्रोता वर्गाची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्याशी त्या पातळीवर बोलत असत. भगवान बुद्धांनी केवळ मौखिक ज्ञानाला महत्त्व दिले नाही. तर आचरणत्मक ज्ञानाला त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले. 


भगवान गौतम बुद्धांची शिकविण्याची आणखीन एक अनोखी पद्धत होती. ते शोध घेऊन स्वतः शिकणे या पद्धतीचा उपयोग देखील करत.  किसा गौतमीचे उदाहरण आपण पाहू शकता. किसा गौतमीला शोध घेऊन आणि स्वतः शिकण्यास बोध घेण्यास त्यांनी प्रवृत्त केले. 


आकृती काढून किंवा चित्ररूपात विषय समजावून घेण्याची पद्धती भगवान बुद्धांच्या काळात अस्तित्वात आली. दिव्यवनात महामोग्घलायन प्रत्युत्य समुत्प्पाद शिकविताना बारा निदान (कड्या)असल्याची आकृती काढून शिकविले आहे.


शिकण्याविषयी आणि शिकविण्या विषयाची भगवान बुद्धांची मते महत्त्वाचे आहेत. सिगाल सुत्तात 

भगवान बुद्धांनी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य सांगितले आहेत. 


भगवान बुद्धांनी लोकांना धम्म शिकवण्याचे ठरविल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या मोठ्या प्रदेशातील लोकांना धम्म शिकवण्यासाठी लोकांत जाऊन त्यांच्या भाषेत धम्म समजावून सांगणारे प्रशिक्षित शिक्षक हवेत. त्यांनी त्यासाठी त्या शिक्षकांचा एक संघ त्यांनी स्थापन केला. त्या संघाचे व्यवस्थापन नीट करण्यासाठी विनयाचे नियम बनविले.

बुद्धांनी पहिल्यांदा साठ भिक्खूंना प्रशिक्षित केले. प्रशिक्षित केलेल्या त्या भिक्खूंना बहुजनांत जाऊन धम्म शिकवण्यास सांगितले.


“धम्म साकच्छा” म्हणजे धम्म विषयक चर्चा करणे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या धम्मतत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करणे, मूल्यमापन करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे एक देखील संघाचे महत्त्वाचे बौद्धिक कार्य होते. या “धम्म साकच्छा” मुळे अभिधम्मपिटकासारखे त्रिपीटकातील ग्रंथ निर्माण झाले. धम्म साकच्छा चे ठळक उदाहरण म्हणजे “मिलिंद प्रश्न” मिलिंद पन्नास भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद यांची धम्मावर झालेली चर्चा होय.


बौद्ध धम्माच्या शिक्षण पद्धतीतूनच पुढे नालंदा,विक्रमशीला,तक्षशिला,ओदांतपुरी, घोसरावा, सोमपुरी,जगद्दल इत्यादी उत्तर भारतातील आणि वल्लभी, अमरावती, कान्हेरी, अजंठा, नागार्जुनकोंडा, कांची इत्यादी दक्षिण भारतातील विश्वविद्यालय निर्माण झाली. 


भारतातील सर्वधर्मांची तुलना करता असे दिसून येते की, 

बौद्धांनी सर्वात प्रथम साक्षरतेचे महत्व जाणले इसवी सन पूर्व 84  साली बौद्धांनी सर्व त्रिपिटक लीपीबद्ध केले. छांद किंवा छांदस ही त्यावेळीची वैदिक भाषा होती. संस्कृत भाषा ही भगवान बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी पालीचे भाषांतर संस्कार करून बनवली म्हणून त्या भाषेला संस्कृत असे म्हणतात.


भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माच्या आणि जैन, लोकायत वगैरे इतर धर्मांच्या विरोधाला बौद्धांना तोंड द्यावे लागले. प्रतिस्पर्तांशी वादविवाद करण्यासाठी लागणारे कौशल्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धकावर मात करण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात बदल होऊन धम्माशी प्रत्यक्ष संबंध नसलेले औषधोपचार शास्त्र,  खगोलशास्त्र,गणित इत्यादी लौकिक विषय सुद्धा बौद्ध शिक्षणातून शिकवले जाऊ लागले. बुद्धांनी भिक्खूंना तिथीचा जाणकार होण्यास सांगितल आहे.


बौद्ध समाजाचे मुख्य दोन विभाग आहेत. एक “संघ” आणि दुसरा “उपासक” संघ हा पुरुष व महिला भिक्खू संघाचा मिळून बनलेला असतो. हा भिक्खू संघ त्यांच्या ठाई असणाऱ्या शिक्षण, ज्ञानामुळे होय.

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०२

बुद्ध पोर्णिमा  (१२ मे, २०२५)    पोस्ट क्रमांक ०२

 



तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रामुख्याने चार आर्य सत्य सांगितले. 

१. जगात दुःख आहे.

२. दुःखाला कारण आहे. 

३. ⁠दुःख निरोध तृष्णेच्या नाशातून दुःख निरोध करता येतो.

४. ⁠दुःख निरोधगामीमार्ग 


दुःख निरोधगामी मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग.

१. सम्यक दृष्टी 

२. ⁠सम्यक संकल्प 

३. ⁠सम्यक वचन 

४. ⁠सम्यक कर्म 

५. ⁠सम्यक जीविका 

६. ⁠सम्यक प्रयत्न 

७. ⁠सम्यक स्मृती 

८. ⁠सम्यक समाधी 


गाडीच्या चाकाला बारा कड्या असतात तसे दुःखाला बारा निदाने,कारण वा हेतू असतात असे बुद्ध म्हणतात.


बौद्ध धर्मातील द्वादश निदान (१२ कड्या) म्हणजेच प्रतीत्यसमुत्पादाची साखळी पुढीलप्रमाणे आहे:

१. अविद्या (अज्ञान)

२. संस्कार – कर्म आणि मानसिक

३. विज्ञान – चेतना 

४. नामरूप – शरीर आणि मन

५. षडायतन – सहा इंद्रिये 

६. स्पर्श – इंद्रिय आणि विषय

७. वेदना – (आनंद, दुःख इत्यादी)

८. तृष्णा – इच्छा किंवा आसक्ती

९. उपादान – आसक्तीला ठेवणे हाव

१०. भव– (अस्तित्व)

११. जाति – जन्म

१२. जरामरण – वार्धक्य आणि मृत्यू


ही साखळी आहे. एका मेकावर ती अवलंबून असते. हे असले की ते होते. या कार्यकारणभावालाच बुद्ध प्रतीत्य (कारण) समुत्पाद (कार्य) म्हणतात. जर आपण अविद्या (अज्ञान) नष्ट केली, तर पुढचं सगळं साखळीतून आपोआप गळून पडतं – आणि त्यामुळे दुःखाची समाप्ती होते वा निर्वाणप्राप्ती होते!


बुद्ध सर्व वस्तुमात्र अनित्य वा क्षणिक असे मानतात. तेव्हा जे अनित्य वा क्षणिक नाही ते सत्य नाही असे ते सांगतात. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाला  क्षणिकवाद किंवा अनित्यवाद असे देखील म्हणतात.


संदर्भ: बुद्ध भिक्खू आनंद विशाखा- शरद पाटील

बुद्ध पोर्णिमा (१२ मे, २०२५) पोस्ट क्रमांक ०१


बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बहुसंख्य अस्पृश्यांना नागभूमीत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित व भारतीय संविधानाला पुरक अशा बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्यासोबतच धम्म आणि संविधान अशी दुतर्फा जिम्मेदारी देखील दिली. 


बाबासाहेबांच्या हयातीतच सन १९५६ साली ते सिलोन येथे गेले असता बौद्ध धम्मातील पूजा पाठ व गाथा त्यांनी संग्रहित व रेकॉर्ड करून घेतल्या होत्या.


बाबासाहेब म्हणाल्या प्रमाणे त्यांनी बायबल सदृश्य धम्म ग्रंथ १९५६ ला आपल्यासाठी लिहून देखील ठेवला. परंतु आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “दि बुद्धा अँड हिस धम्मा” या अप्रतिम ग्रंथाला वैश्विक पातळीवरील बौद्धांचा एक आदर्शभूत बायबल सारखा ग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकलो नाही आहोत. ही शोकांतिका म्हणावी लागेल.


धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या ५३ दिवसांत म्हणजे ०६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले. अर्थातच त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार व संस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही जबाबदारी अपसुकच ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या नवदीक्षित व शिक्षित उपासकांवर आली. 


या नवदीक्षित आणि शिक्षित आंबेडकरी समाजाला आपण स्वीकारलेल्या नवीन जीवन मार्गाच्या संपन्नते बाबत कुतूहल, निकड व ज्ञान जालसा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे चौफेर वैचारिक घुसळणीतुन अनेक धम्म संस्कार पुस्तकांपासून ते थेट पाली त्रिपीपटकापर्यंतच्या अनुवादापर्यंत अशा अनेक अप्रतिम व उत्तम ग्रंथ संपदा व साहित्य निर्मिती झाली. 


आचार्य राहुल संस्कृत्यायन लिखित “बुद्धचर्या”, पी.एल.नरसू लिखित “इसेन्स ऑफ बुद्धिझम”, पॉल कॅरोस लिखित “दि गॉस्पेल ऑफ बुद्धा”, रा.धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीलासार”, पंडित कोसंबी लिखित “बुद्ध धर्म आणि संघ”, वा.गो. आपटे यांचे “बौद्ध पर्व”, केळुस्कर गुरुजींचे लिखित “भगवान बुद्धांचे चरित्र”, आचार्य बुद्धघोष लिखित अठ्ठकथा तसेच भदंत कौसल्यायन लिखित असे नानाविध साहित्य संपदा उपलब्ध झाली. 


त्यानंतरच्या टप्प्यात अनेक विद्वानांनी वेळोवेळी लेखन केले आहे. जसे पँथर राजा ढाले सर संपादित “धम्म लिपी” अंक. डॉ. गंगाधर पानतावणे सर संपादित “अस्मितादर्श” मधील समीक्षात्मक लेख असतील. एडवोकेट विमल सूर्य चिमणकर सर “दी पीपल” या मासिकातून संपादित लेख असतील असे अनेक विद्वानांनी निर्लोप लिखाण केले.


पुढील काळात बहुजनवादी,मूलनिवासीवाद,शिवधर्म व गोयंका गुरुजींचे विपश्यना असे अनेक प्रयोग देखील येथे घडले. ते कितपत हितकारक अथवा अहितकारक त्यावर अनेकांनी आपली मते मांडलीच आहेत. राज ढाले, यशवंत मनोहर व तत्सम दोन्ही बाजूचे लिखाण झाले.


बाबासाहेबांनंतर नव दीक्षित आणि शिक्षित समाज आणि त्याची सामाजिक चळवळ याची वर्तमान स्थिती ही निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. काळजी करण्यासारखी जरी असली तरीही आंबेडकरी चळवळ संपलीआहे का? या बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. 


मात्र विविध महाविद्यालयातून विद्यापीठांमधून प्राध्यापक ,अभ्यासक, भिक्कू संघ, उपासक,साहित्यिक लेखक यांच्याकडून बौद्ध साहित्य,संस्कृती,लेणी, धम्माचे तत्त्वज्ञान व आंबेडकरवाद या सर्वांचा अभ्यास करून अधिक स्पष्ट नवसर्जन नवनिर्माण साहित्य, ग्रंथ निर्मिती व संस्थात्मक काम होणे अपेक्षित आहे.

बौद्ध पौर्णिमा

 



▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹  सुखद बुद्धांचा जन्म  🌹


सुखो बुद्धानं उप्पादो सुखा

सद्धम्मदेसना

सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो ।

      (धम्मपद-बुद्धवग्ग)


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


बौद्ध धम्मात पौर्णिमेला खूप महत्व आहे,. सर्व पौर्णिमा ह्या सणासारख्या साजऱ्या झाल्या पाहिजेत. बौद्ध व्यक्तिने विहारात /घरात  सफेद वस्त्र परिधान करून त्रिरत्नांना वंदन केले पाहिजे, वंदना म्हटल्या पाहिजेत व अनुसरण केले पाहीजे.


 पौर्णिमा साजरी कशी करावी.

१. सकाळी लवकर उठून आदर्शना वंदन करून, वंदना सुत्त पठन करावे.

२. ⁠पांढरे वस्त्र परिधान करावे.

३. ⁠खीरदान करावे. 

४. ⁠भिक्कूंना घरी आमंत्रित करून धम्मदेसना घ्यावी.

५. ⁠विहारात जावे.

६. ⁠दिवसभर उपोसथचे पालन करावे.


उपोसथ म्हणजे काय?


 उपोसथ  म्हणजे उपास-तापास करणे किंवा केवळ उपाशी राहणे नव्हे. उपोसथात धम्म जीवनाच्या आठ मूलभूत शीलांचे पालन करीत आपल्यातील  सत्यतेचा  शोध घेत राहावयाचे असते. त्यातून आपल्यातील गुणदोषाचे दर्शन घ्यायचे असते आणि त्या अनुभूतीतून दोषांचे निवारण करून गुणांचे संवर्धन करायचे असते. बाह्य जगातून घडणाऱ्या कुसंस्कारांना ओळखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो. उपासक-उपासिका म्हणून सांगितलेल्या आठ सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करायचा असतो.


१. "पाणातिपाता वेरमणी                 सिक्खापदं समादियामि"।

 २."अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि"।

३."अब्रह्मचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

४ " मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

५." सुरामेरयमज्जपमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

६ "विकालभोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।

७. नच्च- गीत-वादित-विसुक-दस्सना;माला गंध विलेपन-धारण-  मंडण-विभुसनठ्ठना वेरमणी, सिक्खापदं समादियामि"।

८. "उच्चायसन- महासयाना वेरमणी सिक्खापदं समादियामि"।


 याचा अर्थ असा:

१. प्राणी हिंसा न करण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

२. न  दिलेले न घेण्याचा शिकवणीचा मी स्वीकार करतो.

३. अब्रह्मचर्ये पासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

४. असत्य बोलण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

५. सुरा, मेरय, मद्य वगैरे प्रकारच्या मद्यपानापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

६. अकाली भोजन करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवण्याचा मी स्वीकार करतो.

७. नाचगाणे संगीत नाट्य तसेच हार-तुरे घालणे,गंध लावणे, श्रृंगार करणे, अलंकार घालणे, यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.

८ ऐषारामी गाद्या गिरदयांचा  वापर करण्यापासून अलिप्त राहण्याच्या शिकवणीचा मी स्वीकार करतो.


दुपारी १२ च्या आत जेवण ग्रहन करावे आणि त्या नंतर दिवसभर काही खाऊ नये त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अन्न ग्रहण करावे .अश्या रीतीने पंचशील, अष्टशील यांचे पालन करत उपोसथ ग्रहण करावे.


भवतु सब्ब मंगलम !!


तथागत भगवान गौतम बुद्धांच्या २५८७ व्या जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कुटुंब दिन

 


दमा, अस्थमा, मधुमेह असो की उच्चरक्तदाब या सारख्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक आहे. या आजाराने मृत्यू पावण्याचे देखील प्रमाण अधिक आहे. स्त्रियांच्या तुलनेत मानसिक आजार देखील पुरुषांमध्ये अधिक आहेत. साधारण आयुर्मान देखील स्त्रियांहून पुरुषांचे कमी आहे. अकाली वृद्धत्व पुरुषांमध्ये अधिक आहे. अपघाती मृत्यूत देखील पुरुष पुढे आहेत. आत्महत्या मग तो शेतकरी असो की नोकरदार त्यात देखील पुरुषांची संख्या जास्त आहे.


या सर्वांच प्रमुख कारण आहे. जबाबदारी… जबाबदारी मग ती कौटुंबिक, सामाजिक व पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेलीही असेल. या जबाबदाऱ्यांतून येणारा मानसिक- शारीरिक ताण. त्या जबाबदारी व बाजारी गरजा पूर्ण करण्यासाठी सतत घराबाहेर राहून केलेली ओढाताण. घराबाहेर राहून आहार-विहार यामुळे होणारे शारीरिक परिणाम . कुटुंबापासून आपसूकच वेळ व संपर्क नसल्यामुळे तुटल्यागेल्याची भावना व चिंता.


पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना परावलंबी, दीन व शोषित बनवले असेल तर पुरुषाला शोषक बनवून व्हिलन तर केलेच आहे. परंतु संस्कृतीच्या या काटेरी मुकुटात त्याचेही सामूहिक शोषण झाले आहे . त्यामध्ये त्याला यंत्रमानव बनवून त्याचेही माणूसपण हिरावून घेतले आहे. जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला सतत जुंपून ठेवण्याचे काम येथील सिस्टीमने केले आहे. एवढे करूनही त्याला सामाजिक- कौटुंबिक स्थैर्य, प्रेमभाव त्याच्या वाट्याला येईलच याची खात्री नसते. किंबहुना अनेकदा त्याला समाज कवी लेखक व कुटुंबीयही घराचा खांब, पाषाण हृदयी समजून तुसड्या सारखी वागणूक देतात. बापाची आणि क्रेडिटकार्डची गरजेपुरता आठवण.


पुरुष सतत ढाल बनून पुढे राहण्याच्या स्पर्धेत..तो आपसूक जन्मताच ढकलला जातो आणि आयुष्यभर ऊसाच्या त्या चरख्यात पिळून टाकला जातो.


त्याला थकायची, थांबायची आणि रडायची मुभा आणि उसंत नसते. कारण तो थकला की बिनकामी. तो थांबला तर रिकाम टेकडा. रडला तर बाईल्या होतो. 


स्त्रियांना झुकते माप देणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कायदे आहेत. पुरुषांनीच निर्माण केलेले हे पुरुषी जग आहे. जे शोषणावर व जीवघेण्या स्पर्धेवर चालते. या भांडवली युगाने स्त्रियांना देखील पुरुषी मानसिकता,वागणूक,अहंकार व संस्कार-सोपस्कार दिला आहे व केला आहे. इथल्या स्त्रीवादी चळवळी स्त्रियांना पुरुष बनवण्यात चळवळ मानतात तो वेगळाच विषय.

Tuesday, 7 January 2025

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर



०५ जानेवारीस नालंदा शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील मनोगत मांडले ते पुढील प्रमाणे.


बुद्धांनी वज्जींना केलेला संदेश आपणास ज्ञात आहे .


हत्तीस आवरी गवती दोर ।

मुंग्या हि सर्पासी करिती जर्जर। व्याघ्रसिंहसी फाडीती हुशार। 

रानकुत्रे संघटोनी। 

तुकडोजींच्या या कवनांची महती देखील आपण जाणता.


लक्षात घ्या. या देशात विषमता आहे. या विषमतेचे कारण केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत. जन्मासोबत जात नावाच लेबल चिटकवून व्यक्तीची प्रतिष्ठा, ओळख, कला-गुण, सामाजिक ओळख, संसाधनांची उपलब्धता यांना एक मर्यादेचे बंधन जन्मभर बांधले जाते.


ही विषमता व ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक,आर्थिक व राजकीय मुठभरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी. स्वतंत्र्य, समता, बंधूत व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघटनेची गरज भासते.


कारण तुम्ही व्यक्तीशी लढत नसून सिस्टीम सोबत लढत आहात. केवळ लढत नसून एक पर्यायी सिस्टीम उभी करू इच्छिता. त्यामुळे हा लढा सर्व अंगानी विषमतावादी, सरंजामी, जातीयवादी विचारांच्या, व्यक्तींच्या व संघटनेच्या विरोधात आहे.


लक्षात घ्या. तेथे व्यक्तीची मुक्ती किंवा आर्थिक उद्धार शक्य आहे. तुम्ही विषमतावादी टोळक्यात जाऊन त्यांच्या अजिंड्याखाली माना डोलवू शकता. परंतु त्याने समाजाची अथवा सामूहिक मुक्ती शक्य नाही. किंबहुना विषमता वादी शक्ती तुमचा वापर संपला की तुम्हाला देखील कचऱ्याप्रमाणे फेकून देतील.


या क्रांती प्रतिक्रांतीच्या लढ्यात स्वतःला जन्माने उच्चभ्रू समजणारा समाज कायम संघटित,शिक्षित व पर्यायाने सत्तेशी सलगी करत आपले प्रस्थ कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेशी सलगी त्यांनी इंग्रजांच्या  काळात केली. मुस्लिम साम्राज्याच्या काळात केली. स्वातंत्र्यानंतर देखील सत्तेत राहुल मलिदा खाण्याचे व बहुजनांचा मलिदा करण्याचे काम अथक अविरत सुरू आहे.


त्यांच्या या यशाचे गमक हा त्यांचं शिक्षण, संघटन, अजिंडा व लबाडी हे आहे. या सगळ्याचा वापर ते विषमतावादी व्यवस्था टिकवण्यासाठी करतात.


या सिस्टिमला पर्याय आपण शिक्षित संघटित व जागृत होऊन आपल्या अजिंड्यावर काम करून दिला पाहिजे.


तत्पूर्वी हे समजून घ्या की, सिद्धार्थ बुद्ध झाले व त्यानंतर त्यांच्या हातून ४५ वर्ष परिवर्तनाचे कार्य झाले. बोधिसत्व बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी दिले. जे जे प्रबुद्ध झाले बोधी झाले त्यांनी परिवर्तनाची कास पकडली.


कार्यकर्त्याने त्यासाठी पंचशिलाचे व शिलमार्गाचे महत्व जाणले पाहिजे. शील समाधी प्रज्ञा न जाणता. पंचशील न अंगीकारता काम करणारे कार्यकर्ते अनेकदा भरकटण्याचे व चळवळीला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम जाणते अजाणते करू शकतात.  त्यामुळे चळवळीत झांगडगुत्ता, संभ्रम देखील झाले. हेही लक्षात घ्या. जातीसंस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना तितकेसे महत्व नाही. शिक्षण व आर्थीक सबलीकरण करा.


धन्यवाद 🙏