Tuesday, 7 November 2023

आंबेडकरवादी नेतृत्व हवे.


संघटन, संभाषण व संविधानिक कौशल्य तसेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आकलन नसणाऱ्या व्यक्तीस कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय  संघटनेत पद, प्रतिष्ठा अथवा नेतृत्व दिल्यास संघटन निकामी, निकृष्ट व सैरभर न झाले तर नवलच.


जो समाज उच्च शिक्षित झाला. नीतिमत्ता हे मूळ तत्वज्ञान ज्या बौद्ध धम्माचे आहे. ते तत्वज्ञान स्वीकारून ६७ वर्ष ज्या समाजाला झाले. शिकावा, चेतवा व संघटीत व्हा असे सांगून ९९ वर्ष ज्या समाजाला झाले. म्हणजेच "शिक्षा" आणि "दीक्षा" दोन्हीही उत्तम ज्या समाजाकडे आहे. अशा समाजाने यापुढे आपले नेते, पुढारी व मार्गदर्शक निवडतांना अतिशय बेजबाबदार, अंध व परंपरागत असून कसे चालेल?


आपले नेते मग ते धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक असतील. ते देश, राज्य अथवा गल्ली बोळातील असतील.. अगदी तुमच्या संघटनेचे, जयंती मंडळाचे किंवा बचतगटाचे असतील... असे नेते,प्रमुख निवडतांना या प्रबुद्ध,वाचक व शिक्षित समाजाने चोखंदळ असायला नको का?


ज्या बौद्ध धम्माचा वारसा,विरासत आणि विचार आपण चालवू इच्छीतो. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय व धार्मिक चळवळीचे नैतिक वारसदार म्हणून आपण स्वतःला म्हणवून घेतो. त्या समाजाचे आचरण व  नेतृत्व देखील त्याला 

साजेसे नको का?


केवळ मंत्रोच्चारा प्रमाणे आंबेडरवाद व बौद्ध धम्माचे विचार मांडायचे परंतु आचरण मात्र विपरीत व विरुद्ध करायचे हे असे किती दिवस चालायचे?


लक्षात घ्या बाबासाहेब यशस्वी झाले ते त्यांच्या ठायी असणाऱ्या ज्ञान व शील या गुणामुळे.



पुणे कररातून निपजलेल्या निर्बुद्ध   निकृष्ट नेते तुमच्या स्वाभिमानाची लढाई लढणारे नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुरदृष्टी नसणारे हे नेते चळवळीला संपवतील. म्हणून येणाऱ्या काळात नेतृत्वाला नेते होण्यासाठी आंबेडकरवादी होणे, बौद्ध धम्माचे पाईक होणे ही प्रथम कसोटी असलीच पाहिजे.

Wednesday, 25 October 2023

अशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन




१४ ऑक्टोबर, १९५६  या दिनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. त्या क्रांतिकारी,अभूतपूर्व व ऐतिहासिक घटनेला आज ६७ वर्ष पूर्ण होत आहेत.  त्यानिमित्ताने या ६७ वर्षात आपण काय केले याचा हिशोब, पडताळणी व सिंहवलोकल  करावयास हवे.


मी तीन मुद्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो:

🔵 एक

 अस्पृश्य समाजातील अनेकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.  त्या दीक्षे नंतर त्यांच्या जीवनमानात क्रांतिकारी व अमुलाग्र सकारात्मक बदल झाले.  जगाच्याच्या इतिहासात इतक्या अल्पावधीत व इतक्या प्रचंड वेगाने कुठल्याही समाजाने प्रगती केलेली नाही. अशी प्रगती या समाजाने केली. हा बदल बाबासाहेबांच्या आणि बुद्ध धम्माच्या विचारांची कास धरल्यामुळे,  शिक्षणामुळे, खुळचट धर्मकल्पना व अंधश्रद्धा नाकारल्यामुळे त्यासोबत मिळालेल्या संविधानिक अधिकारामुळे झाला आहे. 


असे असले तरी सारेच काही आलबेल आहे असे नाही. हा धम्मरथ भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने अपेक्षित वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.


त्याला कारण आपल्या शेजारी असणारे मांग व चर्मकार बंधूंना देखील आपण बौद्ध धम्म दीक्षा देऊ शकलो नाही.


🔵 दोन

स्वतःस पुरोगामी आणि आंबेडकरवादी अशी दुहेरी ओळख  असणाऱ्यांनी देखील बुद्ध धम्माला अस्पृश्य ठरवून जाणीवपूर्वक बुद्धधम्माला बगल दिली आहे.  बुद्धांचे तत्वज्ञान आम्ही मानतो. स्वीकारतो परंतु धम्म स्वीकारण्याची हिंमत व धमक नसणाऱ्यांमुळे देखील धम्मारथ अडकला आहे. मुळात आंबेकरवाद अथवा आंबेडकरवादी होण्यासाठी तुम्हाला धम्माचे तत्वज्ञान हे  स्वीकारणे अनिर्वार्य आहे. कारण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्राचे सार हे धम्माधारीत आहे. 


सेलेक्टिव्ह आंबेडकर स्वीकारणे हे पळपुटे पणाचे व समाजाच्या करंटेपणाचे लक्षण आहे. आंबेकरवाद हा धम्म दीक्षेविना पूर्ण होऊच शकत नाही. आंबेकरवादाचे सर्वोत्तम व सर्वोच्च टोक हे बाबासाहेबांची धम्मदीक्षा आहे. दस्तुरखुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील लढाई ही श्रमणवाद विरुद्ध ब्राम्हणवादी अशीच आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून असणारे (पुरोगामी + आंबेडकरवादी) हे धर्मांतराच्या रथाला खीळ घालणारे लोक आहेत असे मी मानतो. 


🔵 तीन

आता ज्यांनी धम्म स्वीकारला आहे. त्यांनी देखील आपल्या चालण्या बोलण्या व वागणुकीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे.


१४ जानेवारी,१९५१ रोजी वरळी बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले की, "बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी काही नियम करणार आहे. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही." शिवाय, ज्या हिंदूंना धम्मदीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात आणि बुद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात, अशांना बुद्ध धम्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी येथे   यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाहीतर बाराभाईची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा इतर काही नाही."


धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

जय✺भीम.

नमो✺बुद्धाय

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Thursday, 28 September 2023

आमच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच आम्ही जाणार

आमच्या पूर्वसूरींच्या मार्गानेच आम्ही जाणार



धर्मांतर करतांना बाबसाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञा पूर्वाश्रमीच्या महार समाजाला दिल्या. बाबासाहेबांना हे ज्ञात असावे की, आपण ज्या नरकातून या समाजाला बाहेर काढले आहे. त्याच मार्गाला काही नमुने परत जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणून बाबासाहेबांनी मुस्लिम, ख्रिश्चन अथवा इतर धर्माचा २२ प्रतिज्ञांमध्ये कोठेही उल्लेख केलेला आढळत नाही. धर्मांतराला आता जवळपास ६६-६७ वर्षे इतका कालावधी उलटून गेला आहे.


या ६६-६७ वर्षात देखील अगदी मूलभूत प्रबोधन ज्या नमुन्यांचे झाले नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे. प्रबोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे जरी मान्य केलं तरी; ज्यांना गुलामीचे साखळदंड हे सौंदर्य अभूषणे वाटावीत? इतका उच्च प्रतीचे गाढवंपण कुठून शिकतात हे लोक? अशांना कात्रजचा घाट दाखवलेले उत्तम.


प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणाचा सामाजिक बहिष्कार करणे हे कायद्याचा चौकटीत उचित ठरणार नाही. मात्र ज्यांनी हजारो वर्षे जातीच्या नावावर शोषण केलं त्यांनी हा उपदेश देऊ नये. 


बहुसंख्य समाजाचे अनुकरण, लागूनचालन हे जगभरात सुरू असते. अशावेळी अल्पसंख्याक समाज हा सर्व स्तरावर सुदृढ व सशक्त नसेल तर तो शरणागती पत्करतो. शरणागती न स्वीकारणारे शिकार देखील होऊ शकतात. शरणागती पत्करणारे देखील दुय्यम स्थान अथवा गुलामी स्वीकारतात.


भारतात बहुसंख्य समाज हा आक्रमक, अनधिकृत, अतिक्रमण व बुद्धिभेद करत असतांना असे घरभेदी पालखीचे भोई नसलेलेच बरे. असे घरभेदी केवळ गणपती बसवणारेच आहेत असे नाही. तर जेजे म्हणून आंबेडकरी विचारांना सामाजिक, राजकीय, धार्मिक ठिकाणी स्वतःचे गल्ले भरण्यासाठी वापरतात; व चळवळ सरंजामी सनातन्यांच्या दावणीला बांधतात. ते सगळे सारखेच कृतघ्न आहेत.


सामाजिक व राजकीय मंचावर सामाजिक सौदाऱ्याची भुमीका घेणे मी समजु शकतो; परंतु नको ते थोतांड घरात आणणे. त्या धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक दहशतवादी संघटनेचा भाग बनणे म्हणजेच पालखीचे भोई बनणे होय.


आपली कार्यशक्ती ही केवळ प्रतिक्रियावादी होण्यात अथवा पालखीच्या भोईंना सुधारण्यात घालवणे मला उचीत वाटतं नाही. जे सोबत आहेत त्यांना नवं निर्माणासाठी व आपल्या ध्येय उशिष्टांना पूर्ण करण्यासाठी ही शक्ती वापरावी या मताचा मी आहे. आपली स्वतःची शक्ती व उपद्रवमूल्य सिद्ध केल्याखेरीज चळवळ फोफावणार नाही.

Monday, 7 August 2023

भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत.

 







भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत.
सृष्टीचा नित्यक्रम कसा राखला जातो यावर तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी सोपे आहे. नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल किंवा वाईट असेल परंतु भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे. इतर कोणावर नाही. कम्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि पाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म होय. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करीत आहे.
भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत तर कर्माच्या नियमांचे विवेचन करतात कम्मनियमाचा बुद्ध प्रणित अभिप्राय असा की, ज्याप्रमाणे दिवसा मागून रात्र येते. कर्मा मागून त्याचा परिणाम येतो हा एक नियम होय. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाराला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कर्मानेचनैतिक व्यवस्था राखली जाते.अकुशल कर्म केल्याने नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे हि शक्य आहे कि कम्म आणि काम्माचा होणार परिणाम यामध्ये काही कालांतर असते.
कम्माचे तीन विभाग करता येतात
१.दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म: (तात्काळ फल देणारे कर्म)
२. उपपज्जवेदनीय कम्म: (याचा परिणाम फाय कालांतराने होतो)
३. अपरापरियावेदनीय कम्म: (अनिश्चित काळाने फळ देणारे)
हे कम्म अहोसी कर्म होऊ शकते. म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. ज्या कर्माचा त्याच्या दुर्बलतेमुळे परिणाम होत नाही किंवा जे कर्म अन्य सबळकर्मामुळे बाद होतात. या प्रकारच्या कर्माचा अहोसी कर्मात त्याचा अंतर्भाव होतो.
कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगाव लागतो आणि त्याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही एवढेच काही कर्म सिद्धांत अभिप्रेत नाही. कधी एकाच्या कर्माचा त्या ऐवजी दुसऱ्याला परिणाम भोगाव लागतो. हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो.
व्यक्ती येतात जातात पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याच प्रमाणे ही व्यवस्था बनविणारा कम्मनियम अप्रतिहत राहतो.
याच करणास्तव अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे. ते नीतीला बुद्ध धम्मात प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे.
नैतिक व्यवस्था कशी राखली जाते? या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत मांडला. कर्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. सद्भाग्य किंवा दुर्भाग्य याचा संबंध नाही. याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे या कारणास्तव धम्माचे हे एक प्रमुख अंग आहे.
१. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहे काय?
ब्राह्मणी धर्माचा कर्म सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व मानणारा आहे. ब्राह्मणी धर्मात कर्त्याच्या कर्माचा विपाक आत्म्यावर होत असतो. उलटपक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्वात मानत नसल्याने तो आत्म्यावर अवलंबून नाही. त्यामुळे दोन्ही एकाच आहेत असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.
२. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय?
कर्म सिद्धांत बुद्धाने सांगितला. कराल ते भराल असे सांगणारा बुद्ध हा पहिलाच, त्याच्या म्हण्यानुसार कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना श्रुष्टीची नैतिक व्यवस्था अबाधित राखणे अशक्य होय.
पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? गत जन्मी सदोष किंवा निर्दोष कर्मास तुम्ही ज्ञात आहात काय? असे मूलभूत प्रश्न बुद्ध उपस्थित करून बुद्ध जन्मांधारित कम्मपाक मानत नाहीत हे स्पष्ट होते.

ब्रम्हविहार

ब्रम्हविहार

 




किच्छेन में अधिगतं हलं दानि पकासितूं ।
रागदोसपरेतेहि नायं सुसबुद्धो ।।१।।
परिसोतो निपुणं गंभीर दूद्दसं अणूं ।
रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्देन आवुटा ति ।। २।।
संबोधी प्राप्त केल्यावर बुद्धांच्या मनात विचार आला की, मला अवगत झालेला हा मार्ग लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाणारा आहे, हा मार्ग सामान्य व्यक्तीला समजुन येणे कठिण आहे, तर बुध्दिमान लोकांसाठी तो अत्यंत अतिसूक्ष्म पातळीवर घेवून जाणारा गहन विचार आहे. त्यामुळे, खुळचट परंपरा,धार्मिक संस्कार,आत्मवाद, ब्राम्हणी कर्मवाद याने ग्रस्त असलेली लोकं हा ज्ञानमार्ग आत्मसाद करतील काय ? या संसारातील लोक अज्ञानावरणाने अच्छादित व विषयासक्त जीवन जगत आहेत त्यामुळे मला प्राप्त झालेल्या ह्या ज्ञानाचा ते योग्य अर्थ लावतील काय ? आणि तसा योग्य अर्थ लावला गेला नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग तरी काय ? लोकांना माझ्या ज्ञानाचे परिपूर्ण अवलोकन न झाल्याने लोकांचे कल्याण होण्याऐवजी अनर्थ घडेल काय ? या आणि अश्या अनेक नकारार्थी प्रश्नांचे काहूर बुद्धांच्या मनात निर्माण झाले.
धम्म तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करावा, या बुद्धाने घेतलेल्या निर्णयात सदर प्रश्न बाधा आणित होते. यालाच बुद्धाचा विषादयोग असे म्हणतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरीता बुद्धाने चित्तास आणखी एकाग्र केले आणि अन्वेषण पद्धतीचा वापर करुन, म्हणजेच स्थूलतम विचारांचे सूक्ष्मतम विघटन करुन या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवली. बुद्धाच्या अश्या चिंतन प्रक्रियेला 'ब्रम्हविहार' असे म्हणतात. अथवा...मैत्री,करुणा,मुदिता(अनंदिवृत्ती), उपेक्षा या चार मानवी भावना ब्रम्हविहार होत !
" तिठचर निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिधो, एतं सति अधिठेय ब्रम्हमेत विहारं इधरमाहु"
( उभे असता, चालत असता, बसले असता, किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यत झोप येत नाही तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी, कारण तिलाच ब्रम्हविहार म्हणतात")
बौद्ध धम्मात पुर्णजन्म आहे हिंदू धर्मात ही आहे , बौद्ध धमात देव आहे हिंदू धर्मात ही आहे , बौद्ध धमात ब्रम्ह आहे हिंदू धर्मात ही आहे, परंतु हिंदू धर्माचा पूर्णजन्म आत्म्यासह आहे पण बौद्ध धमात आत्मा नाही...अश्या पद्धतीने इतर संकल्पना ही विरोधी आहे.
ब्रम्ह , ब्रम्ह विहार, ब्रम्हलोक या सर्व संकल्पना बुद्ध धमात आहे आणि त्या ध्यानाशी निगडित आहे.
ब्रम्हदेव, ब्रम्हविहार म्हणजे मैत्री, करुणा ,मुदिता, किंवा उपेक्षा यापैकी एखादी मनुवृत्ती होय किंवा या सर्व भावनांची असलेली प्रतिकृती होय.
तेव्हा ब्रह्मदेव बुद्धांजवळ आला किंवा मार बुद्धांजवळ आला याचा अर्थ या मनोवृत्ती बुद्ध यांच्या मनात विकास पावल्या, त्यांच्यासमोर कोणी व्यक्ती नव्हे.
ब्रम्हविहार: मैत्री, (मेत्ता) करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार मनोवृत्तींना ब्रह्मविहार म्हणतात.
(१) मैत्री : सामान्यत: माणसाला दुसऱ्याच्या सुखाविषयी ईर्ष्या किंवा मत्सर वाटतो आणि त्यामुळे मन कलुषित होते. ते तसे न होता निर्मळ व्हावे म्हणून दुसऱ्याशी मैत्रीचा भाव बाळगावा . मैत्रीत प्रेम असते आणि दुसऱ्या व्यक्तीचा उदार स्वीकार असतो. दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाला पाहून आपल्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण झाली, तर ती ईर्ष्या आपलेच चित्त मलिन करते. त्याऐवजी मैत्री भावना ठेवल्यास आपले चित्त शुद्ध आणि प्रसन्न राहते.
(२) करुणा : दुसऱ्याचे दु:ख पाहून दया वाटणे ही साधारण प्रतिक्रिया झाली. क्वचित कधीतरी, ‘बरे झाले त्या माणसाला योग्यती शिक्षा मिळाली’ अशी विकृत समाधानाची किंवा ‘मी किती नशीबवान म्हणून असले दु:ख माझ्या वाट्याला आले नाही’ अशी आत्मतुष्टीची भावनाही मनात येवू शकते. याप्रकारच्या भावना चित्ताला मलिनता आणतात. दु:खाविषयी दया दाखविण्यात अहंकाराचा सूक्ष्मगंध असतो. करुणाही त्याहून उच्चपातळीवरील भावना आहे. दु:खी व्यक्तीसाठी करुणा बाळगल्यास स्वत:चे चित्त मलिन होत नाही.
(३) मुदिता : मुदिता म्हणजे आनंदाची भावना जोपासली पाहिजे. दुसऱ्याने केलेल्या पुण्यकर्माबद्दल साधकाला आनंद वाटला पाहिजे आणि त्याने स्वत:सुद्धा असे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(४) उपेक्षा : पापाविषयी उपेक्षा बाळगावी याचा अर्थ असा की, पापाचरण करणाऱ्या व्यक्तीचा राग मानू नये, कारण हा राग साधकाचे मन कलुषित करतो. दुसरी व्यक्ती पापाचरण करीत असेल तर त्याचे चित्त कलुषित आहे परंतु, अशा व्यक्तीविषयी क्रोध उत्पन्न झाल्यास आपले स्वत:चे चित्तही कलुषित होते. त्यामुळे त्याविषयी तटस्थता बाळगणे म्हणजे उपेक्षा. पापाचरण करणाऱ्या व्यक्तीला सत्कर्म करण्यास प्रेरित करावयाचे असेल तर त्यासाठी स्वत:चे चित्त द्वेष किंवा क्रोध यापासून मुक्त असणे गरजेचे आहे. टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारणे’. ही उपेक्षा भावना नकारात्मक नसून अन्य तिन्ही भावनांप्रमाणे सकारात्मक आहे. ह्या भावना वाढीस लागतात तसतसे रजोगुण व तमोगुण क्षीण होत जातात आणि सत्त्वगुणाचा प्रकर्ष होतो.
या सूत्रात सांगितलेल्या मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना जोपासणे सकृद्दर्शनी सोपे वाटले तरी त्या मनात दृढपणे रुजविण्यासाठी साधकाला सतत प्रयत्नशील राहावे लागते.

बौद्धांची आचारसंहिता

 


|| आचारो परमो धम्मो ||
बौद्ध म्हणजे काय?
बौद्ध म्हणजे बुद्धिवादी, व डोळसवृत्ती बाळगणारे तसेच स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय आणि नीती या तत्वांना मानणारा,प्रज्ञा, शील करून यांचे आचरण करणारा, परिवर्तनवादी म्हणजे बौद्ध होय.
बौद्धांची आचारसंहिता:
बुद्धांच्या काळात संघ प्रवेशापूर्वी दीक्षा दिली जायची. उपासकांस त्रिशरण-पंचशीलाने दीक्षा दिली जायची.१४ ऑक्टोबर, १९५६ दिनी बाबासाहेबानी दीक्षा घेतली. म्हणून वयाच्या १८ वर्षानंतर प्रत्येकाने धम्मदीक्षा घेतली पाहिजे.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे बौद्धांची सामाजिक आचारसंहिता होय.
त्याचप्रमाणे पंचशील,अष्टशील हि आपली आचार संहिता होय.
घरात पूजास्थान असावं व दर्शनीय भागात धम्मध्वज, धम्मचक्र महापुरुषांच्या प्रतिमा असाव्यात.
२४ प्रकारच्या शिबीरातून प्रशिक्षण घेणे हि आपली आचार संहिता,
आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आपण केले पाहिजे.
आपल्या निवासस्थानाचे, मुला-मुलींची नावे हे बौद्ध संस्कृतीला अनुरूप असावीत.
जयभीम करतांना दोन्ही हात हृदयाशी जोडून करावा.
भन्तेजींना आपण नम्रपणे वंदामि भन्ते म्हंटले पाहिजे. शक्य असल्यास पंचांग प्रणाम करावा.
आपण सण, मंगल दिन, पवित्र स्थळे, जयंत्या , स्मृतिदिन,विजय संगम व
क्रांती दिन साजरे केले पाहिजेत.
बौद्धांनी हळदी कार्यक्रम करू नये. त्या ऐवजी पर्यायी उटणे लावण्याचे कार्यक्रम आपण करू शकतो मात्र त्यात अंधश्रद्धांचे पालन करू नये.
आपण लग्नपत्रिकेतील वेळ हि मुहूर्त पहिल्यासारखी ११:४५ किंवा १२:१५ अशी टाकू नये. व विवाह विधी हा दिलेल्या वेळेत पार पाडावा.
तसेच मंगळसूत्र न घालता अशोक चक्रांकित मंगळसुत्त घालावे.
पतीच्या मृत्यू नंतर पत्नीचे अलंकार उतरवू नयेत. आपण आयुष्यमान,आयुष्यमती, आयुष्यमानीनी, आयुनी, आदरणीय हे शब्द सन्मानार्थ लिहावेत.
मृत व्यक्तीस कलकथित, स्मृतिशेष म्हणावे.
गुणात्मक आचारसंहिता :
समोरच्या व्यक्तीने आपल्याला ओळखले पाहिजे ते आपल्या आचरणातून.त्यासाठी आपण शीलवान, सदाचारी, सद्गुणी वर्तन अंगिकारले पाहिजे. तुमची वाणी हि सम्यक असली पाहिजे.आपण विकार मुक्त असले पाहिजे. आपण दानपारमीतीचे पालन करावे. गुणी लोकांची सांगत करावी.
धम्म हा आचरणात आहे आणि धम्म हाच आपला मार्गदर्शक आहे.

माझी पुस्तक यादी






  1. मला उध्वस्त व्हायचंय
  2.  समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन
  3.  जनता 
  4.  जिज्ञासा लेखक कार्तिकी पाटील 
  5. बौद्ध पर्व अथवा  बौद्ध धम्माचा इतिहास- वागो आपटे
  6.   बुद्ध लीला- धर्मानंद कोसंबी
  7.  अमर्याद आहे बुद्ध- विलास सारंग
  8.  बुद्ध चरित्र- भाऊ लोखंडे
  9.  मिलिंद प्रश्न- डॉक्टर
  10.  भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
  11.  भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग- माशा मोरे
  12.  गौतम बुद्ध चरित्र- केळुसकर
  13.  जगातील बुद्ध धम्माचा इतिहास-  माश मोरे
  14.  भारतातील बौद्ध धम्म- गेल  ओम वेट
  15.  आमचा बापाने आम्ही- नरेंद्र जाधव
  16.  जगातील आठवे आश्चर्य 
  17.  डॉक्टर आंबेडकरांचे मारेकरी-  यदि फडके
  18.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्म विषयक जगप्रसिद्ध भाषणे- दीपक कुमार खोब्रागडे
  19.  डॉक्टर आंबेडकरांची जाती मीमांसा- उमेश  बगाडे
  20.    हॉटेल इन द बेली
  21.  फक्त भारताच्या दिशेने -गेल अमवेत
  22.  डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती- बळवंत हनुमंतराव वराळे
  23.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - धनंजय  कीर
  24.  प्रश्नोत्तरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर- भंडारे वानखेडे
  25.  बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील पंचवीस वर्ष- सोहनलाल शास्त्री
  26.   क्रांती  प्रतिक्रांती
  27. वर्षावास आणि 12 पौर्णिमा
  28.  सिमोन दो  बोहू आर
  29.  रुपयाचा प्रश्न
  30.  काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यन प्रती काय केले
  31.   जातीव्यवस्थेची निर्मूलन
  32.  पुणे करार
  33.  संस्कृत भारत अग्रलेख
  34.  विद्यार्थ्यांनो जागृत व्हा
  35.  शूद्र पूर्वी कोण होते
  36.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन खंड  ६ , १३

Friday, 14 July 2023

परिवर्तन

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, तुमच्या मिळकतीतील किमान विसावा हिस्सा तुम्ही समाजासाठी दान केला पाहिजे. हे अवाहन दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.  आता प्रश्न असा आहे की, आपण जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवुन घेतात. ते आपल्या मिळकतीतील विसावा हिस्सा समाजासाठी खर्च करतात का;  आणि जर करत नसतील तर आपण खरंच आंबेडकरवादी आहोत का? हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बरं विसावा हिस्सा म्हणजे किती? तर ज्याला लाखभर रुपये पगार आहे.  त्यांनी किमान पाच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे. ज्याला पन्नास हजार रुपये पगार आहे त्यांनी अडीच हजार रुपये महिन्याला खर्च केला पाहिजे.  आणि ज्याला 25 हजार रुपये आहे त्यांनी १२५० प्रती माह खर्च केला पाहिजे. 


 आता दुसरा प्रश्न असा उरतो आपण जर समाजासाठी हे दान  करत नसून तर ज्या म्हणून आंबेडकरवादी चळवळी आहेत त्या कशा टिकणार? आंबेडकरवादी चळवळी मृतप्राय होण्याचे हे प्रमुख कारण आहे. ज्या समाजाने आंबेडकरी होण्याचा फायदा घेतला. तो समाज आंबेडकरी होण्याचं देणंही लागतो हे तो  स्व-स्वार्थापायी जाणून बुजून विसरला आहे.


 बरं जे जागृत आहेत त्यांनी तरी किमान हा जागृतीचा विस्तव विझु देता कामा नये. तुम्ही-आम्ही आंबेडकरी चळवळीचे डायरेक्ट बेनिफिशरी अर्थात सरळ लाभार्थी आहोत. तो लाभ आपण सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व राजकीय अशा निरनिराळ्या स्तरावरती  उपभोगले आहेत.


 त्यामुळे किमान आंबेडकरी चळवळी राजकीय असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील किंवा शैक्षणिक असतील या मृतप्राय होता कामा नये. त्या कार्यरत आणि वृद्धिंगत व्हाव्यात म्हणून आपण सामाजिक दान केलंच पाहिजे. कारण जोवर चळवळ आहे तोवर आपण आहोत.


व्हाट्सअप आणि फेसबुक हे खरंतर संभाषणाची उत्तम साधन आहेत परंतु केवळ व्हाट्सअप आणि फेसबुक वर पोस्ट आणि व्हिडिओच्या रतीबच्या-रतीब टाकून आंबेडकरी चळवळीला आपण सहकार्य अथवा  नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहोत अशा अविर्भावात मुळीच राहू नये.  या भ्रमात असणाऱ्यांनी, स्टेजवरून लांबलचक भाषण झोडपणाऱ्यांनी आणि स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांनी.  जमिनी स्तरावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ता व संस्थांना  सहकार्य व सक्रिय सहभाग नोंदवून आपला पाठींबा व योगदान दिले पाहिजे. हाच खरा मार्ग होय.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Sunday, 12 February 2023

इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 इतकी प्रचंड उदासीनता का आहे?

 माझे मुस्लिम समाजाचे अनेक मित्र प्रत्येक शुक्रवारी नचुकता नमाजीला जातात.  अनेक ख्रिश्चन बांधव रविवारी चर्चमध्ये जातात. अनेक हिंदू मित्र त्यांचे- त्यांचे सणवार, उपास-तापास जपत असतात. तर मग आपण बौद्ध बांधव इतके उदासीन का आहोत. आपण किमान महिन्यातून एकदा तरी विहारात जातो का? आपल्याला लेणी संरक्षण व संवर्धनाबद्दल आस्था आहे का? किमान डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्था जोपासल्या, जगवल्या व वाढवल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला सहानभूती तरी आहे का? 


की आपण झोपेत आहोत? झोपेचे सोंग घेऊन आहोत? की आपली चळवळ फक्त व्हॉट्सअप व फेसबुक पुरताच आहे? रचनात्मक काही निर्माण करायचे आहे की नाही? ज्या समाजाच्या नावावर शाळेत, नोकरीत प्रतिनिधीत्वाच्या नावावर आरक्षण भोगले त्या समाजाचे देणे तरी आपण लागतो की नाही?


की कुणीतरी भीमा कोरेगावला हल्ला करेल तेव्हा आपण जागे होणार? किती दिवस RSS च्या संघटनेचे गुणगान गाणार? कधी सेना, कधी राष्ट्वादी तर कधी भाजप, काँग्रेसच्या वळचणीला जाणार? 


आपला कृती कार्यक्रम आहे की नाही? 


संभाजी भिडे हजारो पोरांना मूर्ख बनवून शकतो. RSS सारखे उपद्रवी संघटन जोमात चालते. तर बाबासाहेबांच्या विचारांचे संघटन का चालत नाही??


ज्या बाबासाहेबांना बाप मानतो.  स्वतःला त्यांचे मानस संतान समजतो. त्यांचे वैचारिक वारसदार म्हणून मिरवतो. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार आहोत की नाही? की फक्त नावापुरते अपघाताने जन्माने आंबेडकरी आहोत आपण.?


आज जी आपल्याकडे गाडी, माडी आणि साडी आहे ती बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेल्या संधीमुळे आहे. अन्यथा आपल्या पूर्वजांहून आपण खूप हुशार किंवा स्मार्ट अथवा शिक्षित आहोत आसा समज असेल तर त्यातून बाहेर पडा. आपल्या पूर्वजांना संधी नव्हती तर आपल्याला ती संधी मिळाली आहे इतकाच तो फरक आहे. ती संधी बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्गाने निर्माण करून दिली आहे.


मिळालेली संधी आणि संसाधने साबूत ठेवण्यात चळवळीचा मोठा वाटा आहे. अगदी आरक्षण असेल, स्कॉलरशिप असेल, सरकारी नोकरीचा बॅकलॉग असेल सामाजिक प्रतिष्ठा असेल हे सगळे मिळवण्यात व टिकवण्यासाठी चळवळ झटत असते. त्यामुळे त्याचे आपसूक आपण लाभार्थी असतो.


तुम्ही २४*७ धम्माचे अथवा चळवळीचे काम करा असे कुणी सांगत नाही. परंतु एक सामाजिक जाणीव व जबादारीतून तुम्ही तुमचा शक्य तो सहयोग व सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्येकाला घरा-घरातुन खेचून जबरदस्तीने चळवळ चालत नसते तो सहभाग जाबदारीतून आला पाहिजे. इतकंच.

Tuesday, 7 February 2023

दान पारमिता


दहा पारमिता मधील दुसरी पारमिता म्हणजे दान. 


पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था होय. शील, दान, उपेक्षा, शांती, नैष्कम्य, विर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री या दहा पारमिता होत.



दानाचे तीन प्रकार :-


१) आमिष दान म्हणजे पैसे, कपडे, औषधे काही महत्त्वाच्या गरजू वस्तूंचे दान देणे.

२) अभयदान म्हणजे अदृश्य स्वरूपातील दान प्रेम, वेळ, आशिर्वाद, सुरक्षा, म्हणजे अभयदान.

३) धम्मदान म्हणजे धम्म सांगणे, धम्मपोदेश देणे, निसर्गाचे नियम सांगणे. योग्य मार्ग दाखवणे. योग्य सल्ला देणे.


सर्व दानात सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे. कारण काही दानाने केवळ काही वेळापुरताच फायदा होतो. पण धम्मदानाने व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य सुधारते.


दानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय. दान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की,


तिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा ।

तस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥


याचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग ( रागरहित ) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.


दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात फार महत्व आहे.

राजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावांचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.


दान करणे हा श्रेष्ठ गुण होय. दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. घेण्याएवजी माणूस देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे. जे विवंचनेत आहेत, जे दानावरच जगतात अशांना सढळ हाताने मनपूर्वक दान केले पाहिजे. दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये. कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे सुख प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती. पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे. त्याचा देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द उपासकाने धन, द्रव्य, वस्त्र, रक्त व प्रसंगी शरीराचेही दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय.


समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतो. आपण जे कमावले त्याला अप्रत्यक्षपणे समाजाचाही हातभार लागलेला असतो. दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्या, तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल, म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ लागतो. मनातील तृष्णेचा क्षय होऊ लागतो, समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय, धम्माच्या प्रसार, प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे.


भवतु सब्ब मंगलम्

Monday, 6 February 2023




 माघ पौर्णिमा ०५ फेब्रुवारी २०२३

-------------------------------------

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या  संपूर्ण जीवनात बाराही पौर्णिमाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु बौद्ध धम्मात माघ पौर्णिमा ही तथागताच्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेकरिता प्रसिद्ध आहे. भगवान बुद्ध आपल्या धम्माचा उपदेश करीत ४५ वर्षे पायी फिरत होते. त्यांचे वय ८० वर्षे झाले होते. अशा वेळी त्यांचा मुक्काम वैशाली नगरीत होता.


भगवान बुद्धांचा संघ आणि स्वतः तथागत चापल चैत्य विहारात विश्रांती घेत होते. एक दिवस तथागतांनी प्रिय शिष्य आनंद याला जवळ बोलावले आणि सारंद्र्य चैत्य विहारात चलण्यास सांगितले. भन्ते आनंद यांनी सर्व भिक्षूंना तथागताचा आदेश सांगितला. त्याप्रमाणे सर्व भिक्षू संघासहित सारंद्र्य चैत्य विहारात आले. भिक्षू संघ विहारात बसले असता भन्ते आनंद तथागतांना विनंती करतात की, संघासाठी आपण उपदेश करावा. तथागत सर्व भिक्षूंना म्हणाले, " मी येत्या तीन महिन्यांनी देहत्याग करणार आहे. येत्या वैशाखी पौर्णिमेला माझे परिनिर्वाण होणार आहे." त्या दिवशी माघ पौर्णिमा होती. तथागत म्हणतात, " मी दिलेल्या शिकवणुकीनुसार आपण धम्म प्रसार करावा. लोकांना उपदेश करावा. यापुढे धम्मच तुमचा मार्गदाता राहणार आहे."


माघ पौर्णिमेस  इसवी सन पूर्व ४८४  या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण घोषणेमुळे माघ पौर्णिमा ही " महापरिनिर्वाण घोषणा दिन " म्हणून प्रसिद्ध आहे.



 यानंतर दुसऱ्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध वैशाली नगरीत गेले. तेथे त्यांनी आशीर्वादाच्या रूपाने  आपले भिक्षापात्र दान स्वरूपात लिच्छवी लोकांना भेट दिले.


दुसरी घटना अशी की भगवान बुद्धांचा प्रिय शिष्य  आनंद यांचे देखील  परिनिर्वाण माघ पौर्णिमेस झाले.

Friday, 20 January 2023

तथागत भगवान गौतम बुद्ध हे राजपुत्र होते. संपूर्ण जीवन ते ऐशोआराम सहज व्यतीत करू शकले असते. 


चक्रवर्ती सम्राट अशोक हे काश्मीर पासून ते अफगाणिस्तान पर्यंत असणाऱ्या प्रचंड भव्य अशा राज्याचे राजा होते. ते देखील बुद्धीच्या विचारांना शरण आले. जनकल्याण करणारा

 अद्वितीय जनकल्याण करणारे राजा बनले.


राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे मुंबई महामार्ग बांधकाम केले. मुंबई सी एस टी स्टेशन बांधकाम केले. मुंबई मनपा इमारत बांधकाम केले. खडकवासला धरण, कालवे, कात्रजचा बोगदे, येरवडा पुल, राजवाडे, रस्ते, कापड गिरण्या, घरे इ. बांधकाम केले. १८ व्या शतकात जमशेदजी टाटा यांची संपत्ती २० हजार रुपये होती, तेव्हा महात्मा फुले यांची संपत्ती त्याहून कितीतरी अधिक होती. 


शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानिकाचे राजे होते. सामाजिक न्यायाची वादातीत भूमिका त्यांनी बजावली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक संपत्ती मुंबई (दादर), खार, तळेगाव दाभाडे, कोकण, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, बंगलोर आणि दिल्ली येथे होती. अनेक ठिकाणी आजही आहे.  


आपण ज्या समाज सुधारकांच्या विचारांचा वसा चालवू इच्छीतो 

ते कुणी लुंगे-सुंगे नव्हते. त्यांनी ठरवले असते तर ते वैयक्तिक जीवन ऐशो-आरामात सहज व्यतीत करू शकले असते. परंतु त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन खर्च केले.


 या सगळ्यातुन मला एवढंच सांगायचं आहे की,

आपले आदर्श हे तू लढ मी उपदेश करतो किंवा तू लढ मी पाठीशी आहे असे म्हणणारे अथवा इंग्रजांची माफी मागणारे, पंचगव्य प्राशन करणारे नव्हते. आपल्या चळवळीला समृद्ध, संपन्न आणि आदर्श असा वारसा आहे. त्यामुळे आपण इतर कुठल्याही मार्गाला अथवा प्रलोभनात्म प्रबोधनाला बळी पडू नये.