महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MAHARASHTRA
PUBLIC SERVICE COMMISSION- MPSC)
एमपीएससी (MPSC) म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
वेबसाईट :- www.mpsc.gov.in
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- www.mpsconline.gov.in
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्या परीक्षा :
राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
सहायक परीक्षा (Assistant Examination)
लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते:
– उपजिल्हाधिकारी (गट अ)
– पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
– साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
– उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
– उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
– महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
– मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
– अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
– तहसीलदार (गट अ)
– साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
– महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
– कक्ष अधिकारी (गट ब)
– गटविकास अधिकारी (गट ब)
– मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
– साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
– उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
– साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
– नायब तहसीलदार (गट ब)
महसूल सेवा
पद नेमणूक व कार्यप्रणाली
उपजिल्हाधिकारी :-
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका – उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
– उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
– विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.
– निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
तहसीलदार :-
या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे –
– तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
– तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
– आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
नायब तहसीलदार :-
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
– तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
– महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
– शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
– महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
महाराष्ट्र पोलीस सेवा :-
राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
– गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
– अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
– शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा :-
शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत –
– या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
– शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
– कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.
विक्रीकर (व्हॅट) विभाग :-
विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या– प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर
निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.
मोटार वाहन विभाग :-
हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत –
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.
राज्य उत्पादन शुल्क विभाग :-
उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक :-
या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.
कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप :-
कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली.
एमपीएससी - नवा अभ्यासक्रम
पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)
पेपर- २ (गुण २०० - कालावधी २ तास)
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब-याच अंशी यूपीएससीसारखा आहे.
नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.
पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)
- राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
- भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
- महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे.
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.
पेपर- २ (गुण २०० - कालावधी २ तास)
आकलन (कॉम्प्रिहेन्शन)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
कॉम्प्रिहेन्शन :
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत.
डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील.
जनरल मेंटल एबिलिटी :
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग , डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.
बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान , प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती , ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.
परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत-
१) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
२) उमेदवाराला अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक असते.
३) विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.
४) अर्जाचे शुल्क हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे तसेच ऑनलाइन डेबिट कार्डद्वारे देखील जमा करता येते. परीक्षाशुल्क जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे देखील गरजेचे असते.
५) परीक्षेपूर्वी ७ दिवसांअगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. ती प्रत डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.१
परीक्षेसाठी पात्रता:-
शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.
शारीरिक पात्रता -
१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .
महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .