Saturday, 27 December 2025

माणसं











माणसं पोरकी असतात..

अनेक अर्थाने.. 

कधी उन्मळून पडतात.


खूप बोलणारी माणसे रीती होतात अनेकदा..हातच काहीही न ठेवता. भर-भर बोलतात आणि विसरून जातात. 


काही बोलत राहतात. तेच-तेच, तेच-तेच.. कुरवाळत राहतात. सुखाला, दुःखाला..मोठं करतात प्रतिमेला. स्वतःहून, स्वतःपेक्षा अनेकदा…


न बोलणारी माणसे. आसुसलेली असतात.ऐकायला…. तुम्ही त्यांना ओरडा-बोला. ती ऐकत राहतात फक्त.. तंद्री लागल्यासारखी.. ती कुणाच्याही प्रेमात पडतात. त्यांना सगळेच चांगले भासतात. प्रेमात असतात प्रेमाच्या, चांगुलपणाच्या..


अगदी शेवट पर्यंत…

शेवटा पर्यंत. आनंदाने.

ते खूप बोलतात- खूप बोलतात स्वतःशी.. एकांताशी.. गप्पा करतात स्वप्नांशी,चित्र रंगवतात..कधी घाबरतात. पळतात,रडतात. कधी पडतात,धडपडतात,घडतात..कधी रेंगाळतात जिवन प्रवासात… चित्रावर, मित्रावर,रंगावर, गंधावर..ढेपाळतात. सावरतात स्वतःला. मग लपतात,लपवतात स्वतःला, स्वप्नाला

अनेकदा..

मग ती घाबरतात. त्यामुळे चिडचिड करतात..रागे भरतात सगळ्यांना…भीती पोटी.

ती प्रेमानेच बोलतात पण मोठ्याने..आतला आवाज दाबण्यासाठी.


माणसं ती…. चुकतात. शिकतात. काही फूलतात, काही गळतात.. मागे पडतात. त्याचं गाळात. 


काही संपतात..

उरतात..कायमची.  

Friday, 5 July 2024

बुद्ध आणि प्रेम

बुद्ध आणि प्रेम

 डोळ्यांनी आपल्याला जग केवळ दिसते. त्या दिसणाऱ्या जगाची अनुभूती हे आपल्या मनावर अवलंबून असते.


मनावर सर्वाधिक गारुड जर कुणाचं असेल तर ते प्रेमाचे असते. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला कडक उन्हात देखील सावलीची अनुभूती आणि चिंब सरींची बरसात जाणवू शकते. बाहेरच्या कर्णकर्कश हॉर्नसच्या आवाजात देखील त्याच्या कानात व्हायोलीन वाजू शकते. 


प्रेमात असणाऱ्या प्रियकराला आपली प्रियसी ही जगातील नितांत सुंदर स्त्री वाटत असते. 


आईला स्वतःचं बाळ हे जगातील सर्वाधिक गोंडस बाळ वाटतं असतं.


एखादया व्यक्तीकडे, वस्तूकडे, ठिकाणाकडे, नात्याकडे जेव्हा तुम्ही प्रेमाने पाहता तेव्हा ती वस्तू, व्यक्ती, ठिकाण हे सूंदर बनते. ही सूंदर बनवण्याची किमया प्रेमात असते.


अहिंसकाचा अगुलीमान व अगुलीमानाचा अरहंत बनण्याचा प्रवास हे त्याचे उदाहरण.


बुद्धाची करुणा ही दुसरं तिसरं काही नसून मानवी समाजासाठी असणारे प्रेम आहे. अन्यथा कोण राजकुमार आपली ऐश्वर्यसंपन्न जीवनशैली सोडून उपाशी-तापाशी, राना वनात आत्मक्लेश सहन करेल? 

आणि ते मिळालेले ज्ञान प्रत्येकाला लोक भाषेत समजावून सांगेल? वयाची ४५ वर्ष लोककल्याणासाठी खर्च करेल?


असे महानायक व अतुलनीय, अविश्वसनीय कहाण्या या निर्व्याज व निस्सीम प्रेमातूनच जन्माला येऊ शकतात.

Thursday, 16 August 2018

प्रेमळ गॅलरी...आठवणींची

प्रेमळ गॅलरी...आठवणींची
प्रेमळ गॅलरी...आठवणींची


काल फोनची रिंगटोन वाजली अन काळजात धस्स झालं...

बेडरूम मधुन हॉल पर्यंत धावतच आलो...फोन आणि माझ्यातल अंतर मला अतिशय वेगानं कापायचं होत. त्याच थोड्याशा वेळात मनाचा कालवा झाला होता अन मी फोनजवळ पोहचण्याआधीच एव्हाना माझं मन सुसाट वेगाने मोबाइल पर्यंत पोहचंल होत.

डिस्प्ले स्क्रिन वर My Jaan नाव दिसलं.. क्षणभर थबकलो....दुःख, आनंद, उत्साह, राग, प्रेम सगळं काही कसं एकदाच दाटून आलं होतं...पण तो फोन कधीही न येण्यासाठीचा आला होता...तशी पूर्व कल्पना आली होतीच मला...मला तो कॉल मिस नहूता करायचा...खरं म्हणजे मला तर तिलाही मिस नव्हतं करायचं पण...? सगळं काही आपल्या हातात नसतं.. Destiny की काय म्हणतात त्याला...असं ती म्हणायची.

चार्जिंगचं वायर काढलं आणि मोबाईल मी कानाला टेकवला. एव्हाना माझा जीव एका कानामध्ये एकवटला होता. मला साठवून ठेवायचं होतं..ते सगळं काही...पुन्हा कधीतरी एकांतात कुरवाळण्यासाठी....दुसरा काय पर्याय असतो..?

आवाज तोच पण आज त्याला धार होती. लग्न ठरलंय माझं...माझ्या कानात शिसव ओतलं...हे अपेक्षित असूनही...डोळ्यापुढे क्षणभर अंधार झाला...मी सावरलं स्वतःला अन बाजूच्या सोफ्याचा आधारघेत भिंतीला टेकून फरशीवर बसता झालो.

माहितीये लग्न ठरलंय तुझं. मी अभिनंदन नाही केलं मला ते षंढ झाल्यासारखं वाटलं असतं. त्यानंतरचे शब्द फक्त माझ्या कानावर आदळत होते. पण मला काही पुढे ऐकू आले नाही...काही आठवत ही नाही... पुरुष रडतात की नाही मला माहित नाही..पण मी तो मार्ग पत्करला होता...

आता फोन नावाला कानाला होता...डोळे नुसतेच वाहत होते. डोळ्यांपुढून सगळी चलचित्र सरकत होती.


माझा मोबाइल नंबर तिने केव्हाच डिलीट केला होता..आठवणींची गॅलरी तिने खाली केली होती. तिच्या मनावरचं माझं साम्राज्य नाकारलं होतं.

जवळ येतांना कवेत घेतांना जातीची उतरंड आणि अस्पृश्यता कधी आड आली नहूती...पण लग्न.... ?दोन समाजात होत असत आणि इथंच घोड आडल होत.

खरंच असं सगळंकाही क्लिअर करतायेत का? ज्यावर प्रेमकेलं त्याची भीती तिला वाटतं असेल का..? तिला हे सगळं विसरून नवीन आयुष्य जगायचं होतं. खरंच असा भूतकाळ तोडून नवीन होता येत का?
तिच्या भविष्यात मला कुठेच जागा नसेल. एव्हाना तिच्या भुतकाळातूनही ती मला क्लिअर करत होती. सिक्युअर लाईफ, उज्जवल भविष्य, सुखांचा बाजार हवा होता तिला त्याच प्रेमात ती माझं प्रेम विसरली असावी..?

सोडून चालली याचा मुळीच राग नाही आला. माझा विश्वास तोडला त्याचा राग आला. माझंच प्रेम कुठेतरी कमी पडलं याचा मनस्वी खूप तिरस्कार केला मी स्वतः चा....

मी तुला कधीच त्रास देणार नाही. इच्छा झाली तरी msg , call करणार नाही. तू मला हवी होतीस हाच माझा स्वार्थ होता. तुला त्रास देण्याइतका मी कधीच स्वार्थी नहूतो.

फक्त तुझ्या आठवणीनं कळ आली काळजात...


टीप :  शब्द माझे भावना तुमच्या..

Sunday, 13 May 2018

I wanna grow old with you..



अभिमान  आणि  अहंकार  यात  फारसे  अंतर  नाही.
ती  इतके  सोबत  राहतात  कि  अभिमानाची  आणि  अहंकाराची
अगदी  सहज  सरमिसळ  होते.
.
त्याने  माझा  अभिमान  दुखावला?
 मी  त्याला  शरण  जाणार  नाही..
खरं म्हणजे हि  शरण  वगैरे  जाण्याची  भाषा  युद्धात  वगैरे  चालते..
प्रेमात  नाही.
.
प्रेमाचे  कोवळे  ऊन  घरंगळत  खाली  उतरावे  आणि
संसाराचं  उन्हात  न्हाऊन  तावून  निघावे
त्यात   सावली  सारखी  साथ  सोबत  निभवावी
.
त्या  रख-रखत्या  उन्हा  नंतर  पुन्हा  सावली  येणार  आहे
पण  ती  संध्या  काळची  असेल ..
.
चेहर्या  वरती  त्या  उन्हाचे  खुणा  स्पष्ट  दिसतील
त्याला  अनुभवाचे  नाव  असेल.
.
संध्या काळी  पुन्हा  ऊन  असेल  पण  ते  अगदी  प्रौढ
अनुभवातून  आलेले . शांत  असेल ..त्यात  सकाळच्या
कोवळ्या  उन्हाची  नाजूकता  चंचलता  अधीरता  नसेल ..
.
आयुष्याच्या संध्यकाळानंतर पुन्हा  चिरनिद्रा
नवी  स्वप्नासाठी नव्या  प्रवासा साठी..
नव्या  पहाटेच्या  प्रतीक्षेत  रात्र  सरेल ...
.
नवीन  कोवळया उन्हासाठी